पुणे (Pune) : पुणे-बंगळूर ग्रीनफील्ड कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पूर्ण झाला आहे. अंतिम मंजुरीसाठी तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुख्यालयाला पाठविला आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली. मंजुरी मिळताच भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होईल, असेही ते म्हणाले.
भूसंपादन पूर्ण झाल्यावर अवघ्या दोन वर्षांत नवीन आठपदरी मार्ग बांधून तयार होईल. या नव्या मार्गामुळे पुणे-बंगळूरदरम्यानचे अंतर ९३ किलोमीटरने कमी होईल. शिवाय प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी होणार आहे. या मार्गासाठी सुमारे ४० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
देशातील निवडक मार्गांवर ‘भारतमाला’ प्रकल्प दोनअंतर्गत जवळपास तीन हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जात आहेत.
हे सर्व रस्ते ‘ग्रीनफील्ड’ असणार आहेत. त्यात पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचाही समावेश आहे. ‘ग्रीनफील्ड कॉरिडॉर’ पूर्णपणे नवीन ‘द्रुतगती मार्ग’ असेल. यावरून वाहने ताशी १२० किलोमीटर वेगाने धावतील. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत विमान महामार्गावर उतरवण्यासाठी पुणे आणि बंगळूरजवळ पाच किलोमीटरची धावपट्टीही असेल.
‘ग्रीनफील्ड कॉरिडॉर’ म्हणजे काय?
हा पूर्णतः नवा ‘द्रुतगती मार्ग’ आहे. त्यात जुन्या रस्त्याचे विस्तारीकरण करत नाहीत. हे महामार्ग चार किंवा आठपदरी असतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण केले जाते. त्यामुळे प्रदूषणाची पातळी कमी होते. या परिसरात जमीन स्वस्त दरात उपलब्ध करून नागरिकांना रोजगाराची संधी मिळते.
या हेतूने काही विशिष्ट परिसरातून या मार्गाचा आराखडा तयार केला जातो. सध्याचा पुणे-बंगळूर महामार्ग ८३८ किलोमीटर लांबीचा असून, ‘ग्रीनफील्ड’ ७४५ किलोमीटर अंतराचा असेल. त्यामुळे ९३ किलोमीटरचे अंतर कमी होईल.
कसा असेल मार्ग?
१. वारवे बुद्रुकपासून ग्रीनफील्ड सुरू होणार
२. सहापदरी मार्ग असणार
३. संपूर्ण रस्ता डांबरी असेल
४. टोलनाक्यांपासून गावांमध्ये जाण्यास रस्ता
५. प्रसाधनगृहे, मुलांसाठी उद्याने, हॉटेल असतील
६. विमानाची धावपट्टी असलेला राज्यातील पहिला राष्ट्रीय महामार्ग
७. सांगली, सातारा, कोल्हापूरसह इतर शहरांमधून मार्ग थेट जाणार नाही
40 हजार कोटींचा खर्च
नवीन द्रुतगती मार्ग (किमीमध्ये) : ७४५
एकूण खर्च (कोटींमध्ये) : ४०,०००
वाहनांचा ताशी वेग (किमीमध्ये) : १२०