
छत्रपती संभाजीनगर (Ch. Sambhajinagar) : सावंगी बायपास ते वरूड हिरापूर फाटा या रस्त्यात कुठेही डांबर शिल्लक राहिलेले नाही. रस्त्या उचकटून खड्ड्यातील वर आलेली खडी आणि मोठमोठ्या भगदाडांमुळे या मार्गावर दररोज अपघात होत आहेत.
येथील ग्रामस्थांच्या तक्रारीवरून 'टेंडरनामा' प्रतिनिधीने गुरुवारी थेट सावंगी बायपास ते वरूड गावापर्यंत दुचाकीने प्रवास केला. त्यात गेली तीस ते पस्तीस वर्षांपासून हा रस्ता समस्यांच्या गर्तेत अडकून असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची पार चाळण झाली आहे. सद्यःस्थितीमध्ये रस्त्यामध्ये पडलेले खड्डे नव्हेच जागोजागी भगदाडात टायर अडकून वाहने पलटी होत आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जालनारोड ते हिरापूर - वरूड या रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. मात्र सावंगी बायपासला जोडणार्या या महत्त्वपूर्ण रस्त्यावरील वाहनांच्या वर्दळीचा विचार करता संपूर्ण रस्त्याचे खडीकरण - मजबुतीकरण आणि डांबरीकरण होणे गरजेचे आहे.
या भागातील आमदार तथा माजी विधान सभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चिकलठाणा ते महालपिंप्री पुढे फुलंब्री तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी २०१९ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विशेष रस्ते दुरुस्ती अंतर्गत तीन ते चार कोटीचा निधी मंजूर केला होता. तेव्हा सरकार बदलल्याने काम थांबल्याचे सांगितले जात होते. आता शिंदे आणि फडणवीस सरकार असताना काम का होत नाही, असा खोचक सवाल लोकांसह प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
वरूड गावातून सावंगी बायपास मार्गे सावित्रीनगर ते चिकलठाणा आठवडी बाजारात जा-ये करण्यासाठी याच रस्त्याचा वाहनचालकांकडून उपयोग केला जातो. खडी आणि भगदाडात अडकून वाहने कोसळण्याचे प्रकार घडत असताना त्यात वाढलेल्या वाहतुकीमुळे आणि मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची पार चाळण झालेली आहे. खड्ड्यांमधील खडी - दगड - गोटे वाहनांच्या वर्दळीमुळे उचकटून वर आले आहेत. त्यामुळे रस्ता खराब झाला आहे. परिणामी गरोदर महिला, रुग्ण, ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थी, तसेच नोकरदार वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
नागरिकांचा पुराच्या पाण्यातून प्रवास
विशेष म्हणजे याच मार्गावरील एका पुलाला खिंडार पडलेले आहे. पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात तो पाण्याखाली जातो. वरूड गाव ते सावित्रीनगर अन् चिकलठाणा ते सावंगी बायपासचा त्यामुळे संपर्क तुटतो. गत आठ वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत अर्धा पूल वाहून गेलेला आहे. मात्र असे असले तरी प्रत्येक पावसाळ्यात वरूड येथील नागरिक आपला जीव धोक्यात टाकून पुराच्या पाण्यातून ये - जा करत आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ओढ्याला पूर आल्यास नागरिकांचा गावाशी संपर्क तुटतो. तरीही छत्रपती संभाजीनगरात जा - ये करण्यासाठी या धोकादायक पुलाचा वापर केला जातो. प्रत्येक पावसाळ्यात पूल पाण्याखाली जातो, त्यातून जीव मुठीत धरून नागरिकांना प्रवास करावा लागतो.
दर पावसाळ्यात फलक लावून या पुलावरून प्रवास न करण्याची सक्त ताकीद संबंधित प्रशासन नागरिकांना देतो. पण रस्ता आणि पुलाच्या दुरूस्तीसाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याची खंत येथील महिलांनी व्यक्त केली.