वर्षाला 32 कोटी कंत्राटदाराच्या घशात; तरीही छत्रपती संभाजीनगरातील रस्त्यांवर अंधारयात्रा का?

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर शहरात ३६४ कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार टाकली. पण शहरभर फुटकी मलनिःसारण वाहिनी आणि नाल्यानाल्यात घाण पाणी वाहत असल्याने ही कार्यान्वित योजना कारभाऱ्यांच्या आणि कंत्राटदारांसाठी फायदेशीर ठरली. मात्र शहरवासीयांचा दुर्गंधीने श्वास कोंडला आहे.

दुसरीकडे सरकारी अनुदानातून तसेच स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन व महानगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यवधींचे रस्ते आता नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत थेट पोकलॅन्डने खोदले जात आहेत. उन्हाळ्याच्या तोंडावर तीव्र पाणीटंचाई अन् साथरोगाला आमंत्रण देणाऱ्या कचराकोंडीने शहर त्रस्त आहेत. यावरून कोणत्याही मूलभूत सुविधा नागरिकांना व्यवस्थितपणे द्यायच्याच नाहीत, असा जणू निर्धारच केला असल्याचे महानगरपालिकेच्या कारभारावरून दिसते. त्यात भरीस भर म्हणून वर्षाकाठी तब्बल ३२ कोटी ६४ लाख कंत्राटदाराला देऊनही शहरात दररोज कुठे ना कुठे रस्त्यांवर अंधारयात्रेची ओरड असतेच.

Sambhajinagar
Nashik : MIDC आहे की रियलइस्टेट कंपनी? सिन्नर-माळेगावच्या भूखंड दरावरून...

शहरातील रस्त्यावरील एलईडी पथदिवे रात्रीच्याच वेळी बंद असतात.  सुमारे २० हजार पथदिवे रात्रभरात एकदाही लुकलुकत नाहीत. तब्बल ३० कोटी रुपये खर्चून तयार केलेला रेल्वेस्टेशन ते क्रांती चौक हा बाळासाहेब ठाकरे मार्ग, सिडको बसस्थानक ते हर्सुल टी पाॅईंट हा व्हीआयपी रोड, कॅम्ब्रीज ते नगरनाका, रोपळेकर चौक ते चेतक घोडा मार्ग, चेतक घोडा ते जवाहर कॉलनी चौक, शहानूर मियाँ दर्गा ते विभागीय क्रीडा संकुलासमोरील रस्ता, जकात नाका, आझाद चौक ते पोलिस मेस चौकाकडे जाणारा रस्ता तसेच सेव्हनहील ते सुतगीरणीचौक, या व अशा बहुतांश मार्गावरील पथदिवे ऐन सणासुदीच्या काळात बंद आहेत.

शहराच्या मुख्य रस्त्यासह जुन्या शहरातील महावीर चौक ते भडकल गेट, दिल्ली गेट, रंगीन दरवाजा ते दिल्लीगेट, हर्सुल टी पाॅईंटपर्यंत तसेच पुंडलीकनगरचा रस्ता व‌ रेल्वे स्टेशन भागातील रस्ते, याशिवाय उड्डाणपुलांवर लावण्यात आलेले पथदिवे देखील बंद आहेत.

या पथदिव्यांची मागील काही वर्षात देखभाल दुरूस्ती करण्याचे काम महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील काही कारभाऱ्यांचा आर्शिवाद लाभलेल्या मर्जीतल्या कंत्राटदारांकडूनच केले जात असे. मात्र तत्कालीन महानगरपालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी जाता जाता बीओटी तत्त्वावर शहरातील पथदिव्यांचे कंत्राट इलेक्ट्रोन एनर्जी लिमिटेड या कंपनीला देऊन टाकले होते. डॉ. कांबळे यांनी नवीन कंपनीला काम देण्यापूर्वी, शहरातील पथदिव्यांच्या देखभाल ‌दुरूस्तीची कामे बीओटी तत्त्वावर विनवॉक या कंपनीला देण्यात आले होते. दरम्यानच्या काळातही बंद पथदिव्यांची ओरड कायम होती.

