
मुंबई (Mumbai) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर-माणगाव बायपास रस्त्याचे काम २५ टक्के कमी दराने टेंडर भरणाऱ्या कंपनीला देण्यात येणार आहे. या ११ किलोमीटर लांब रस्त्यासाठी १९८ कोटींचा खर्च येणार आहे.
या कामासाठी ५ ठेकेदारांनी टेंडर भरले होते. त्यापैकी २५ टक्के बिलो दराने टेंडर भरणाऱ्या कंपनीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला असून मंजुरीनंतर वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे. नवीन बायपास रस्ता करण्यासाठी आधी कच्चा रस्ता बनवण्यात येणार आहे. माणगाव, इंदापूर बायपास ११ किलोमीटर काम पूर्ण करण्यासाठी १८ महिने कालावधी निश्चित करण्यात आला आहे. रेल्वे क्रॉसिंगजवळ ३ रोड ओव्हर पूल, दोन मोठे पूल बांधण्यात येणार आहेत. राज्य सरकार कमी खर्चात दर्जेदार काम देणाऱ्या कंत्राटदार कंपनीला वर्क ऑर्डर देणार आहे. यात २५ टक्के बिलो असणाऱ्या कंपनीला प्राधान्य देण्यात आले. इंदापूर-माणगाव बाय पास रस्ते कामासाठी २५ टक्के कमी दराने बोली लावल्याने संबंधित कंपनीला कंत्राट देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
कोकणसह दक्षिणेकडे जोडणारा विकासाचा मार्ग म्हणून मुंबई-गोवा महामार्गाकडे पहिले जाते. या मार्गाच्या कामाची रखडपट्टी सुरु असून प्रवासी पर्यटकांना वनवास भोगावा लागत आहे. माणगाव व इंदापूर शहराला बायपास दिला गेल्याने तळ कोकणासह गोवा व दक्षिणेकडील पर्यटकांना अंतर कमी झाल्याने कोकण व गोवादर्शन सहज घडवता येईल, अशी आशा होती; मात्र या बायपासचे काम यापूर्वी वनखाते व रेल्वे खात्याच्या मंजुरीत अडकल्याने बायपास कामाचे तीन तेरा वाजले होते. माणगाव व इंदापूर बायपासचे काम रखडल्याने दरम्यानच्या भागात वाहतूक कोंडी सतत होत असल्याने प्रवासी नागरिकांची चांगलीच रखडपट्टी होते. या बायपास मार्गाचे काम गेली १४ वर्षांपासून रखडले आहे. हा रस्ता वनखात्याच्या जमिनीतून व कोकण रेल्वेला उड्डाण पूल होत असल्याने, त्यातच वैयक्तिक मालकी जमिनीच्या काही मालकाना भूसंपादनाचा मोबदला मिळाला नसल्यामुळे इंदापूर आणि माणगाव येथील दोन्ही शहरालगतचे बायपासचे काम रखडले होते. त्यानंतर वनखात्याची मंजुरी मिळाली. मात्र निधी अपुरा पडत असल्याने व शासनाकडून वेळेवर निधी मिळत नसल्याचे कारण पुढे करीत पूर्वीच्या ठेकेदाराने हे काम सोडून दिले. पूर्वीचा ठेकेदार बदलला. त्यानंतरही बायपासचे काम व रुंदीकरणाचे कामात म्हणावी तितकी गती मिळत नसल्याने माणगाव व इंदापूर बायपासच्या कामाचा तिढा कायमच राहिला.