Road Quality
Road Quality Tendernama
टेंडरिंग

कसे असले पाहिजेत आदर्श डांबरी अन् सिमेंट रस्ते; प्रत्यक्षात यंत्रणा काय करते?

संजय चिंचोले

दर पावसाळ्यात डांबरी रस्त्यांवर खड्डे पडून ते लवकर खराब होतात अन् ओरड सुरू होते. यासंदर्भात आम्ही काही नामवंत तज्ज्ञांशी चर्चा करून आदर्श डांबरी किंवा सिमेंट रस्ते कसे असावेत याविषयी जाणून घेतले आहे. यात काही शास्त्रीय कारणे पुढे आली आहेत.

डांबरी रस्ते करण्यासाठी प्रती किलोमीटर ७५ लाख रूपये खर्च येतो. तर काँक्रिट रस्त्यासाठी साधारणतः अंदाजे प्रती किलोमीटर एक ते दिड कोटी रूपये खर्च येतो. मात्र हे रस्ते किमान २० ते ३० वर्ष टिकतात व देखभाल दुरूस्तीचा खर्च टाळता येतो हा उद्देश समोर ठेऊन सरकारने काँक्रिटच्या रस्ते बांधणीला गेल्या १५ वर्षांपासून सुरूवात केली.  मात्र तेही रस्ते खराब होण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने हा प्रयोग देखील अयशस्वी ठरला. त्यामुळे रस्ते बांधकाम करताना संबंधित विभागांचा घोटाळा आणि नियोजनशुन्य कारभारामुळेच रस्ते खराब होतात. त्यामुळे रस्ते कसे असावेत यासंदर्भात तज्ज्ञांकडून मिळवलेला हा खास रिपोर्ट.

राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्याचे शहर अथवा ग्रामीण भागात भुरभुर पावसाने देखील  मोठ्या आणि छोट्या रस्त्यांवर दरवर्षी पडणारे खड्डे आणि त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांना होणारा त्रास, त्यापोटी हे रस्ते तयार करणाऱ्या तसेच त्यांची देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांवर प्रचंड टीका, नाराजी व नापसंती दिसते. यावर डांबरी रस्त्यांऐवजी टिकाऊ काँक्रिटचे रस्ते बांधण्याचा सपाटा सुरू केला. डांबरी रस्त्यांना खड्डे का पडतात, हे सांगताना नामवंत स्थापत्य तज्ज्ञ इंजिनियर महेश निराळे यांच्याशी 'टेंडरनामा'ने संपर्क साधला असता त्यांच्यामते रस्त्यांचे फ्लेक्सिबल (लवचिक) व रिजिड (टणक) असे दोन प्रकार सांगितले. यात  डांबरी रस्ते हे फ्लेक्सिबल (लवचिक) तर काँक्रिटचे रस्ते हे रिजिड प्रकारात मोडतात.

कसे असावेत आदर्श डांबरी रस्ते

- डांबरी रस्ता बांधण्यापूर्वी किमान तीन ते चार फुटापर्यंत खोदकाम करून त्यातील दगड, मुरूम आणि माती परिक्षण करणे गरजेचे आहे. आत काळ्या मातीचे प्रमाण अधिक असेल तर डांबरी रस्ता फार काळ टिकत नाही. त्यामुळे माती काढून त्याची लेव्हलींग करून त्यात कठीण मुरूमाचा साधारणतः १५ ते २० सेंटिमीटरचा जाडीचा थर द्यायला हवा.

- यानंतर जी. एस. बी. (ग्रॅन्युअर सब बेस) यात रस्त्याच्या भौगोलिक परिस्थितीचा आणि वाहतूक क्षमतेचा भार विचारात घेऊन डांबरमिश्रित खडीचा थर टाकावा.

- यानंतर माॅडीफाईड पॅनीट्रेशन मॅकॅडम (एम. पी. एम) यामध्ये ५० ते ७५ एम. एम. जाडीचा डांबर मिश्रित थर टाकावा.

