कन्नड तालुक्यातील पाच हजार शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड, कारण...

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : कन्नड तालुक्यातील पिशोर येथील घाटमाथा परिसरातील नियोजित श्री हिराजी महाराज शेतकरी सहकारी साखर कारखाना टेंडर काढून विकण्यात आला होता. मात्र यातील भागधारक शेतकऱ्यांची थकीत २ कोटी ८ लाख व कर्मचाऱ्यांचे ७ लाख रूपये देण्यास टाळाटाळ केली जात होती. यावर शेतकरी-कर्मचाऱ्यांनी संबंधित प्रशासनाविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसताच महसूल, साखर आणि सहकार खात्याने तब्बल पाच हजार भागधारक शेतकऱ्यांची व तेथील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला. लगोलग  थकीत रकम वाटपाचे काम देखील सुरू केली आहे. यामुळे कन्नड तालुक्यात प्रशासनाचे आभार मानत आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

Aurangabad
सरकारचा 'फोकस' पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर; 'या' योजनेला मंजुरी

८२ एकरावर उभारला साखर कारखाना

कन्नड तालुक्यातील पिशोर येथील नियोजित श्री. हिराजी महाराज शेतकरी सहकारी साखर कारखाना उभारणीसाठी १९९४ पासून २००३ पर्यंत वेगवेगळ्या संचालक मंडळामार्फत सदर कारखाना उभारणीसाठी या परिसरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर भाग भांडवल जमा करण्यात आले होते. यातून सुमारे ८२ एकर शेत जमीन विकत घेण्यात आली होती व या जागेवर एक गोडाऊन, इमारत आणि हौद इत्यादीचे बांधकाम करण्यात आले होते. 

पण... टेंडर काढून विकला 

परंतु २००३ नंतर या कारखान्यावर निवडून आलेल्या संचालक मंडळाच्या थंडकारभारामुळे बराच कालावधी उलटून गेला तरी सदर कारखाना उभारणीबाबत कोणतीही प्रगती न दिसून आल्याने हा कारखाना उभारण्यापूर्वीच या कारखान्याचे लायसन्स/परवाना हा रद्द करण्यात आला होता. व त्यानंतर सदरचा कारखाना सरकारच्या वतीने दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ रोजी विक्री टेंडर काढून २८ फेब्रुवारी २०२२ रोजी  ४ कोटी ३५ लाखात विक्री करण्यात आला होता.

पण भागधारक शेतकरी अन् कर्मचाऱ्यांचा विसर

कारखान्याची किंमत वसुल केल्यानंतर सरकारने भागधारक शेतकऱ्यांचे भाग भांडवलापोटी जमा केलेली  २ कोटी ८ लाख व कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी थकीत असलेली ७ लाख रुपये शेतकऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना परत करणे नितांत गरजेचे होते. मात्र आठ महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर देखील शासनाला विसर पडला. 

Aurangabad
धुळे-चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात ठेकेदाराचा हलगर्जीपणा

उपाध्यक्षाचा पुढाकार

यासंदर्भात शेतकऱ्यांनी कन्नड तालुक्यातील समाजसेवक तथा याच विक्री केलेल्या कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ॲड. कृष्णा पाटील जाधव यांच्यामार्फत औरंगाबाद विभागाचे  प्रादेशिक सहसंचालक (साखर) आर.टी. शेळके तसेच श्री. हिराजी महाराज शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे  शासकीय अभिहस्तांकर्ता व जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, कन्नडचे तहसिलदार यांच्याकडे सदर साखर कारखान्यात जमा असलेले शेतकऱ्यांचे भाग भांडवल व कर्मचार्यांचे थकित वेतन  ३० सप्टेंबर २०२२ पूर्वी परत करण्यात यावेत नसता कन्नड तालुक्यातील संपूर्ण पाच हजार  शेतकरी व कर्मचारी २ ऑक्टोंबर २०२२ पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित साधून तहसील कार्यालय, कन्नड समोर धरणे आंदोलन व उपोषण करतील असा इशारा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ॲड. कृष्णा पाटील  जाधव यांनी १६ सप्टेंबर  २०२२ रोजी तालुक्यातील शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला होता.

सहकार आणि महसुल खाते खडबडून जागे

जाधव यांच्यासह अनेक शेतकरी व कर्मचाऱ्यांचे स्वाक्षरित केलेले निवेदन प्राप्त होताच  दरम्यानच्या काळात महसूल व सहकार खात्यातील यंत्रणा खडबडून जागी झाली आणि युद्ध पातळीवर प्रशासकीय कामकाजाच्या हालचाली सुरू केल्या. तातडीने संबंधित शेतकरी व कर्मचार्यांना त्यांची हक्काची रक्कम देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. लगोलग  संबंधित भागधारक शेतकरी व कर्मचाऱ्यांचे देनी देण्यास देखील वाटप करावयास सुरूवात केली.  त्यामुळे जाधव यांनी 2 ऑक्टोंबर 2022 पासून प्रस्तावित असलेले आंदोलन कन्नड येथील नायब तहसीलदार कार्यालयात रितसरपणे निवेदन देऊन मागे घेतले. सहकार , साखर आणि महसुल विभागाने ऐन दिवाळीसारख्या सनासुदीच्या काळात हजारो शेतकरी व कर्मचार्यांचा आर्थिक प्रश्न तातडीने सोडविल्यामुळे सर्व संबंधित शेतकरी व कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे. 

प्रशासनाचे आवाहन 

कन्नड तालुक्यातील  भागधारक शेतकऱ्यांना महसुल व सहकार खात्यामार्फत आवाहन देखील करण्यात आले आहे. संबंधित कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी गावात स्थळपंचनामा करण्यास येण्यापूर्वी त्या - त्या गावातील  सरपंच ,पोलीस पाटील व ग्रामसेवक , तलाठींना दूरध्वनी द्वारे गावात येण्याची तारीख ,..वेळ ..कळवतील, तेव्हा संबंधित भागधारक शेतकऱ्यांनी व कर्मचार्यांनी आपली ओळख पटवून देण्यासाठी त्यांच्याकडील अर्जासोबत स्वतःचे आधार कार्ड ,पॅन कार्ड ,निवडणूक ओळखपत्र तसेच घराचे इलेक्ट्रिक बिल...इत्यादींच्या छायांकित प्रति सोबत जोडाव्यात व सादर कराव्यात जेणेकरून योग्य व्यक्तीला त्याबाबतचा धनादेश देणे संबंधित यंत्रणेला सोयीस्कर ठरेल तसेच जर भागधारक व्यक्ती मयत झाली असल्यास ...मयताचे वारसांनी सदर व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र व वारस प्रमाणपत्र सादर करून स्वतःची वरील प्रमाणे ओळखपत्रे व इलेक्ट्रिक बिल संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करावीत... जेणेकरून सर्व वारसांना धनादेश योग्य प्रकारे देता येईल असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com