अहो, आश्चर्य! शहरात कचराकोंडी अन् स्वच्छ भारत अभियानात कचरामुक्तीचे 'स्टार वन' मानांकन कसे?

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरात जिकडे पाहावे तिकडे कचराकोंडी असताना केंद्र सरकारने पाच दिवसांपूर्वी स्वच्छ भारत अभियानाची रॅंकिंग जाहीर केली असून, त्यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला कचरामुक्तीचे "स्टार वन" मानांकन मिळाले कसे, असा प्रश्न उपस्थित करत सर्वेक्षण करणाऱ्या संबंधित कंत्राटदार एजन्सीवर शहरात जोरदार टीका केली जात आहे.

शहरभर कचराकोंडी असल्याने २०२२ मधील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत टक्का आठने घसरला आहे. गतवर्षी महापालिकेला २२ वा रॅंक मिळाला होता. तत्कालीन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांण्डेय यांच्याच काळात देशभरात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला ३० वी रॅंकिंग मिळाली होती. राज्य पातळीवर दहा शहरांमध्ये शहराचा क्रमांक नववा आला होता. मात्र पाच दिवसांपूर्वी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचे निकाल जाहीर करताना केंद्र सरकारने कचरामुक्तीचे वन स्टार मानांकन मिळाल्याचा दावा महानगरपालिकेने केला आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Nashik : MIDC आहे की रियलइस्टेट कंपनी? सिन्नर-माळेगावच्या भूखंड दरावरून...

ज्या शहरांची लोकसंख्या दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा शहरांसाठी दरवर्षी केंद्र शासनातर्फे स्वच्छ सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार विविध निकषांच्या आधारे ही स्पर्धा होते. स्पर्धेत सहभागी शहरांनी निकषानुसार काम केले आहे किंवा नाही, नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे हे पाहण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेली एक कंत्राटदार एजन्सी शहरात येऊन पाहणी करते. मात्र ही एजन्सी शहरात कधी येऊन गेली,  एजन्सीच्या प्रतिनिधींनी शहराच्या कोणकोणत्या भागात फिरून सर्वेक्षण केले, याची कारभाऱ्यांनी कमालीची गुप्तता बाळगल्याचे टेंडरनामा तपासात समोर आले आहे.

या स्पर्धेचा पाच दिवसांपूर्वी निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यात केंद्र सरकारच्या शहर कार्यमंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या स्पर्धेत देशपातळीवर प्रथमच स्वच्छता क्षेत्रातले सर्वोच्च असणारे कचरा मुक्त शहरमध्ये वन स्टार असे मानांकन मिळाल्याचा दावा महानगरपालिकेने केला आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Pune : मोठी बातमी! 'या' निबंधक कार्यालयातील नवीन दस्तनोंदणी राहणार बंद; कारण...

मात्र महानगरपालिका प्रशासन अजूनही कचराकोंडीबाबत ढिम्म असल्याचं पाहायला मिळतंय. शहरात दहा दहा दिवस कचरा उचलला जात नाही. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढिग पाहायला मिळत आहेत. शहागंज मधील जुन्या शहर बसस्थानकात दहा ते बारा टन कचरा पसरलेला आहे. शहरात ७२ कोटीतून चार ठिकाणी कचरा डेपो तयार केले. पण तिथे अद्याप लिचेड आणि बायोमायनिंग व लॅन्डफील प्रकल्प न राबवल्याने कचरा डेपोमुळे होणारं प्रदूषण, दुर्गंधी, साथीचे रोग आणि डासांची पैदास यामुळे स्थानिक हैराण आहेत. त्यामुळे शहराचा कचरा चिकलठाणा, पडेगाव, हर्सुल आणि कांचनवाडी कचरा प्रकल्पांवर टाकण्यास स्थानिक विरोध करत आहेत.

शहरातील सर्वच रस्त्यांच्या कडेला व सार्वजनिक ठिकाणी तसेच गारखेडा, सिध्दार्थ उद्यान, संजयनगर, बायजीपुरा तसेच महापालिकेचे नारेगाव, हर्सुल, चिकलठाणा, पडेगाव आणि कांचणवाडी येथे लाखो मेट्रीक टन कचऱ्याचे ढिग पडून आहेत. कचराकोंडी आणि घनकचरा व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी होत नसताना मिळालेल्या मानांकनावर वशिलेबाजीचा सूर उमटत आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Pune : पीएमआरडीएचा मोठा निर्णय; 'त्या' 2 भूखंडांचा होणार ई लिलाव

स्टार वन मानांकन देताना शहरातील बांधकामांचे डेब्रिज, पंडित कचरा उचलणे, महापालिकेतर्फे घेतलेले जनजागृती कार्यक्रम, शहर सुंदर करण्यासाठी उड्डाणपूलाखाली, सार्वजनिक, व्यावसायिक ठिकाणी केलेल्या सौंदर्यीकरणामुळे शहराचे मानांकन उंचावण्यास लाभ झाल्याचे महानगरपालिकेचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात याच ठिकाणी कचराकोंडीने सारे त्रस्त आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com