- यानंतर बिटूमिनस मॅकॅडमचा (बी. एम.) ५० ते ८० एम. एम. जाडीचा लहान खडीचा थर टाकावा. यानंतर कार्पेट अर्थात २० एम. एम. जाडीचा थर टाकावा.

- त्यानंतर रस्ता गुळगुळीत व्हावा व रस्त्यावर अंथरलेल्या खडी व कच घट्ट पकडून ठेवण्याच्या दृष्टीने सीलकोट करणे गरजेचे आहे. यात झारीने डांबर लिक्वीडची फवारणी केली जाते. सुरूवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक थराची दबाई करणे आवश्यक आहे. मुरूम, जी. एस. बी., एम. पी. एम., कारपेट, सीलकोट (टॅगकोट) कोणतीही प्रक्रिया करण्यापूर्वी खडी, मुरूम व बाईंडर मटेरियलचे यांचे संकल्प करून प्रमाण ठरवणे अपेक्षित आहे व त्याचप्रमाणे मिक्स डिझाईन करणे अपेक्षित आहे.

ही आहेत खड्ड्यांची कारणे

- रस्त्यावर पाणी साचू नये यासाठी रस्त्याच्या मधोमध कॅम्बर अर्थात दोन्ही बाजूने उतार दिला जात नाही. रस्त्यावर साचलेले पाणी वाहुन जाण्यासाठी गटारांची बांधणी केली जात नाही.

- रस्ते बांधकाम करताना टॅगकोट व सीलकोटमध्ये कमी प्रमाणात डांबर ओतले जाते.

- रस्त्याच्या खालील मातीचे परिक्षण न करता सरधोपट पद्धतीने रस्ता तयार केला जातो.

- रस्त्याच्या भुपृष्ठावर पडणाऱ्या पाण्याचा व्यवस्थित रित्या निचरा करण्यासाठी व्यवस्था केली जात नाही. 

- रस्ता बांधणी झाल्यानंतर पडलेल्या छोट्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष केले जाते.

- वाहतूक क्षमतेचा विचार न करता पॅव्हमेंट डिझाईन केली जाते.

- मुरूमाच्या जागी उकरलेल्या मातीचीच भरती केली जाते.

- रस्ता बांधताना कुठेही सार्वजनिक सुविधांसाठी गॅप ठेवत नाहीत. भविष्यात जलवाहिनी, ड्रेनेजलाईन व इतर नागरी सुविधांसाठी रस्ते खोदले जातात.

कसा असावा आदर्श सिमेंट काँक्रिट रस्ता

- आयआरसीच्या स्टॅन्डरप्रमाणे रिजिड पॅव्हमेंटसाठी वापरण्यात येणारे काँक्रिट हे एम-४० पेक्षा अधिक ग्रेडचे असावे. वाहतूक क्षमतेचा विचार करून रस्त्याची जाडी ठरवावी

- डांबरी रस्त्याप्रमाणेच जी.एस.बी.चा सरफेस केल्यानंतर डी.एल.सी. (ड्रायलीन काँक्रिट) यात वाळू, खडी व सिमेंट मिश्रित एम-१० ते एम १५ ग्रेडचा १५० एम. एम. जाडीचा पहिला थर तयार केला जातो.

- त्यानंतर रोलरने चांगली दबाई करून दोन दिवस त्यावर क्युरिंग करण्यात यावी. त्यानंतर १२५ मायक्राॅनच्या पाॅलिथिन पेपर अर्थात या पद्धतीचे प्लास्टिक शिट अंथरून त्यावर डिझाईनप्रमाणे वाळू, खडी व सिमेंटचा पी. क्यु. सी. अर्थात पेव्हमेंट काॅलीटी काँक्रिटचा दोनशे ते तीनशे एम. एम.चा थर अंथरून त्यानंतर रोलरने दबाई करून दोन दिवस क्युरिंग करावी.

- ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काँक्रिट उष्णतेमुळे प्रसरण पावते व हिवाळ्यात आंकुचन पावते यासाठी काँक्रिट रस्त्यातील उष्णता बाहेर पडण्यासाठी रस्त्याच्या लांबी व रूंदीप्रमाणे ठराविक अंतरात चौकोनी स्पेस तयार करून त्याला गृव्हकटिंगच्या सहाय्याने कटींग करून त्यात डांबराचा भरणा केला जावा.

