15 वर्षांपासून कारगिल स्मृतीवन विस्मृतीत; आता 10 कोटींचे गाजर

15 वर्षांपासून कारगिल स्मृतीवन विस्मृतीत; आता 10 कोटींचे गाजर

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapagti Sambhajinagar) : महापालिकेनंतर जिल्हा सैनिक कार्यालयाने कारगिल स्मृतीवनाकडे पाठ दाखवल्यामुळे गत १५ वर्षांपासून मैदान मोकळे आहे. ओसाड मैदान आणि सताड तुटलेले उघडे प्रवेशद्वार यामुळे दिवसरात्र उनाड आणि टवाळखोरांच्या ओपन मधुशाळा अन् जुगार अड्ड्यांसह अवैध धंद्यांना वैतागलेल्या आसपासच्या नागरिकांनी सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे तक्रार केली. संतापलेल्या सावेंनी थेट महापालिका प्रशासक तथा आयुक्त डाॅ. अभिजित चौधरी यांच्यासोबत पाहणी केली.

15 वर्षांपासून कारगिल स्मृतीवन विस्मृतीत; आता 10 कोटींचे गाजर
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसची वेळ बदलणार; कारण...

दरम्यान, मैदानासमोरच कचऱ्याचे ढिग पाहून चौधरी यांचा पारा सरकला त्यांनी तातडीने घनकचरा व्यवस्थापक प्रमुख सोमनाथ जाधव यांना ढिगाऱ्यांची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले. सोबतच येथे कायमस्वरुपी सुरक्षारक्षकाची नेमणूक देखील केली. त्यानंतर पर्यटन विभागाने कारगिल मैदान विकसित करण्यासाठी दहा कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा सावे यांनी केली.

सावे आणि चौधरींच्या पाहणी दौऱ्यानंतर टेंडरनामा प्रतिनिधीने मैदान परिसराची पाहणी केली, त्यात कचरा उचलण्यात आलेला दिसून आली नाही. मात्र कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करताना पथक दिसले. पथक बाहेर कारवाई करत असताना ओसाड मैदानात उनाडांचा जत्था कायम दिसला.

सुरुवातीला महापालिका प्रशासनाला सात वर्षांमध्ये कारगिल स्मृतीवनाचा विकास करता आला नाही. त्यानंतर ही जागा जिल्हा सैनिक कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर एका खाजगी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करून सविस्तर प्रकल्प विकास आराखडा तयार करण्यात आला. त्यात कारगिल युध्दात शहिद जवानांचे म्युरल्स, माहिती, फूड प्लाझा व काही बाबींचा समावेश करण्यात आला होता. मात्र आजपर्यंत तो विकास आराखडा कागदावरच असून कारगिल स्मृतिवन विकसित झालेच नाही.

15 वर्षांपासून कारगिल स्मृतीवन विस्मृतीत; आता 10 कोटींचे गाजर
Old Mumbai-Pune हायवेवरही आता पाळावी लागणार लेनची शिस्त, अन्यथा...

परिणामी या ओसाड मैदानात रात्री तळीरामांचा अड्डा जमतो आहे. जे पालिकेच्या ताब्यात असताना झाले, तेच आर्मीच्या अनुशासनात होऊ लागल्याने ती जागा ओसाड पडू लागली आहे. यंत्रणा कुठलीही असो, इच्छाशक्तीविना काहीही होत नसल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे.

१९९९ साली कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ गारखेडा परिसरातील विजयनगर समोरील आर. बी. हिल्स कालीका मातामंदीर लगत कारगिल स्मृतीवन निर्माण करण्याचा निश्चय महापालिकेने २००७ मध्ये केला होता. मात्र २०१३ पर्यंत महापालिकेने काहीही न केल्यामुळे आर्मीने जागेचा ताबा घेतला. परंतु आर्मीने देखील त्या स्मृतीवनाच्या निर्मितीकडे कानाडोळा केल्याचे दिसते आहे. 

कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात येणारे कारगिल स्मृतीवन मनपाच्या विस्मृतीत गेल्याने आर्मीच्या ताब्यात देण्यासाठी माजी नगरसेवक पंकज भारसाखळे आणि तत्कालीन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दहा वर्षांपूर्वी निर्णय घेतला होता. कारगिल युद्ध विजयाला २६ जुलै २०२३ रोजी २४ वर्षे पूर्ण होत आहेत.

तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांच्या उपस्थितीत गारखेडा परिसर आर. बी. हिल्सच्या शेजारी ३ एकर जागेमध्ये कारगिल स्मृतीवन भूमीपूजनाचा कार्यक्रम २००७ मध्ये झाला होता. २० लाख रुपये खर्चून हे स्मृतीवन विकसित करण्याची घोषणा त्यावेळी त्यांनी केली होती. २६ जानेवारी २००९ पर्यंत हे स्मृतीवन शहरवासीयांना पाहायला मिळेल, असा दावा गुप्ता तसेच तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी केला होता.

मात्र २००९ मध्ये महापालिकेने उद्यानासाठी काढलेले टेंडर रद्द झाले. मनपाची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे या स्मृतीवनाच्या कामाकडे दुर्लक्ष झाले. या स्मृतीवनाच्या निर्मितीत ज्यांचे योगदान लाभणार होते, त्यातील काही जणांचे निधन झाले. २०१४ मध्ये माजी नगरसेवक भारसाखळे, तत्कालीन आयुक्त डॉ. कांबळे यांच्या मध्यस्थीने ती जागा संचालक, सैनिक कल्याण मंडळ यांच्याकडे देण्यात आल्यावर शिवसेना-भाजप असा वादही निर्माण झाला. २०१४ मध्ये त्या जागेत मंडळातर्फे एक खोली बांधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. २०१५ व २०१६ मध्ये तेथे कुठलाही कार्यक्रम झाला नाही. २०१७ व २०१८ सालीदेखील कुठल्याही कार्यक्रमाचे नियोजन नव्हते. यावर्षीही कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन तेथे नाही. 

15 वर्षांपासून कारगिल स्मृतीवन विस्मृतीत; आता 10 कोटींचे गाजर
Sambhajinagar : 300 कोटी खर्चूनही बीड बायपासकरांचा प्रवास धोकादायक

आर्मीकडे कारगिल स्मृतीवन स्थापत्य विषयक कामांची तसेच उद्यानाची कामे पाहण्यासाठी अधिकारीच उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. दरम्यानच्या काळात मेजर कुलथे यांनी राजीनामा दिल्यानंतर पुण्यातील अधिकाऱ्याकडे पदभार देण्यात आला. कॅप्टन जगताप यांच्याकडे पदभार आल्यानंतर त्यांनी स्मृतीवन विकसित करण्यासाठी हालचाली केल्या; परंतु त्यांचीही बदली झाली. कर्नल जतकर यांनी सीएसआरमधून निधी उपलब्ध केला. टेंडर प्रक्रिया सुरू केली. मात्र माहिती अधिकाराच्या फेऱ्यात ते टेंडर रखडले.

कारण पे कारण

स्मृतीवन विकासाचा मास्टर प्लॅन तयार आहे. परंतु देखरेखीसाठी अधिकारी नाही. रिएम्लॉयमेंटच्या सिस्टीममधून अधिकारी, कर्मचारी आर्मीला मिळतात. त्यांना ४ ते ५ वर्षे काम करण्याची संधी मिळते. त्यातही त्यांची बदली होत असल्याने या कामाकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. दरम्यान, माजी नगरसेवक पंकज भारसाखळे यांनी सांगितले, २४ जुलै २०१९ रोजी पुण्यात बैठक घेतली होती. बैठकीतून परतल्यावर त्यांनी येत्या काही महिन्यांत स्मृतीवन विकासाचे काम सुरू होईल, असे सांगितले होते पण पुढे आर्मीने केंद्र सरकार निधी देत नसल्याचे म्हणत हात वर केले.

आता पर्यटन विभागाचे आश्वासनांचे गाजर

गत १५ वर्षांपासून कारगिल उद्यान उभे करण्यासाठी केवळ आश्वासनांचा पाऊस सुरू आहे. आता यासाठी पर्यटन विभागाने दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे आश्वासन पुढे करण्यात आले आहे. गत सोमवारी १० एप्रिल रोजी  सहकारमंत्री अतुल सावे, महापालिका  प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी जागेची पाहणी केली होती.

दरम्यान आता पर्यटन विभागाने दहा कोटींचा निधी मंजूर केल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दोन टप्प्यात वितरीत होणाऱ्या निधीतून वर्षभरात या उद्यानाचे काम पूर्ण होईल, असेही महापालिकेने स्वप्न दाखवले आहे. शहीद जवानांच्या स्मरणार्थ उभे करण्यात येणार असलेल्या या उद्यानात सतत तेवत राहणारी अमरज्योती, युद्धात वापरलेल्या तोफा, रणगाडे आदी साहित्य ठेवण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळेल, अशा पद्धतीने हे उद्यान विकसित केले जाईल, असे महापालिकेचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com