

मुंबई (Mumbai): जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासह आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याच्या सूचना पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या आहेत. पुढील दोन वर्षांत जिल्ह्यातील ५०० जिल्हा परिषद शाळांचा दर्जेदार विकास करण्याचे नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
‘नवीन वर्षात नवी शाळा’ या संकल्पनेच्या माध्यमातून राज्याने आदर्श घ्यावा, अशा दर्जाचे काम जालना जिल्ह्यात करण्याचे आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले.
पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत जालना जिल्हा परिषद शाळांच्या विकासकामांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरिष बनसोडे, मनपा आयुक्त अंजली शर्मा यांच्यासह विविध अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
यापूर्वी १ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीतही पंकजा मुंडे यांनी जिल्हा परिषद शाळांचा आढावा घेतला होता. त्यावेळी शाळांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या अहवालावर बैठकीत चर्चा करून शाळांच्या विकासाबाबत पुढील दिशा निश्चित करण्यात आली.
निधी नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करण्याच्या सूचना
शाळा आणि अंगणवाड्यांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी नियोजनबद्ध, काटेकोर आणि परिणामकारक पद्धतीने खर्च करावा, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासोबतच विकासकामांचा दर्जाही उत्तम राखण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्ह्यातील शाळांचा विकास करताना आदर्श शाळेची संकल्पना केंद्रस्थानी ठेवावी. शाळांची आकर्षक रंगरंगोटी, उत्तम परिसर, आवश्यक पायाभूत सुविधा आणि दर्जेदार कामांवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
जालना जिल्ह्यात विकसित होणाऱ्या आदर्श शाळांचे अनुकरण राज्यातील तसेच इतर राज्यांतील शाळांनी करावे, अशा गुणवत्तेचे काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘नवीन वर्षात नवी शाळा’ अभियान
‘नवीन वर्षात नवी शाळा’ ही संकल्पना घेऊन संबंधित यंत्रणांनी अभियान स्वरूपात काम करावे, असे निर्देश पंकजा मुंडे यांनी दिले. शाळांच्या विकासकामांबाबत पुढील आढावा बैठक जालना येथे स्वतः घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण योजनांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचाही आढावा घेण्यात आला. या योजनांसाठी उपलब्ध निधी निर्धारित वेळेत खर्च करावा. मंजूर कामांना कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही, याची दक्षता घेऊन कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
Key Points
जालना जिल्ह्यातील ५०० जिल्हा परिषद शाळांचा पुढील दोन वर्षांत विकास करण्याचे नियोजन,
शाळांच्या विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याच्या पंकजा मुंडे यांच्या सूचना,
‘नवीन वर्षात नवी शाळा’ संकल्पनेतून अभियान स्वरूपात काम करण्याचे निर्देश,
शाळा आणि अंगणवाड्यांसाठी उपलब्ध निधी नियोजनबद्ध व परिणामकारक पद्धतीने खर्च करण्यावर भर,
पायाभूत सुविधा, रंगरंगोटी, परिसर सुशोभीकरण आणि कामांच्या गुणवत्तेला प्राधान्य,
मंजूर विकासकामे वेळेत पूर्ण करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना.