मुंबई (Mumbai) : सावित्री नदीमुळे महाड तालुक्यातील शेकडो गावांचे विभाजन झाले आहे. मुंबई-गोवा महामार्ग व महाड खाडीपट्ट्यातील अंबडवे-राजेवाडी या नवीन महामार्गाला जोडणारा दासगाव ते गोठे पूल प्रस्तावित आहे. या पुलामुळे तालुक्यातील खाडीपट्ट्यातील गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. सावित्री नदीवरील या नवीन पुलाकरिता ११२ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
महाबळेश्वर येथे उगम पावणारी सावित्री नदी महाड तालुक्यातून वाहत पुढे बाणकोट येथे अरबी समुद्राला मिळते. नदीवर मुंबई-गोवा महामार्गावर राजेवाडी येथे, महाड शहराजवळ दादली येथे तर आंबेत येथे मोठे पूल बांधण्यात आले आहेत. शहरातील दादली पूल ते आंबेत पूल हे अंतर २८ किलोमीटर आहे. या अंतरादरम्यान अन्य कोणताही पूल नसल्याने सावित्री नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरील गावांचे विभाजन झाले आहे.
खाडीपट्ट्यातील ही गावे नदीकिनारी असूनही एकमेकांशी जलवाहतुकीशिवाय संपर्कात येऊ शकत नव्हती. दोन्ही गावांना महाड येथूनच ये-जा करावी लागते. त्यामुळे प्रवासात वेळ व पैसा नाहक खर्च होतो. त्यामुळे सावित्री नदीवर मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या दासगाव येथून पलीकडे गोठे असा पूल बांधला जावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून नागरिकांकडून होत आहे. गोठे परिसरातील सव, रावढळ, जुई कुंबळे, तुडील, नरवण, चिंभावे, आदिस्ते तेलंगे, सापे, वामने या परिसरातील गावांना मुंबई व महामार्गावरून प्रवास करण्यासाठी महाड येथून जावे लागते. दासगाव हे ऐतिहासिक बंदर असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासळी बाजार भरतो.
प्राथमिक आरोग्य केंद्रही याच ठिकाणी आहे. त्यामुळे खरेदीसाठी व औषधोपचारासाठी या भागातील ग्रामस्थांना दासगाव जवळ पडते. परंतु नदी ओलांडून येण्यासाठी होडीशिवाय अन्य पर्याय नसल्याने गावांचा एकमेकांशी संपर्क होऊ शकत नाही. सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने दासगाव भागातील गावे विकसित होत आहेत. त्याचप्रमाणे नदीच्या पलीकडे असणाऱ्या गोठे परिसरातील खाडीपट्ट्यातून जाणारा म्हाप्रळ मार्ग अंबडवे-राजेवाडी असा आता राष्ट्रीय मार्ग होत असल्याने नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरून दोन महामार्ग जाणार आहेत.
दासगाव व गोठे या ठिकाणी कोकण रेल्वेचा मोठा पूल आहे. या पुलाला समांतर असा पूल असावा, अशी मागणी ग्रामस्थ अनेक वर्षांपासून करीत आहेत. आमदार भरत गोगावले यांनी पाठपुरावा केल्याने आता ११२ कोटी रुपये खर्चून नवीन पूल बांधण्यात येणार आहे. या पुलामुळे खाडी किनाऱ्यावरील दोन्ही बाजूची गावे व दोन्ही महामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत.