Aurangabad: रखडलेल्या 'त्या' उड्डाणपुलाचा प्रश्न कधीमार्गी लागणार?

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : मागील पाच तपापासून मागणी करूनही दीडशेहून अधिक बैठका, निवेदने देऊनही आजी-माजी लोकप्रतिनिधींकडून फक्त आणि फक्त आश्वासनांची खैरात मिळाली. आता रेल्वेस्टेशन एमआयडीसीतील 'त्या' पाच तपापासून रखडलेल्या उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागणार लावणार, असे आश्वासन औरंगाबाद मनपाचे प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी प्रजासत्ताक दिनानंतर दिले आहे. मागचा अनुभव पाहता आता चौधरींच्या आश्वासनावर औरंगाबादकरांचा विश्वास बसत नाही. कारण येथे उड्डाणपूल उभारायचा झाल्यास मनपाला कोट्यवधींची तरतूद करावी लागेल.

Aurangabad
Garbage Project : भंडार्ली घनकचरा प्रकल्पासाठी ३ कंपन्यांचे टेंडर

यासंदर्भात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांण्डेय, पालकमंत्री संदीपान भुमरे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत एकत्रित बैठका घेऊन प्रशासकांनी एमआयडीसी, रेल्वे आणि मनपा अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय घडवून आणला तरच येथे उड्डाणपूल बांधने शक्य होईल.

औरंगाबादचा विस्तार गत पाच तपापासून महानगराच्या दिशेने सुरू झाला आहे. मात्र, बीड बायपासपलीकडे उभ्या राहिलेल्या नव्या वसाहतींना शहराशी जोडणारा रेल्वेस्टेशन एमआयडीसीचा ११.७ मीटर रूंदीचा उड्डाणपूल फक्त कागदावरच उभा राहतोय. रेल्वे व्यवस्थापन, एमआयडीसी आणि मनपातील समन्वयाच्या अभावामुळे हा पूल गेल्या ५० वर्षांपासून रखडला आहे. तब्बल १५० हून अधिक बैठका आणि १५० पेक्षा अधिक निवेदने दिली, तरीही आजपर्यंत येथील लोहमार्गावरील उड्डाणपुलाचे काम मार्गी लागलेले नाही. परिणामी, सुमारे तीन  लाख लोकसंख्येच्या या परिसरातील नागरिकांना व औद्योगिक कर्मचा-यांना रोज वाहतुकीच्या समस्येचा सामना करावा लागतोय.

Aurangabad
NashikZP: जलजीवन योजनेचा आराखडा ग्रामपंचायतींना देण्याचा आदेश

औरंगाबादेतील सातारा रेल्वेस्टेशन एमआयडीसी हे शहरातील सर्वात जुने औद्योगिक क्षेत्र आहे. बारा वर्षापूर्वी औरंगाबाद सहकारी औद्योगिक वसाहतीने सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले होते. निर्लेप, ग्राइंड मास्टर आणि त्रिमूर्ती फूडस् यांसारखे अनेक नामांकित उद्योग येथे कार्यरत आहेत. सरकारी वखार महामंडळ, मोठमोठे सिमेंट गोडाऊन या वसाहतीत आहेत. यापूर्वी येथ एकूण उद्योगांची संख्या ६० होती. १९८२ मध्ये मनपाच्या अस्तित्वानंतर या वसाहतीच्या देखभालीची जबाबदारी पालिकेकडे आली. त्यामुळे एमआयडीसी सोबतच पालिकेकडेही या भागाला सोयी पुरविण्याची जबाबदारी आहे.

लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांसह आश्वासने बदलतात

यापूर्वी मनपा, रेल्वे प्रशासन आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत सीएमआयएने अनेकदा बैठका घेऊन हा प्रश्न उपस्थित केला. परंतु एक तर मागील बैठकीत असणारा अधिकारी , लोकप्रतिनिधी तरी बदललेला असतो किंवा तिन्हीपैकी एका खात्याचे अधिकारी बैठकीस अनुपस्थित असतात. आता मनपा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी गत पाच तपापासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र यात रेल्वे, एमआयडीसी आणि मनपा या तिन्ही खात्यांचा समन्वय आवश्यक असणे गरजेचे आहे, तरच आता मुद्दा पुढे सरकायला मदत होईल.

असा आहे समस्यांचा डोंगर

उस्मानपुऱ्यातील मिलिंदनगर फुलेनगर ते रेल्वेस्टेशनरोड दरम्यान देवगिरी महाविद्यालयासमोरून आयटीआय ते निर्लेफ कंपनीसमोरून रेल्वेस्टेशन एमआयडीसीतून रेल्वेमार्ग गेलेला आहे. रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूंना कंपन्या आहेत. शहराचा विकास झाल्यानंतर बीड बायपास परिसरात मोठी वसाहत उभी राहिली. अजूनही या वसाहतीचा विकास होत आहे. अंदाजे ३ लाख लोकवस्ती या भागात झाली आहे. तसेच एमआयडीसीचे काही युनिट्स येथे असल्याने कामगार, कमचाऱ्यांसह मालाची वाहतूक करण्यासाठी दररोज हजारो वाहने येथे येतात. शिवाय एमआयटी कॉलेज, रामकृष्ण आश्रम आणि कमलनयन बजाज सारखी वर्दळीची ठिकाणे असल्याने या सर्वांना शहरात येण्याजाण्यासाठी संग्रामनगर आणि रेल्वेस्टेशन उड्डाणपूल हे एकमेव मार्ग असल्याने त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा खोळंबा होतो.

अनेकदा बंद होते रेल्वेगेट

दरम्यान, चिकलठाणा शिवाजीनगर, फुलेनगर आणि बाळापूर येथे अद्याप भुयारीमार्ग नाही. दरम्यान येथील रेल्वे रुळांवरून दिवसाकाठी अनेच प्रवासी रेल्वेगाड्या, व मालवाहतूक करणाऱ्या गाड्या ये-जा करतात. शिवाय रूळ दुरुस्त करणाऱ्या ट्रॉली, शंटिंगचे इंजिन अशा विविध प्रसंगी दिवसातून किमान ४० वेळा हे फाटक बंद केले जाते. दरवेळी किमान १५ ते २० मिनिटांच्या हिशेबाने दिवसात ४०० ते ५०० मिनिटे ते बंद असते. यामुळे या भागात वाहतूक खोळंबते. फाटक उघडल्यानंतर दोन्ही बाजूंच्या वाहनचालकांत रूळ ओलांडण्यासाठी स्पर्धाच लागते. यामुळे अनेकदा वाहनचालकांमध्ये बाचाबाची होते. गेल्या कित्येक वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी हा उड्डाणपूल होणे आवश्यक आहे.

उड्डाणपुलाची सद्यःस्थिती

आयटीआय ते निर्लेप दरम्यान लोहमार्गावर उड्डाणपूल बांधण्यात यावा, ही मागणी तशी ५० वर्ष जुनीच आहे. एमआयडीसीने हा भाग मनपाकडे हस्तांतरित केल्यानंतर इथल्या रस्त्याची दुरुस्ती, पथदिवे, स्वच्छता, नाले, गटारीची देखभाल अशा सर्वच सुविधा पुरविण्याची जबाबदारी पालिकेकडे गेली. पुर्वी ही जबाबदारी एमआयडीसीची होती. या बाबी मनपाकडे हस्तांतरित पूर्ण झाल्या असल्याची खातरजमा औद्योगिक विकास मंडळाने करायला हवी होती.

Aurangabad
Bullet Train : BKCसाठी 1800 कोटींच्या टेंडरला 'या' तारखेचा मुहूर्त

उद्योगांवर परिणाम

येथील कंपन्यांमध्ये बाहेरून येणाऱ्या डेलीगेटला अनेकदा रेल्वे जात असताना फटकावर अडकवून पडावे लागते. बरेचदा रुग्णवाहिका येथे अडकतात. पटरीखालील रस्ता अरुंद असल्याने वाहतूकीचे कंटनेर्स येथे पोहचण्यात अडचण निर्माण होते. त्यामुळे उद्योग जगतावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. एकेकाळी सोन्याचा धुर निघत असलेल्या या उद्योगपंढरीत आज बोटावर मोजण्या इतकेही उद्योग नसल्याचे टेंडरनामा पाहणीत समोर आले आहे. 

नुस्त्याच बैठका, आश्वासनांची खैरात

हा उड्डाणपूल व्हावा यासाठी सीएमआयए तसेच औरंगाबाद सहकारी औद्योगिक वसाहतीने सातत्याने पाठपुरावा केला. आजदेखील ते पाठपुरावा करीत आहे. ११.७ मीटर रुंदीच्या या रस्त्यासाठी गेल्या ५० वर्षांत १५० बैठका आणि त्याहून अधिक निवेदने दिली गेली. एमआयडीसीच्या स्थानिक अधिकाऱ्यांपासून मुंबईपर्यंत, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, उद्योग सचिव, मनपा आयुक्त, रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक आणि सिकंदराबाद येथे बसणारे दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एवढ्या व्यापक स्तरावर प्रयत्न करुनही हा पूल कशामुळे रखडला हे कळायला मार्ग नाही.

