Sambhajinagar : बांधकाम विभागाला मोठ्या अपघाताची प्रतिक्षा आहे का?; पुलावरून प्रवास करताना थरकाप

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जालना महामार्गावरील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सेव्हन हिल्स उड्डाणपुलावरील कठड्यांची उंची अत्यंत कमी झाल्याने  पूलावरील वाहतूकीला धोका निर्माण झाला आहे. ही बाब शहरातील खड्डेमय रस्त्यांबाबत याचिका दाखल करणारे ॲड. रूपेश जैस्वाल यांनी न्यायालयात उघडकीस आणून संबंधित यंत्रणेच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर न्यायालयाने शहरातील सर्वच उड्डाणपुलांची तपासणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले होते. त्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पुलाची पाहणी करत तत्काळ कठड्यांची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे पूलावरील पूर्व-पश्चिमकडे जाणाऱ्या वाहतुकीचा वेग पुलाच्या कठड्यांकडे पाहून मंदावल्याचे दिसून येत आहे. पूलावरील कमी उंचीचे कठडे पाहूनच वाहनधारकांचा थरकाप होत आहे. कठडे अत्यंत जीर्ण झाले असून वाहतूक पेलण्यासाठी ते कमकुवत झाले आहेत.

Sambhajinagar
Sambhajinagar : अपघातात पुलाचा कठडा तुटला आता दुरूस्तीची जबाबदारी कोणाची?

सेव्हन हिल्स उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. याची बांधकाम विभागाकडुन साधी दखल घेतली जात नाही.‌ या पुलावर मास्टिक टाकून हा उड्डाणपूल खड्डेमुक्त करणे अपेक्षित आहे. अशातच उड्डाणपूलाच्या कठड्यांची उंची अंत्यंत कमी झाली आहे. पूलही मोठ्या प्रमाणात हलत असल्याची गंभीर बाब ॲड. रूपेश जैस्वाल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.‌ न्यायालयाच्या आदेशानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूलावर धाव घेत पाहणी केली. मात्र अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर देखील गांभीर्य लक्षात घेऊन तसेच सुरळीत वाहतूकीसाठी या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना केल्या नाहीत. दरम्यान, प्राप्त तक्रारीनुसार "टेंडरनामा" प्रतिनिधीने पाहणी केली असता, पुलाच्या लोखंडी जोडणीमध्ये मोठी भेग पडल्याचे तसेच बेअरिंगचा भाग निखळल्याचे समोर आले. त्यामुळे पूल मोठ्या प्रमाणात हलत असल्याचे जाणवले. तिथे तातडीने धोकादायक भागाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे.

Sambhajinagar
Mumbai : मानखुर्द, दहिसर जकात नाक्यावर भव्य परिवहन आणि व्यावसायिक केंद्र; लवकरच टेंडर

छत्रपती संभाजीनगरकडून जालन्याकडे जाणाऱ्या या सेव्हन हिल्स उड्डाणपुलाचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात आले होते. १ मार्च २००१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पुल बांधकामाचा भुमिपूजन सोहळा पार पडला होता. या पुलाच्या बांधकामासाठी ठाण्यातील मे. टेक्नोजेम कंन्सलटंटस कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. पुलाच्या बांधकामाचे कंत्राट मुंबईच्या मे. जे.कुमार ॲण्ड कंपनी व मे. अमेया डेव्हलपर्स प्रा. लि. यांना देण्यात आले होते. २२ ऑक्टोबर २००१ रोजी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. २२ नोव्हेंबर २००२ रोजी पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्याकाळी केवळ ८ कोटी १९ लाखात पुलाचे बांधकाम करण्यात आले होते.  त्यानुसार या पुलाला २४ वर्षांचा कालावधी लोटल्याचे दिसून येत आहे.

सुरूवातीला हा उड्डाणपूल आठ वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे होता. मात्र दरम्यान कंत्राटदाराकडून कधीही दुरूस्ती झाली नसल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर  हा पूल काही वर्षांपूर्वी बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे डांबरीकरणापलिकडे  या पुलाची इतर भागांची दुरुस्ती यापूर्वी कधी करण्यात आली नाही . याऊलट डांबरीकरणाचे थरावर थर चढवल्याने पुलाच्या कठड्यांची उंची कमी झाल्याने पूलावरील वाहतूकीला धोका निर्माण झाला आहे. तसेच दर १५ ते २० वर्षांनी त्याचे पुलाखाली बसविण्यात येणारे बेअरिंग बदलणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.जी.२० दरम्यान रंगरंगोटीचे काम केले असताना यानंतर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पुन्हा रंगरंगोटीवर कोट्यावधी रूपयांचा चुराडा करण्यात आला. पूलाखाली काही उद्योजकांकडून सुशोभिकरण करण्यात आले. अद्याप ही कामे सुरू आहेत. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे डांबरीकामांमुळे पुलाच्या दुभाजकाची उंची रस्त्याच्या लेव्हलला मिळती जुळती झाल्याने नियमांचे उल्लंघन करत वाहने विरूद्ध  दिशेने जात आहेत. पुलाच्या दुभाजकाची कमी उंची कारणीभूत असल्याने काही वाहनधारक नियमांचे उल्लंघन करत असल्याने सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com