

मुंबई (Mumbai): वाहतूक आणि पर्यटनवाढीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला, मात्र अर्धवट अवस्थेत रखडलेला करंजा-रेवस रो-रो सागरी प्रकल्प आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रकल्पाचे काम अर्धवट सोडून ठेकेदार पसार झाल्यानंतर, आता सागरी महामंडळाने या ३४ कोटी रुपये किमतीच्या कामासाठी नव्याने टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सात वर्षांपासून रखडलेल्या या कामाला पुन्हा एकदा गती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. करंजा-रेवस रो-रो प्रकल्प हा कोकण आणि मुंबईला जोडणारा महत्त्वाचा जलमार्ग आहे. 'सागरमाला' योजनेंतर्गत हे काम सुरू झाले. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही रो-रो सेवा सुरू होऊ शकलेली नाही.
रेवस येथील रो-रो जेट्टीचे काम अर्धवट टाकून ठेकेदाराने पळ काढला. बिलांच्या थकबाकीमुळे तो पसार झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे महामंडळाने संबंधित ठेकेदाराचे कंत्राट रद्द केले आहे. विलंबामुळे आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा खर्चही वाढणार आहे. करंजा बंदरातील जेट्टीचे काम पूर्ण झाले असले तरी, रेवस येथील समुद्रातील पायलिंगसह अनेक महत्त्वाची कामे अपूर्णावस्थेत आहेत.
काम रखडल्यामुळे स्वाभाविकपणे या भागातील पर्यटनवाढीच्या अपेक्षांना मोठा फटका बसला आहे. सागरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पर्यटनाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याने कामाला गती देण्यात येईल. कार्यकारी अभियंता मनीषा मेतकर यांनी माहिती दिली की, मुंबई सागरी महामंडळ नव्याने टेंडर मागवण्याची प्रक्रिया सुरू करत आहे.
सर्व अडचणी दूर करून, लवकरात लवकर नवे कंत्राटदार नेमले जातील आणि पुढील वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.