'एलईडी'चा ठेकेदार सरकारच्या दिमतीला; मंत्र्यांसाठी 4 कोटींची रोषणाई

LED Sambhajinagar
LED SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरात मोठा गाजावाजा करून लावण्यात आलेले एलईडीचे दिवे अनेक वसाहतीत बंद पडले आहेत. त्यामुळे हे काम करणाऱ्या एलईडीच्या ठेकेदाराला केवळ मंत्र्यांच्या दिमतीसाठी व्हीआयपी मार्गावरच जुंपले आहे काय,  असा सवाल उपस्थित होत आहे. शहरातील ९ झोनमधील ११५ वार्डातील अनेक दिवे बंद असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रतिनिधीने सलग तीन दिवस त्या-त्या भागात जाऊन पाहणी केली असता प्रत्येक भागातील मुख्य रस्ते, अंतर्गत वसाहती, मुख्य चौक आणि बाजारपेठेत ऐन सणासुदीच्या काळात अंधार दिसल्याचे उघड झाले. मात्र चिकलठाणा ते हर्सुल टी पाॅईट, चिकलठाणा विमानतळ ते महावीर चौक ते दिल्लीगेट ते हर्सुल टी पाॅईंट या मार्गावर तब्बल चार कोटी रूपये खर्च करून मंत्र्यांच्या स्वागतासाठी रोषणाई करण्यात आलेली दिसते. म्हणजेच सामान्यांसाठी एक न्याय आणि मंत्र्यासाठी वेगळा न्याय का, असे चित्र शहरात उमटत असल्याचे दिसले.

LED Sambhajinagar
EXCLUSIVE : आमदार अण्णा बनसोडे यांनी आरोप केलेले चंद्रकांत गायकवाड आहेत तरी कोण?

महापालिकेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील पथदिव्यांचे नुतनीकरण करून बिओटी तत्वावर एलईडी फिटींग लावण्याचे टेंडर २०१४ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त डाॅ. हर्षदीप कांबळे यांच्या काळात प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यात आठ टेंडरची विक्री झाली होती. त्यापैकी तीन टेंडरधारकांनी सहभाग घेतला होता. यात इलेक्ट्राॅन लायटींग सिस्टीम्स प्रा. लि. आणि पॅरागाॅन केबल इंडिया (जाॅईंट व्हेंचर) पाॅलीकॅब वायर्स प्रा. लि. मे. शहा इन्व्हेस्टमेंट फायनान्सीएल डेव्हलपमेंट ॲन्ड कंन्सट्रक्शन कं. लि आणि कंन्ट्रोल ऑटोमेशन प्राजेक्टस् प्रा.लि. (जाॅईंट व्हेंचर) आदींचा समावेश होता. इच्छुक टेंडरधारकांपैकी टेंडरसोबत दाखल केलेले कागदपत्रांची टेक्नीकल बिड तत्कालीन आयुक्त कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीसमोर ओपन केले असता पाॅलीकॅब वायर्स प्रा. लि. मे. शहा इन्व्हेस्टमेंट फायनान्सीएल डेव्हलपमेंट ॲन्ड कंन्सट्रक्शन कं. लि आणि कंन्ट्रोल ऑटोमेशन प्राजेक्टस् प्रा.लि. (जाॅईंट व्हेंचर) यांनी टेंडरमधील अटी व शर्तीनुसार फिलीप्स, बजाज , क्राॅम्प्टन तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग मान्यता प्राप्त एलईडी  फिटींगचे कागदपत्र सादर न केल्याने त्यांच्या टेंडरचा विचार करण्यात आला नव्हता.

LED Sambhajinagar
Sambhajinagar : मंत्रिमंडळ बैठकीच्या तोंडावर उपसा सिंचन योजनेचे निघाले टेंडर

टेंडरमधील सर्व कंत्राटदारांचे एलईडी दिव्यांचे नमुने टेंडरमधील अटीनुसार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या लॅबमध्ये तांत्रिक तपासणीसाठी पाठविण्यात आले असता  इलेक्ट्राॅन लायटींग सिस्टीम्स प्रा.लि. आणि पॅरागाॅन केबल इंडिया (जाॅईंट व्हेंचर) यांनी सादर केलेल्या फिटींगचा तांत्रिक अहवाल टेंडरच्या अटी व शर्तीनुसार असल्याने त्यांना हे काम देण्यात आले. कंपनीने बीओटी तत्वावर या संपुर्ण प्रकल्पासाठी शहरात ८६ कोटी ९३ लाख १७ हजार ४०० रूपयांचे ४० हजार दिवे लावले. सोबतच केबल, कन्ट्रोल पॅनल, जक्शन बाॅक्स, पोल यापायाभुत सुविधांसाठी २५ कोटी २८ लाख ५० हजार ६८० रूपये खर्च दाखविण्यात आला. या प्रकल्पाची एकून किंमत ११२ कोटी २१ लाख ६८ हजार ८० रूपये होती. बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर ९६ महिन्यासाठी ठेकेदार कंपनीत देखभाल दुरूस्ती करावी. यामाघे त्याला महापालिकेकडून दरमहा ईएमआय म्हणून २ कोटी ७२ लाख दिले जातात. यात प्रति फिटींग ९५ रूपयाचा दर आकारला जातो. असे असतांना शहरातील बहुतांश भागात अंधार का ? असा सवाल करताच कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक परमेश्वर बनसोडे यांनी काही भागात लाईट गेल्यावर दिवे बंद राहत असल्याचे कारण पुढे केले आहे. मात्र लाईट असल्यावर देखील दिवे बंद असल्याचे आमच्या पाहणीत समोर आल्याचे "टेंडरनामा" प्रतिनिधीने प्रतिउत्तर देताच बनसोडे यांनी काही भागात रस्त्यांची कामे चालु असल्याने दिवे बंद राहत असतील असे कारण पुढे करत मंत्रीमंडळाची बैठक झाल्यावर प्रत्यक्ष पाहणी करायचे आश्वासन दिले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com