
लातूर (Latur) : लातूर व धाराशिव जिल्ह्यासाठी उपयुक्त असलेल्या माकणी (ता. लोहारा) येथील निम्न तेरणा प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर गाळ साठल्याने प्रकल्पाच्या पाणी साठवण क्षमतेत पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिकची तूट निर्माण झाली आहे तसा अहवाल जलसंपदा विभागाला प्राप्त झाला आहे. प्रकल्पात साठलेल्या गाळामुळे परराज्यात वाहून जाणारे हक्काचे पाणी तेरणा उपखोऱ्यात पुनर्स्थापित करण्यासाठी योग्य जागेची पाहणी करून अहवाल सादर करावा किंवा अतिरिक्त भूसंपादन करण्याऐवजी प्रकल्पाची उंची वाढवता येईल का, याचीही तपासणी करावी, असे आदेश राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krishna Vikhe Patil) यांनी दिले आहेत.
मंत्रालयात बुधवारी (ता. १२) आयोजित बैठकीत औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेल्या मागणीवरून विखे पाटील यांनी हे आदेश दिले. याच बैठकीत आमदार पवार पाठपुरावा करत असलेल्या मागण्यांचीही विखे पाटील यांनी दखल घेत अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले. निम्न तेरणा प्रकल्पातून मंजूर करण्यात बेलकुंड उपसा जलसिंचन योजनेचे सुधारित प्रशासकीय अंदाजपत्रक मार्चपूर्वी मंजुरीसाठी सादर करावे व या अंदाजपत्रकाला १५ एप्रिलपूर्वी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात यावी, नागझरी (ता. लातूर) परिसरातील परराज्यात वाहून जाणारे पाणी तावरजा प्रकल्पात आणण्याचा प्रकल्पाचा प्रस्ताव मार्चपूर्वी सादर करावा, तावरजा नदीवरील सेलू येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे नूतनीकरण काम करण्यासाठी १६ कोटींच्या प्रस्तावाला विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात यावी. तेरणा नदीवरील किल्लारी - एकोंडी रस्ता, किल्लारी - एकोंडी रस्त्यावरील पूल व कोकळगाव बॅरेजच्या बुडित क्षेत्रातील तेरणा नदीवरील कोकळगाव - कमलेवाडी रस्त्यावरील पूल बांधकाम करण्यासाठीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. जिल्ह्यात जलसंपदा विभागाचे चार कार्यालय असून प्रशासकीय सोयीसाठी हे चारही कार्यालय लातूर येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाला जोडण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी सादर करावा, किल्लारी भाग दोन येथे स्मशानभूमी उभारण्यासाठी जलसंपदा विभागाची जागा द्यावी, निम्न तेरणा व तावरजा प्रकल्पासह राज्यातील सर्व कालव्यांच्या बाजूचे सर्व्हिस रोड हे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याबाबत पाठपुरावा करावा, आदी मागण्यांवर विखे पाटील यांनी कार्यवाहीचे आदेश दिल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.
हक्काचे पाणी मराठवाड्याला द्या
दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कोयना प्रकल्पातील २५ टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय झाला होता, त्यानंतर प्रत्यक्षात २३.६६ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आणि आता त्यातील केवळ सात टीएमसी पाणी देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येत असून, मराठवाड्याच्या हक्काचे उर्वरित १६.६६ पाणी द्यावे, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात दरवर्षी पूर येतो. त्यात कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासाठी हालचाली सुरु केल्याने पुराचा धोका वाढतो. सदरील पुराचे पाणी माढ्यात आणण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असून, हे पाणी मध्यावरून तुळजापूरमार्गे तेरणा नदीपात्रात आणण्यात यावे, कळसूबाई शिखर परिसरातील वाहून जाणारे पाणी गोदावरी खोरेमार्गे मांजरा व तेरणा खोऱ्यात आणता येईल का याची तपासणी करावी, तेरणा प्रकल्प व कालव्यांची दुरुस्ती करण्यासाठी सादर केलेल्या अंदाजपत्रकांना मंजूर द्यावी आदी मागण्यांनाही विखे पाटील यांनी अनुकूलता दाखविल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.
अंतेश्वर उपसासिंचनसाठी प्रस्ताव द्या
याच बैठकीत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर व चाकूर तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या अंतेश्वर उच्च पातळी बंधारा ते रुद्धा बंधारा आणि रुद्धा बंधारा ते प्रस्तावित झरी साठवण तलाव या उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली. त्यावर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. ही योजना दोन टप्यांत होणार असून पहिला टप्पा अंतेश्वर उच्च पातळी बंधारा ते रुद्धा बंधारा व दुसरा टप्पा रुद्धा बंधारा ते प्रस्तावित झरी साठवण तलाव आहे. या योजनेच्या पाणी उपलब्धता प्रमाणपत्रास नाशिक येथील जलविज्ञान व धरण सुरक्षितताचे मुख्य अभियंता यांनी मंजुरी दिली आहे. या योजनेच्या ऊर्ध्वगामी नलिकेचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांनी योजनेतील धरण, बंधारा व पंपगृहाच्या सर्वेक्षण व अन्वेषण करण्याच्या कामास मंजुरी दिल्याची माहिती सहकारमंत्री पाटील यांनी दिली.