Sambhajinagar
Pune : मोठी बातमी! 'या' निबंधक कार्यालयातील नवीन दस्तनोंदणी राहणार बंद; कारण...

यासंदर्भात नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर जनगर्जनेला हादरून विनवाॅकच्या कंत्राटदाराने पथदिव्यांचा करार संपुष्टात येणार असल्याचे कळताच बंद पथदिवे सोडून निघून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जनता जनार्दनाने महानगरपालिकेपुढे मोर्चेबांधणी करताच बंद असलेले पथदिवे दुरुस्त केल्याशिवाय बिले मिळणार नाहीत, अशी भूमिका तत्कालीन महानगरपालिका आयुक्तांनी घेतली होती.

यानंतर चाळीस हजार एलईडी पथदिव्यांनी शहर उजळून निघणार असे म्हणत बीओटी पद्धतीने एलईडी दिवे लावण्याचा ठराव मे २०१४ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत गुपचूप मंजूर करण्यात आला होता आणि हे कंत्राट इलेक्ट्रोन एनर्जी लिमिटेड कंपनीला देण्यात आले होते.

यात शहरातील ‘पथदिव्यांच्या संपूर्ण सिस्टिमचे नूतनीकरण करावयाचे कंत्राट मध्ये नमूद होते. यात जवळपास ४० ते ४२ हजार दिवे लावल्याचेही उद्दीष्ट होते. तसेच ज्या जुन्या खांबांचा पाया सडला आहे ते खांब बदलणे आदी कामांचा समावेश होता. त्यात १२ हजार खांब नव्याने लावणे, असेही नमूद करण्यात आले होते. मात्र एलईडी पद्धतीचे दिवे लावण्याची ही योजना देखील अंधारयात्रेत गेली आहे.

सुमारे १२४ कोटी रुपये खर्च या एकाच प्रकल्पावर खर्च होत आहेत. दरवर्षी पथदिव्यांसाठी ३२ कोटी ६४ लाख रूपये कंत्राटदाराला दिले जात आहेत. एकीकडे निधी नसल्याचे कारण पुढे करत शहराचा विकास खुंटला असताना दरमहा कंत्राटदाराची २ कोटी ७२ लाखात तुंबडी भरली जात आहे. मात्र बीओटी तत्वावर लावले गेलेले एलईडी पद्धतीचे लाइट देखील बंद असल्याने शहरातील रस्त्यांवर अंधारयात्रा अवतरली आहे. त्यामुळे सर्व दिवे बीओटी ऑपरेटर बदलणार आहे. सुरुवातीला ४० ते ४२ हजार दिवे संपूर्ण शहरात लावले गेले.

Sambhajinagar
Nashik : 'त्या' 2 महिला सरपंचांच्या मालमत्तेवर का आली टाच? ग्रामसेवकालाही दणका

त्यानंतर ना विकास क्षेत्रात देखील याच कंत्राटदाराकडून अधिकचा निधी देऊन १५ हजार दिवे लावण्यात आले. मात्र या पथदिव्यांचा कुठे मिणमिणता प्रकाश तर कुठे अंधार अशी स्थिती आहे. शहरातील अनेक चौकात तसेच मुख्य मार्गावरील पथदिवे बंद आहेत. याशिवाय शहरातील अनेक वॉर्डातही पथदिवे बंद आहेत. अंधारातच शहरातील लोकांना खड्ड्यातून मार्ग काढत जावे लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यामुळे, छोटे-मोठे अपघात वारंवार घडत आहे.

मात्र कंत्राटदाराच्या तिजोरीत दरमहा न चुकता बिले दिली जात आहेत. शहराच्या मुख्य रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. याशिवाय वॉर्डातही प‌थदिवे बंद आहेत. या रस्त्यांवर बंद पथदिव्यांमुळे एखादा अपघात घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे. याशिवाय अनेक वॉर्डातील पथदिवे बंद असल्यामुळे या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्यास त्यालाही जबाबदार महानगरपालिकेचे संबंधित विभागातील कारभारी  राहतील का, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com