ST
ST Tendernama
टेंडर न्यूज

अडचणीतील 'ST'ने असे कमावले दीड कोटीचे उत्पन्न

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : आर्थिक तोट्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला (MSRTC) आता प्रासंगिक करारचा आधार मिळाला. पुणे विभागाने डिसेंबर महिन्यांत प्रासंगिक करारातून एक कोटी ५७ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले. केवळ एका महिन्यात एसटीच्या ९९६ गाड्या धावल्या असून याद्वारे ४३ हजार ८२४ प्रवाशांची वाहतूक झाली आहे. शाळा, महाविद्यालयाकडून एसटीच्या प्रासंगिक कराराला चांगला प्रतिसाद लाभला आहे.

एसटीकडून प्रासंगिक करारासाठी गाड्या उपलब्ध करून दिल्या जातात. याच्या भाड्यातून एसटीला अतिरिक्त उत्पन्न मिळते. डिसेंबर २०२२ या एकाच महिन्यात एसटीच्या प्रासंगिक करार सेवेला पुणे विभागातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद मिळाला. पुणे विभागातील १३ डेपोअंतर्गत या गाड्यांचे बुकिंग झाले. ९९६ गाड्यांनी ५ लाख २० हजार ७८२ किलोमीटरची वाहतूक केली. प्रवाशांचा सर्वाधिक ओढा हा सहलीसाठी महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड, मुरूड, जंजिरा, गणपतीपुळे, सिंधुदुर्ग, वाई, पाचगणी या भागांना होता. त्यामुळे पुणे विभागाच्या एसटी या भागाकडे धावल्या.
एसटीच्या पुणे विभागाकडून नागरिकांना स्वस्तात अष्टविनायक दर्शन बससेवा सुरू करण्यात आली आहे. सुरवातीला या सेवेसाठी एसटीने दोन बस सोडल्या होत्या. त्या सेवेला आता चांगला प्रतिसाद मिळाला असून, एकूण १२ बस फुल्ल झाल्या आहेत. तर आणखी तेरावी बस प्रशासनाने या सेवेसाठी दिली आहे. तिचेही बुकिंग सुरू झाले आहे.

प्रासंगिक कराराला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जानेवारी महिन्यात देखील काही गाड्या करारासाठी बुक होत आहे. शाळा, महाविद्यालयाच्या सहलींना विशेष सवलत दिली जाते. त्यामुळे शैक्षणिक सहलीला सर्वाधिक प्राधान्य एसटीला दिले जाते.
- ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी विभाग, पुणे