
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या इमारतीसाठी अखेर ६५ लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासक तथा आयुक्त डाॅ. अभिजित चौधरी यांनी 'टेंडरनामा'ला दिली. महिन्याभरात टेंडर (Tender) काढून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
डाॅ. आंबेडकर यांच्याशी संबंधित विषयांच्या संशोधनाला चालना मिळावी या हेतूने २४ वर्षांपूर्वी जवळपास एक कोटी रुपये खर्चून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आले. मात्र कारभाऱ्यांनी देखभाल - दुरुस्तीकडे कानाडोळा केला. यावर 'टेंडरनामा'ने सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. तसेच या संदर्भात 'टेंडरनामा'कडून आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
'टेंडरनामा'ने मंगळवारी चौधरी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या महत्त्वाच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ६५ लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. या निधीतून इमारतीतील अभ्यासिका कक्ष, आर्ट गॅलरी, तसेच विपश्यना आणि इतर उपक्रमांसाठी असलेले ६ हॉल, ग्रंथालयाच्या देखभाल - दुरूस्ती व इतर कामकाजासाठी ६५ लाख रुपये मंजूर करण्यात येणार आहेत.
मार्च महिन्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तातडीने इमारत दुरुस्तीचा डीपीआर आणि त्या अनुषंगाने अंदाजपत्रक तयार करून टेंडर प्रक्रिया राबविण्याबाबत संबंधित विभागाला त्यांनी पत्र दिले आहे.