मा. खा. खैरेंच्या प्रयत्नांना खिळ

मा.खा. चंद्रकांत खैरे यांनी येथील उड्डाणपुलासाठी आग्रह धरला होता. त्यांनी एमआयडीसी, सीएमआयए, मनपा आणि इतर अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या होत्या. मनपाने देखील निधी देण्यास तयारी दर्शवली होती ; पण एमआयडीसी निधी देण्यास नकार देत आडकाठी आणली होती. आजही ते उलटा लोटा दाखवत आहेत. माजी महापौर विजया रहाटकर आणि तत्कालीन  मनपा आयुक्त डाॅ. पुरूषोत्तम भापकर यांच्या काळात बारा वर्षापूर्वी निर्लेप कंपनी ते शाहशोक्ता दर्गाह व कब्रस्तान ते बीडबायपास पर्यंत रस्ता वाढवण्यात आला. मे.रे. कन्सट्रक्शन कंपनीमार्फत रस्त्याचे काम देखील पूर्ण करण्यात आले. शासनाने येथील रस्ता नाल्यावरील पुलासाठी सहा कोटी रूपये मंजूर केले होते. मात्र पुलाअभावी याचा म्हणावा तसा वापर होत नाहीय.

रेल्वेने केली होती तयारी

लोहमार्गावर  प्रत्यक्षात उड्डाणपूल बांधून देण्याची जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाचीच आहे. त्यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचे बजेट देखील रेल्वेने ठेवले होते. उड्डाणपुलाचे अंदाजपत्रक आणि जागेच्या सर्वेक्षणाचे काम देखील रेल्वेने पूर्ण केले होते. मात्र उड्डाणपुलाचा विकास आराखडा आणि अन्य तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी मनपा आणि औद्योगिक विकास महामंडळाने एकूण रकमेच्या २ टक्के (सेंट्रेज चार्जेस) ४५ लाख रूपये रेल्वे प्रशासनाकडे जमा केले नाहीत. पैसे न दिल्याने रेल्वे प्रशासनाने पुढील प्रक्रिया थांबवली.

यंत्रणांमध्ये असमन्वय

 रेल्वे प्रशासन , एमआयडीसी आणि मनपाने समन्वयाने चर्चा करून हा विषय मार्गी लावावा. उड्डाणपूल नसल्याने या भागातील उद्योगसमुहांना तसेच परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बरेच उद्योग उत्पादनाची निर्यात करीत असल्याने त्यांना मालाची वाहतुक करण्यासाठी कंटेनर्स बोलवावे लागतात. परंतु उड्डाणपूल नसल्याने त्रास होतो. यासाठी तिन्ही प्रशासनात योग्य समन्वयाची गरज आहे.

Aurangabad
Good News: भूमी अभिलेखचा नवा प्रयोग; आता शेतसाराही भरा ऑनलाइन

एमआयडीसी मनपात तू तू मै मै

 रेल्वेने सर्वेक्षण आणि इतर तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी २ टक्के सेंट्रेज चार्जेस भरण्यासी मनपाला अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र  ही रक्कम भरण्यासाठी मनपाने ५० टक्के रक्कम भरण्यासाठी एमआयडीसीकडे  तगादा लावला ; पण एमआयडीसीनेही मनपाला रक्कम देण्यास नकार दिला. मनपाने रेल्वेला २५ लाखाचा वाटा उचलण्यासाठी पत्रव्यवहार देखील केला होता. मात्र मनपा आणि एमआयडीसीच्या वादात सुमारे ५० लाखांची ही रक्कम रेल्वेकडे भरलीच नाहीत परिणाम औरंगाबादच्या उत्तर - दक्षिण भाग जोडणारा विकासात कायमचा अडथळा निर्माण केला.

प्रशासक साहेब जरा ईकडेही लक्ष द्या

फुलेनगर येथे  रेल्वे क्रॉसिंग बंद करून तेथे भुयाली मार्ग अथवा उड्डाणपुल तयार करण्यात यावा. आनंदगाडे चौकातून थेट फुलेनगर - मिलिंदनगरकडे येणारा सातारा गावठाणाकडे जाणार्या नागसेननगरातील हा रस्ता पाचफुटाचा देखील शिल्लक नाही. नागसेननगर ते फुलेनगर रेल्वेगेट कडून बीड बायपासला जोडणार्या रस्त्याचे रूंदीकरण आणि बांधकाम करणे गरजेचे आहे. हाच रस्ता एकीकडे एमआयटीकडून सातारा गावाकडे जातो. हाच रस्ता फुलेनगर रेल्वेगेटकडून  रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाकडे जातो. पुल होईल तेव्हा होईल निदान फुलेनगरात उड्डाणपुल आणि रस्ता दुरूस्तीकरणे, येथील रस्त्याच्या मधोमध नळकांडी पुलांची दुरूस्ती करणे देखील महत्वाचे आहे. पावसाळ्यात पुलांवर पाणी चढत असल्याने चार महिने वाट बंद होते. पुरातुन वाहने काढण्याच्या प्रयत्नात आजवर शेकडो नागरिकांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे फुलेनगर रेल्वेगेट येथे देखील भुयारी मार्ग अथवा उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com