Shekhar Singh
Shekhar Singh Tendernama
टेंडर न्यूज

'आम्हाला काय कुत्रं चावलं नाही'; ठेकेदारावरून जिल्हाधिकाऱ्यांनी...

टेंडरनामा ब्युरो

महाबळेश्वर (Mahabaleshwar) : बाजारपेठ सुशोभीकरणाचे काम करणारा ठेकेदार हा जिल्हा परिषदेची कामे करणारा ठेकेदार नाही. अनेक हेरिटेज वास्तूंची कामे करणारा तो देशातील नामांकित ठेकेदार आहे. सुशोभीकरणाचे काम उत्तम दर्जाचे करून घेण्याची आमची जबाबदारी आहे. दर्जाहिन व खराब काम करून घेण्यासाठी आम्हाला काय कुत्रं चावलं नाही, अशा शब्दात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुशोभीकरण कामाला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना फटकारले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार तयार केलेल्या आराखड्यानुसार बाजारपेठ सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यास कोविडमुळे विलंब झाला. जिल्हा प्रशासनाने हे काम आता विनाविलंब युध्दपातळीवर पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्‍यातही हे काम सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाने ठेकेदारास दिले आहेत. त्यानुसार येथील बाजारपेठेत खोदकाम करण्यात येणार होते. मात्र, बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या एका गटाने या कामाला विरोध करून काम पावसाळा झाल्यानंतर करण्यात यावे, अशी मागणी केली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळास जिल्हाधिकारी तुमची बैठक घेतील व त्यानंतर काम सुरू करतील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यांची बैठक घेतली नाही. त्यासाठी बैठक प्रथम घ्यावी व नंतर काम सुरू करावे, अशी व्यापाऱ्यांनी भूमिका घेतल्याने येथील खादी ग्रामोद्योग भवनात जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, मुख्याधिकारी पल्लवी पाटील व पोलिस निरीक्षक संदीप भागवत उपस्थित होते.

सिंह म्हणाले, ‘काही व्यापारी कामाबाबत विनाकारण संभ्रम निर्माण करत आहेत, हे बरोबर नाही. कामाबाबत काही शंका असल्यास त्याचे निरसन करण्यासाठी तयार आहोत. मात्र, विरोध करून कामाला विलंब करणे योग्य नाही. देशात चांगले काम सुरू असताना त्याला विरोध करण्याची काही लोकांची प्रवृत्ती आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकल्पाचा आराखडा पाहिला आहे. आमदार मकरंद पाटील यांनीही सुशोभीकरणाच्या कामाला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. महाबळेश्वरच्या मुसळधार पावसात काम करणे अवघड आहे, याची कल्पना आहे. मात्र, ते आव्हान स्वीकारूनच कामाचे नियोजन केले आहे. संपूर्ण बाजारपेठेत एकाच वेळी खोदकाम केले जाणार नाही, बाजारपेठेचे चार भागात विभागणी केली आहे. सागर हॉटेल ते पल्लोड क्रिएशन, भाजी मार्केट ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, नटराज चिक्की ते पोलिस ठाणे व आर. के. पाटील ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असे चार भाग केले आहेत. या प्रत्येक भागातील वीस वीस मीटर खोदकाम करून ते काम पूर्ण झाल्यावर पुढील काम सुरू केले जाणार आहे.’ हे काम पावसाळ्‍यात पूर्ण करणे हे हिताचे आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, महाबळेश्वरची बाजारपेठ ही नॉन हॉकर झोन जाहीर केली आहे. या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही, याची प्रशासनाने तयारी केली आहे. अतिक्रमण दिसल्यास त्याबाबतची माहिती पालिकेला व पोलिसांना द्यावी. अतिक्रमण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.