
औरंगाबाद (Aurangabad) : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ॲथेलेटीक ट्रॅक बांधकामातील कोट्यावधीच्या प्रक्रियेत टेंडर विभागातील लिपिक आणि विभागीय कार्यालयाने कशा पद्धतीने मेहरबानी दाखवली त्याचा भांडाफोड केला. त्यानंतर टेंडरमधील अटीनुसार जाॅईंट व्हेंचरचे नोंदणीकृत प्रमाणपत्र टेंडर सबमिशन करताना आवश्यक होते. मात्र ठेकेदाराकडे नसताना देखील त्याला पात्र कसे करण्यात आले, असा धक्कादायक सवाल करत जागतीक बँक प्रकल्पाच्या (WBP) अधिकाऱ्यांसमोर करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ॲथेलेटीक सिंथेटिक ट्रॅकचे बांधकाम करणेबाबत टेंडरमध्ये घोळ झाल्याचे टेंडरनामाने यापूर्वी उघड केले होते. या प्रकरणी सर्व अपात्र कंत्राटदारांना सार्वजनिक बांधकाम मंडळ विभाग आणि जागतिक बँक प्रकल्प शाखेकडून न्याय न मिळाल्याने अखेर त्यांनी टेंडरनामाकडे कैफियत मांडली होती. याच प्रकरणी आ. प्रशांत बंब यांच्यासह अनेकांनी कारभार्यांच्या चौकशीचा ससेमिरा लावलेला आहे. मात्र विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. यात एका राजकीय नेत्याचा छुपा आशिर्वाद असल्याचा आरोपही नाराज ठेकेदारांनी केला आहे. यासंदर्भात तक्रारदार प्रसाद आशन्ना यांच्याकडून मिळालेल्या माहीतीनुसार मर्जीतल्या ठेकेदाराला काम मिळावे, यासाठी टेंडर सबमिशनची अंतिम तारीख २६ सप्टेंबर २०२२ असताना ३ ऑक्टोबर २०२२ करण्यात आली.जे की टेंडरच्या अटीशर्तींचा भंग कारभार्यांनीच केल्याचे ते म्हणाले.
हा खरा संशोधनाचा विषय
विद्यापीठात शिवाजी महाराज पुतळा आणि इतर कामांसाठी व्ही. टी. पाटील कंपनी आणि मस्कट कंपनीने टेंडर भरले होते. ते सुध्दा जागतिक बँक प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी अतुल पाटील यांना ०.९९% दराने दिले. यापेक्षा मस्कट कंपनीने सर्वाधिक कमी दराने टेंडर रद्द करण्यात आले होते. व्ही. टी. पाटील कंपनी अतुल पाटीलला सपोर्टेड होता. पाटील यांना काम मिळावे यासाठी व्ही. टी. पाटील यांचे टेंडर रद्द केले नव्हते. जागतिक बँक प्रकल्पाचे अधिकारी विद्यापीठातील सगळे टेंडर अतुल पाटीलचेच का पात्र ठरवतात. दुसऱ्या कोणत्याही ठेकेदारांना अपात्र ठरवतात. विशेष म्हणजे कमी दराने भरलेले टेंडर अपात्र करून सरकारच्या कोट्यावधी रूपयांचे नुकसान करतात. मात्र अतुल पाटील यांचेच ०.९९% दराचे टेंडर का पात्र ठरवतात, ॲथॅलेटीक्स ट्रॅकच्या संदर्भात देखील सहा टेंडर आले होते. यातील सर्वात कमी टक्के दराचे टेंडर अपात्र केले आणि अतुल पाटील यांनाच नेहमीप्रमाणे ०.९९% दराचे टेंडर पात्र केले. यामागे कुणाचा छुपा आशिर्वाद आहे, याची चौकशी करणे गरजेचे आहे, तशी आमची मागणी आहे. येथे न्याय मिळाला नाही, तर आम्ही न्यायालयात जाण्याची तयारी करत असल्याचे आशन्ना म्हणाले.
मीच पात्र आहे : अतुल पाटील
ट्रॅकच्या बांधकामाचा अनुभव असलेला ठेकेदार येथे हवा होता. मी ज्या कंपनीला जाॅईंट व्हेंचर केले आहे, त्याने १६ एमएम जाडीचा ट्रॅक परदेशात बांधला आहे. त्याच्याकडे जागतिक ॲथॅलेटिक्स कमिटीचे प्रमाणपत्र आहे. याच धर्तीवर विद्यापीठात ४०० मीटर ट्रॅकच्या बांधकामासाठी अनुभवी ठेकेदार हवा होता. टेंडर खुले करण्याआधी बैठकीत देखील अधिकार्यांनी सगळ्यांना सांगितले होते. नाराज ठेकेदारांच्या तक्रारीत काहीही तथ्थ नाही.मुळात आशन्ना यांचा या प्रकरणात काहीही संबंध नाही. याकामासाठी कुठलेही अर्थकारण नाही. नियमानुसारच टेंडर प्रक्रीया झाली आहे.