MahaRERA Tendernama
टेंडरिंग

नव्या घराची खरेदी का बनलीय अवघड?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महाराष्ट्रात शहरीकरणाचा वेग प्रचंड आहे. देशात सर्वांधिक आणि वेगाने शहरीकरण होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा खूप वरचा क्रमांक आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येची घरांची गरजही त्याच वेगाने वाढते आहे. घरखरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक व्हावी म्हणून आवश्यक नियामक प्राधिकरणाची निर्मिती देशात पहिल्यांदा महाराष्ट्रातच झाली. महारेरा हे त्या प्राधिकरणाचे नाव. मात्र याच महारेरामुळे नवे घर खरेदी करणाऱ्यांना वाट पाहण्याची वेळ आल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. (MahaRERA, Housing Sector, Pune Real Estate Sector News)

पुणे शहरातील झपाट्याने वाढणाऱ्या बांधकाम क्षेत्राला ‘महाराष्ट्र गृहनिर्माण नियामक प्राधिकरणा’च्या (महारेरा MahaRERA) मंजुरीतील विलंबामुळे मोठा फटका बसत आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांसह पूरक व्यवसायही अडचणीत आले आहेत. पुणे जिल्ह्यातील १०० हून अधिक बांधकाम प्रकल्पांची मंजुरी ‘महारेरा’च्या संथगती कारभारामुळे खोळंबली असून, त्याचा परिणाम थेट ग्राहकांवर होत आहे.

गृहखरेदीदार का आले अडचणीत?

आम्ही २०२४ मध्ये मॉडेल कॉलनीतील एका प्रकल्पात सदनिका घेण्याचा निर्णय घेतला. मात्र दीड वर्ष उलटून गेले तरीही काम सुरू झालेले नाही. विकसक सांगतो, की ‘महारेरा’ची मंजुरी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे आमचे घराचे स्वप्न कधी साकार होईल, माहीत नाही, अशी खंत नोकरदार मंजूश्री दिघे यांनी व्यक्त केली.

अशा प्रकारचे अनुभव सध्या अनेक गृहखरेदीदारांना येत आहेत. या प्रकारात बांधकाम व्यावसायिक प्रकल्प रखडण्याचे कारण ‘महारेरा’ असल्याचा दावा करतात, तर दुसरीकडे ‘महारेरा’चे म्हणणे आहे, की विकसकांकडून प्रकल्पासाठी आवश्यक कागदपत्रे पूर्णपणे सादर केली जात नाहीत. या सगळ्या प्रकारात मात्र गृहखरेदीदार पुरते अडचणीत आल्याची स्थिती आहे.

का रखडले प्रकल्प?

सॉफ्टवेअरमधील बदल आणि डेटा स्थलांतरामुळे होणारा विलंब, ‘महारेरा’मधील अपुरे मनुष्यबळ, दुरुस्ती अर्जांच्या मंजुरीतील विलंब, मुदतवाढ मंजुरीतील अडचणी आणि सक्षम प्राधिकरणाने आधीच मंजूर केलेल्या प्रकल्पांच्या योजनांची पुन्हा तपासणी केली जात असल्याने नवीन प्रकल्पांच्या मंजुरीला विलंब होत आहे.

वेळेत मंजुरी मिळत नसल्याने बांधकाम व्यवसायिकांना पैशांच्या व्यवस्थापनापासून सदनिकांच्या बुकिंगपर्यंत सर्वांचे व्यवस्थापन करण्यात कोंडी होत आहे. त्यामुळे रखडलेले बांधकाम प्रकल्प ही शहरात एक गंभीर समस्या बनली आहे. ज्याचा फटका ग्राहकांसह गुंतवणूकदारांना बसत आहे.

पुण्यातील सध्याची स्थिती

शहराच्या वाढत्या शहरीकरणामुळे, विस्तारत जाणाऱ्या आयटी उद्योगांमुळे आणि शैक्षणिक संस्थांमुळे पुण्याचे गृहनिर्माण क्षेत्र वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक बनले आहे. गेल्या दशकात पुण्यात परवडणाऱ्या घरांपासून ते लक्झरी अपार्टमेंट्स आणि गेटेड कम्युनिटी प्रकल्पांपर्यंतची मागणी वाढली आहे.