
औरंगाबाद (Aurangabad) : महापालिकेतील अधिकाऱ्यांची चुकी, त्यात सिडकोच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे सरकारी निधीतील एक व्यायामशाळा सिडकोच्या विक्रीयोग्य व्यावसायिक भुखंडावर बांधली. त्यावर महापालिकेने 'जीम' साहित्य देखील खरेदी केले. मात्र दहा वर्षात बांधलेल्या व्यायामशाळेचे कुलुपच उघडले नाही. आता उरल्या 'त्या' पाणी गळालेल्या भिंती, गळके छत महापालिकेतील क्रिडा अधिकाऱ्याने देखील तसदी घेतली नाही. आता व्यायामशाळेचे दारे, खिडक्या टेबल, पंख्यासह थेट जीमचे साहित्य लंपास झाले आहे. व्यायामशाळेच्या सर्व बाजूंनी उकिरडा झाला आहे.
महापालिका अधिकाऱ्यांचे नेमके कुठे चुकले
सिडकोची ना-हरकत न घेता तसेच जागेबाबत सिडकोचा अभिप्राय न घेता महापालिकेने सदर जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाला व्यायामशाळा बांधकामासाठी ना-हरकत दिली. ही चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने सिडकोचा अभिप्राय आणि ना-हरकत घेतली आहे का, याची विचारणा केली नाही. त्यात आपल्या विक्रियोग्य व्यावसायिक भुखंडावर व्यायाम शाळेचे बांधकाम होत असताना सिडकोच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. तब्बल दहावर्षानंतर सिडकोला जाग आली आणि त्यांनी दोन वर्षापूर्वी मालकी हक्काचा बोर्ड लावला. मात्र आता एकमेकाच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी कुणीही कुणावर कारवाई करत नाही. महापालिका, सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील या अजब कारभाराची गावभर चविष्ट चर्चा सुरू आहे.
काय आहे नेमके प्रकरण
सिडको एन-६ च्या संभाजी काॅलनीतील एका खुल्या भुखंडावर तत्कालीन आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या पुढाकाराने सरकारी निधीतून २२ लाख रूपये खर्च करून व्यायामशाळा बांधण्यात आली. या बांधकामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागातील उत्तर शाखेकडे होती. त्यात महापालिकेने देखील खारीचा वाटा उचलत लाखो रूपयाचे जीम साहित्य आणून टाकले. मात्र ही खुली जागा सिडकोच्या विक्रीयोग्य व्यावसायिक भुखंडासाठी आरक्षित होती. व्यायामशाळा बांधण्यासाठी महापालिकेने ना-हरकत प्रमाणपत्र दिले, पण प्रत्यक्ष सिडकोचा अभिप्राय घेतला नाही. परिणामी बांधकाम सिडकोच्या भुखंडावर करण्यात आले. सदर इमारतीचे बांधकाम झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने हस्तांतरीत केली. दर्डांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात उद्घाटन देखील करण्यात आले. मात्र व्यायाम शाळेत पहिलवान घडवण्यासाठी तालाच उघडला नाही.
एकाची तक्रार, परिणाम शुन्य
या संदर्भात सिडको एन-सहा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते मनिष नरवडे यांनी व्यायामशाळेच्या दशावताराबाबत तक्रार केल्यानंतर सिडकोने व्यायाम शाळेसमोर मालकी हक्काचा फलक लावला. महापालिका आयुक्तांना जागेबाबत पत्र व्यवहार करून व्यायाम शाळेची इमारत पाडण्यासाठी पत्र व्यवहार केला. मात्र पुढे तेरी भी चुप, मेरी भी चुप म्हणत कारवाई थंडावली. यात मात्र सरकार आणि महापालिकेचा लाखो रूपयांचा चुराडा झाला.