- ही प्रक्रिया केल्यानंतर प्रत्येक एक्सपेंशन अथवा कन्स्ट्रक्शन जाॅईंटला प्लेन राॅड अर्थात पीव्हीसी पाईपच्या किंवा बिटूमिनस पॅडच्या साहाय्याने कन्स्ट्रक्शन जाॅईंट तयार करणे अपेक्षित आहे. त्यानंतर रस्त्याच्या ठराविक अंतरात रस्त्याच्या लांबीत टाईबार आणि रूंदीत डाॅवेल्स बार टाकावे. यात १२ एम. एम. ते १६ एम. एम. लोखंडाचे प्लेन आणि खडबडीत लोखंडीबार टाकून वरच्या थराचे काम केले जाते.

- डांबरी रस्त्यासाठी प्रती किलोमीटर ७५ ते ८० लाखाचा खर्च येतो. त्यापेक्षा सिमेंट रस्ता निर्मितीचा खर्च हा जास्त आहे. एक ते दिड कोटी रूपये खर्च येतो. याऊलट हे रस्ते पर्यावरणाचा  ऱ्हास करतात. याशिवाय या रस्त्यांची दुरूस्ती देखील खर्चिक आहे.

असा आहे तज्ज्ञांचा दावा

● विदेशातील बंद टेक्नाॅलाॅजी भारतात आणून अशा सिमेंट रस्त्यांमुळे तापमान वाढवायचे काम केले जात आहे.

● रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईडपंख्यात कठीण मुरूमाचा वापर केला जात नाही. त्यामुळे खटक्या पडतात व अपघाताचा धोका वाढतो.

● रस्त्याचे बांधकाम करण्याआधी रस्ता किमान तीन ते चार फुट खोदून थर भरणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात अस्तित्वातील रस्त्यालाच जेसीबीच्या पात्यांनी ओरबाडून त्याची लेव्हल न करता थरावर थर ठेवले जातात. परिणामी रस्त्याची उंची वाढल्याने पावसाळ्यात आसपासच्या वसाहती आणि रस्ते दबल्याने नागरिकांना पाण्याचा मनस्ताप सोसावा लागतो. रस्त्यात चढ-उतार आणि रॅम्प तयार झाल्याने प्रवाशांची दमछाक होते. रस्त्याच्या टणक भागात खटक्या पडल्याने अपघात होतात.

● रस्त्याचे काम करताना सॅसर पॅव्हर मशीनमुळे रस्त्याच्या मधोमध दोन्ही बाजुने कॅम्बर अर्थात उतार राखण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु अकुशल वर्क मॅन शिपमुळे ग्रेज्युअली खड्डे पाडले जातात. अशा पडलेल्या खड्ड्याची दुरूस्ती करता येत नाही. त्यात पाणी साचुन रस्त्याला मोठे खड्डे पडतात. पृष्ठभागावर पाणी साचुन राबत असल्याने सरफेस खरबडीत होतो. कालांतराने तो उखडतो.

● सिमेंट रस्त्याची रायडींग कॉलिटी डांबरी रस्त्यापेक्षा अधिक त्रासदायक आहे.

●  सिमेंट रस्त्याचे तापमान सातत्याने वाढत असल्याने या रस्त्याचा वापर करणाऱ्या टायरांची झिज अधिक होते. वाहने गरम होऊन जागीच जळतात.

● डांबरी रस्त्यापेक्षा सिमेंट रस्ता तयार करायला अधिक वेळ लागतो.

● सिमेंट रस्त्यात क्युरिंगच्या अभावाने रस्त्याचा दर्जा खालावतो. त्यात डिझाईनप्रमाणे रेडिमिक्स काँक्रिट तयार केले जात नाही. दिलेल्या ग्रेडप्रमाणे थर टाकले जात नसल्याने रस्त्यांवर खड्डे पडून रस्ता लवकर खराब होतो. यातील पसरणारी धुळ ही शरिरासाठी अत्यंत घातक आहे.