
औरंगाबाद (Aurangabad) : अंकई ते औरंगाबाद या ९८ किमी रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचा फायनल लोकेशन सर्व्हे बंगळूरच्या एका एजन्सी मार्फत जूनच्या शेवटच्या आठवड्यात पुर्ण करण्यात आला. यासाठी संबंधित एजन्सी आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या (South Central Railway) बांधकाम विभागामार्फत एक हजार कोटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
सदर दुहेरीकरणाचा प्रस्ताव 'दमरे' च्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या टेबलावर प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात दमरेकडे विचारणा केली असता मुख्य प्रबंधकांची मान्यता मिळाल्यानंतर पुढील आठवड्यात प्रस्ताव रेल्वबोर्डाकडे वित्तीय व तांत्रिक मान्यतेसाठी पाठवणार आहोत. त्यानंतर तातडीने टेंडर काढून या कामाला सुरूवात करणार असल्याचे अधिकारी म्हणत आहेत. यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा सतत पाठपुरावा सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अंकई ते औरंगाबाद या ९८ किमी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी ३ फेब्रुवारी रोजी फायनल लोकेशन सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर दमरेकडून सदर फायनल लोकेशन सर्वेक्षण करण्यासाठी बंगळूरच्या एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. कन्सल्टन्स कंपनीने पाच महिन्यात संपुर्ण सर्वेक्षण करून जुनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तसा वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दमरे’च्या नांदेड विभागाच्या या प्रयत्नांमुळे रेल्वे क्राॅसिंग होत असलेला त्रास आणि वाया जाणाऱ्या वेळेत बचत होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एक हजार कोटीचा प्रकल्प
'दमरे'च्या संबधित बांधकाम विभाग आणि एजन्सीने दूहेरीकरणासाठी एक हजार कोटीचे अंदाजपत्रक तयार केले आहे. आता या प्रकल्पाचा प्रस्ताव स्थानिक पातळीवर रेंगाळत न ठेवता तातडीने रेल्वे बोर्डाकडे पाठवावा अशी मागणी होत आहे. या प्रकल्पासाठी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात दक्षिण मध्य रेल्वेला ९ हजार १२५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यात पहिल्या टप्प्यात हा प्रकल्प पुर्णत्वास नेता येईल.
सहा महिन्यांपुर्वी दिली होती मान्यता
मुळात गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या परभणी-औरंगाबाद-अंकई या २९२ किमी अंतर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला रेल्वे मंत्रालयाने सहा महिन्यापूर्वीच ‘सर्वेक्षणासाठी’ मंजुरी दिली होती. दरम्यान त्यात पहिल्या टप्प्यात अंकई ते औरंगाबाद या ९८ किमी मार्गाच्या दुहेरीकरणाच्या सर्वेक्षण पुर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे किमान आता औरंगाबाद-अंकईपर्यंत रेल्वे प्रवास करण्यासाठी लवकरच दुहेरी मार्ग होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अशी आहे पुढील प्रक्रिया
पाच महिन्यात सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आता पुढील आठवड्यात दुहेरीकरणाचा विकास आराखडा पुढील आठवड्यात वित्तीय व तांत्रिक मान्यतेसाठी रेल्वे बोर्डाला सादर करण्यात येईल, अशी माहिती सोमवारी दक्षिण मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना दिली.