मुंबई (Mumbai) : राज्यात रस्त्यांचे जाळे विकसित करून ग्रामीण भागांना शहरांशी जोडण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांना विविध सोयी - सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या (Mumbai Goa Highway) कामास प्राधान्य देणार असल्याचेही सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) विभागाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री भोसले म्हणाले की, राज्याची सर्वांगीण प्रगती ही पायाभूत सुविधांवर अवलंबून असते. राज्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यात येणार असून, चुकीच्या पद्धतीने काम होत असेल किंवा जमीन हस्तांतरणात अडचणी येत असतील तर त्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होणे राज्याच्या आणि जनतेच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने या महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार असल्याचा पुनरुच्चार मंत्री भोसले यांनी केला.
दृष्टीक्षेपात मुंबई-गोवा महामार्ग
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दोन टप्प्यांत सुरू झाले. पहिला टप्पा पळस्पे ते इंदापूर आणि दुसरा टप्पा इंदापूर ते कोकणच्या तळातील धारपपर्यंत. पहिल्या टप्प्याचे काम सुरू होऊन दहा वर्षे पूर्ण झाली तरी काम अर्धवटच आहे.
दुसरा टप्पा इंदापूर ते कोकणच्या तळातील धारप या गावहद्दीपर्यंत असून, त्याचे काम २०१७ मध्ये सुरू करण्यात आले. मात्र आजच्या घडीला पाच वर्षे झाली तरी काम पूर्ण झालेले नाही.
पहिला टप्पा इंदापूर ते वडपाले, दुसरा टप्पा वडपाले ते पोलादपूर भोगाव या टप्प्यामध्ये दासगाव ते वीर या ५ किलोमीटरच्या अंतराच्या मार्गासाठी वन खात्याच्या परवानगीसाठी प्रयत्न सुरू असले तरी अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
तिसरा टप्पा भोगाव ते कशेडी टनेल, चौथा टप्पा कशेडी ते परशुराम घाट, पाचवा टप्पा परशुराम घाट ते आरवली, सहावा टप्पा आरवली ते कानते, सातवा टप्पा कानते ते वाकड, आठवा टप्पा वाकड ते तळेगाव, नववा टप्पा तळेगाव ते कालमथ, दहावा टप्पा कालमथ ते धारप असा आहे.
चौपदरीकरणाचा दुसरा टप्पा ३५५.२८० कि.मी.चा आहे. यावर ६१०० कोटी खर्च अपेक्षित असून, त्यापैकी २४०.८८ किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. ११४.३९९ किलोमीटर काम प्रलंबित आहे. या टप्प्यात काही ठिकाणी वन खात्याची परवानगी मिळालेली नाही.
या महामार्गासाठी ११ वर्षांपूर्वी १२०० कोटी खर्च होता; मात्र जसजसा कालावधी वाढत आहे, तसतशी त्याची रक्कम वाढत असून, सध्या ती दोन हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे. गेल्या दहा वर्षांत या मार्गावर सुमारे २५०० नागरिकांचे प्राण गेले आहेत.