Dharashiv : 41 किमीच्या धाराशिव - तुळजापूर रेल्वेमार्गाबाबत मोठी अपडेट!
धाराशिव (Dharashiv) : गेल्या दहा वर्षांपूर्वी धाराशिव- तुळजापूर- सोलापूर या रेल्वेमार्गाची घोषणा केल्यानंतर या कामास अद्यापही सुरवात झालेली नाही. पहिल्या टप्प्यात धाराशिव ते तुळजापूर या रेल्वेमार्गाचे काम होणार असून, या कामाची टेंडर (Tender) प्रक्रिया अंतिम झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोलापूर- तुळजापूर- धाराशिव या रेल्वेमार्गाची एकूण लांबी ११० किलोमीटर आहे. यासाठी साधारणतः नऊशे कोटींची गरज आहे. त्यात ५० टक्के वाटा राज्य सरकार देणार आहे. घोषणेनंतर सर्व्हेक्षणाचे काम झाले. २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. धाराशिव ते तुळजापूर या ४१ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या कामाची ४८७ कोटींचे टेंडर अंतिम झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
धाराशिव ते सोलापूर या संपूर्ण रेल्वेमार्गाच्या कामासाठी राज्यातील महायुतीच्या सरकारने ४५२ कोटी रुपयांचा वाटा मंजूर केला. पहिल्या टप्प्यात ४८७ कोटी रुपयांतून धाराशिव ते तुळजापूरपर्यंतच्या ४१.४ किलोमीटर लांबीचे काम करण्यात येणार आहे.
भाविकांची होणार सोय
धाराशिव- तुळजापूर-सोलापूर या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी किमान पाच वर्षांची तरी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता सध्याच्या कामावरून दिसून येत आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेमार्गाने जोडले जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या व देशाच्या विविध भागांतून तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे.