
औरंगाबाद (Aurangabad) : टेंडरनामाच्या वृत्तानंतर पीडब्लुडीचे अधीक्षक अभियंता दिलीप बडे तसेच मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे हे पूलाच्या डिझाईनसह पूलाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर त्रयस्थ समितीमार्फत पूलाच्या बांधकामाची चौकशी केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना दिली. विशेष म्हणजे येथील पूलाच्या सदोष बांधकामाबाबत भाजपचे माजी महापौर प्रशांत देसरडा यांनी थाट न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे पूल पाडून नव्याने बांधण्याची सातारा-देवळाईकरांची मागणी कायम आहे. आता यावर अधिकारी नेमकी कोणती कारवाई करतील याकडे टेंडरनामाचे लक्ष आहे.
बीडबायपास येथील संग्रामनगर चौकातील सदोष डिझाईन असलेल्या उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाला आले आहे. पूल झाल्यानंतर पूलाखालून अवजड वाहने ओलांडताना मोठी कसरत होणार आहे. कारण पूलाची उंची अत्यंत कमी ठेवण्यात आली आहे. पूलाचे काम झाल्यानंतर नियोजनशून्य कारभार उघड्यावर येऊ नये. यासाठी कारभाऱ्यांनी पूलाखालचे रस्ते खोदण्याचा जुगाड करत उंची वाढवण्याचा केविलवाणा प्रकार केला. यावर टेंडरनामाने वृत्त प्रकाशित केल्यानंतर पीडब्लुडीचे अधीक्षक अभियंता दिलीप बडे यांनी पूलाखालच्या आणि वरच्या रस्त्यांची उंची लेव्हलमध्ये घेत असल्याचे कारण पुढे करत पूलाची उंची बरोबर असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिनिधीने खरे तांत्रिक कारण पुढे करत बडे यांचा मुद्दा खोडुन काढला. त्यानंतर त्यांनी या पूलाचे डिझाईन मागवतो, सखोल अभ्यास करतो, सविस्तरपणे चौकशी करतो आणि मगच योग्य तो निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले. दुसरीकडे पूलाच्या डिझाईनसह प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्याची ग्वाही मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना दिली. दुसरीकडे जर हा पूल पाडून नव्याने बांधला नाही, तर या भागातील नागरिकांची मोठी अडचण होऊ शकते. असे संघर्ष समितीचे आबासाहेब देशमुख, सोमीनाथ शिराने, पद्मसिंह राजपूत, असद पटेल यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पूलाचे बांधकाम तोडुन नव्याने पूल बांधण्याची त्यांची मागणी कायम आहे. विशेष म्हणजे शहरातील भाजपचे माजी महापौर प्रशांत देसरडा याप्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
असा होईल परिणाम
● पूल तसाच ठेऊन खालुन बोगदा केल्यास पूलाखाली पावसाचे पाणी साचेल. पावसाचा निचरा करण्यासाठी स्ट्राॅम वाॅटर यंत्रणा केली. तरी वाहने बोगद्यात साचलेल्या पाण्यातून कशी जाणार. पूलाखाली खोदकाम करून उंची वाढवण्याचा प्रयत्न केल्यास या भागातील नागरिकांची मोठी अडचण होऊ शकते. त्यामुळे संग्रामनगर चौकातील पूल पाडूनच नव्याने पूल तयार करावा असे तज्ज्ञांचे देखील मत आहे.
● पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा संग्रामनगर चौकातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल. मात्र जिथे पुलाखाली क्रॉसिंग असेल त्याची खालच्या रस्त्यापासून तर पूलाच्या बाॅटमपर्यंत किमान साडेआठ मीटर उंची असायला हवी. बीडबायपास हा आसपासच्या पंचक्रोशीला जोडणारा रस्ता आहे. इतक्या कमी उंचीत कापसाचा ट्रक, गॅसची वाहतूक करणारी वाहने, सार्वजनिक अन्नपुरवठा विभागाची वाहने, शालेय बसेस देखील सद्यस्थितीत जाऊ शकत नाहीत. बोगद्यातून पुढे चढावर ही वाहने कशी चढतील. भविष्यात येथे मोठ्या अपघाताच स्पाॅट तयार होईल.
● बीडबायपासवरील संग्रामनगर चौकातील सदोष उड्डाणपूल या भागातील नागरिकांसाठी मोठी अडचण निर्माण करू शकतो. पूलाची उंची अशीच ठेऊन खालुन रस्ते पोखरण्याचा प्रयत्न केला तर हे वाहनांच्या अपघातासह वाहतूकीवर मोठा विपरित परिणाम होऊ शकतो. बोगद्यातून जाणे-येणे करणे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही योग्य ठरणार नाही.