Sambhajinagar:मेल्ट्राॅन रूग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उपचार कधी

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : मेल्ट्राॅन रूग्णालयाकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे महापालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे. १६ जुन २०२० रोजी एमआयडीसीकडून कोवीड सेंटरसाठी ही इमारत ताब्यात घेण्यात आली होती. तेव्हापासूनच खराब रस्त्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. धक्कादायक म्हणजे आधीच खराब रस्ते, त्यात पथदिवे बंद असल्यामुळे रात्री अपरात्री कामावरून घरी परतणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना मद्यपींच्या मैफलीतून वाट काढावी लागत असल्याने मार्गावर छेडखाणीचे प्रकार होत असल्याचे एका विश्वसनीय सुत्रांकडून कळाले.

छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील मेल्ट्रान कोवीड सेंटरकडे जाणाऱ्या धुत हॉस्पीटल ते कोवीड सेंटर आणि चिकलठाणा विमानतळासमोरील जालनारोड ते कोवीड सेंटर या ९०० मीटर मी. रस्त्यांची गेल्या तीस ते ३५ वर्षापासुन अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता हेच कळत नाही. चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रांतर्गत येणाऱ्या या रस्त्याने प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले आहे. या रस्त्याने रूग्णवाहिका चालवणाऱ्या चालकांना आणि रूग्णांच्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर वाहनातील आधीच प्रकृती खराब असलेल्या रूग्णांना जिव मुठ्ठीत धरूण प्रवास करत रूग्णालयात भरती करावे लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्यात पावसाचे पाणी साचून स्विमींग पूलच तयार झाला आहे. मात्र याकडे आजपर्यंत ना एमआयडीसीने, ना महापालिकेने, ना लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले. त्यामुळे हे रस्ते गेल्या अनेक वर्षांपासुन रखडलेले आहेत. एखादा मोठा अपघात होऊन रूग्णांचा जीव गेल्यावरच संबंधित विभागाचे डोळे उघडतील का, असा प्रश्न रूग्ण आणि रूग्णांच्या नातेवाईकांना पडला आहेत.

चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील प्लाॅट क्रमांक बी -१- १‍ मेल्ट्राॅन ही इलेक्ट्राॅनीक वस्तुंचे उत्पादन करणारी मोठी नामांकीत कंपनी होती. मात्र, गेल्या कित्येक वर्षापासून कंपनी बंद पडल्याने महापालिकेचे तत्कालीन प्रशासक तथा आयुक्त आस्तीककुमार पांण्डेय यांच्या प्रयत्नाने येथे कोट्यावधी रूपये खर्चून कोवीड सेंटरची निर्मिती केली होती. पुढे कोवीड आटोक्यात आल्यानंतर येथे दैनंदिन ओपीडी, सिटीस्कॅन, एक्सरे, इजीसी इत्यादी सेवा महापालिकेमार्फत अत्यंत नाममात्र दरात रूग्णांसाठी पुरवल्या जातात.त्यामुळे इकडे रूग्णसंख्या अधिक वाढत आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर कारागृहात रवानगी करण्यापूर्वी येथे आरोपींची  कोवीड टेस्ट घेतली जाते त्यामुळे दररोज २५ ते ३० आरोपी येथे पोलिसांच्या वाहनातून आणली जातात. शिवाय इतरही शासकीय व निमशासकीय कर्मचारी, खाजगी कंपनीतील कर्मचारी सेवाभरती होण्याआधी येथे कोवीड टेस्टसाठी येत असतात. दररोज सकाळी १० ते १ दैनंदिन ओपीडीचे कामकाज सुरू असते. २४ तास रूग्णसेवेसाठी हे रूग्णालय खुले असते. दर्जेदार आणि नाममात्र दरात येथे सेवा मिळत असल्याने बरीच रूग्ण येथे उपचारासाठी येत असतात.

लवकरच येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रीया व स्त्री प्रसुतीगृहाची सोय केली जात आहे. यासाठी ऑपरेशन थिएटरचे युध्दपातळीवर कामकाज चालु आहे. त्यामुळे भविष्यात  येथे मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढणार आहे. चिकलठाणा, मुकुंदवाडी, नारेगाव, आदी भागातील शेकडो वसाहतींसह इतर असंख्य ग्रामीण भागातील रूग्ण हे कोवीड सेंटर व मल्टिस्पेशालिटी हाॅस्पीटल गाठण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे या रस्त्याने ग्रामीण व शहरी भागातील रूग्णांची मोठी वरदळ असते मात्र रस्त्यावर पडलेल्या खड्डे आणि त्यात साचलेल्या गढूळ पाण्याने रूग्णाची मोठी हेळसांड होत आहे. इनमिन ९०० मीटर रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी  महापालिका प्रशासकांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. या रस्त्याची दुरूस्ती तातडीने केल्यास धुत हाॅस्पीटल ते चिकलठाणा विमानतळासमोरून जालना रस्त्याची हलकी वाहतूक इकडून वळवता येईल व जालनारसत्याची कोंडी फूटण्यास मदत होईल. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com