Ambulance Scam
Ambulance Scam Tendernama
टेंडर न्यूज

Ambulance Scam : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वाजणार 10 हजार कोटींच्या ॲम्ब्युलन्स घोटाळ्याचा 'सायरन'

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये शिजलेला आणि 'टेंडरनामा'ने उघडकीस आणलेल्या तब्बल १० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे 'सायरन' आता वाजणार आहे. या घोटाळ्याची (Ambulance Scam) कागदपत्रे जमवून सत्ताधारी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घेरण्याची रणनिती विरोधकांनी आखली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवारांनीही (Rohit Pawar) आपल्याकडील तिसरी फाइल उघडून ॲम्ब्युलन्स घोटाळ्याची पुन्हा एकदा चिरफाड केली आहे.

परिणामी निवडणुकीच्या टेन्शनमध्ये असलेल्या सत्ताधाऱ्यांना आता ॲम्ब्युलन्स घोटाळा तापदायक ठरणार हे निश्चित झाले आहे. विरोधी पक्षांचे सारेच नेते ॲम्ब्युलन्स घोटाळ्यावरून आक्रमक होत असल्याने या निवडणुकीच्या प्रचारात 'टेंडरनामा'ने उघट केलेल्या या घोटाळ्याची चर्चा तर होणार हे नक्की!

राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आरोग्य विभागात सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा ॲम्ब्युलन्स महाघोटाळा (Ambulance Scam) केल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज खळबळ उडवून दिली. पवार यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे ॲम्ब्युलन्स महाघोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

आरोग्य विभागातील बड्या धेंडांना हाताशी धरून करण्यात आलेल्या या घोटाळ्यातील पैसा निवडणुकीसाठी वापरण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. आरोग्यमंत्र्यांवर थेट आरोप करत ॲम्ब्युलन्स घोटाळ्यात तानाजी सावंत यांच्याविरोधात आपल्याकडे सर्व पुरावे असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दहा हजार कोटींच्या या गैरव्यवहार प्रकरणी आरोप करत पवार यांनी सरकारला लक्ष केले.

१०८ सेवेसाठीच्या ॲम्ब्युलन्स टेंडरमध्ये दहा हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला असून, सुमित आणि बीव्हीजी या कंपन्यांवर सरकारकडून मेहरबानी दाखविली जात आहे. विशिष्ट कंपन्यांच्या फायद्यासाठी हे 'टेंडर फ्रेम' करण्यात आले. तानाजी सावंत यांनी हा घोटाळा केला असून, त्यांनी राज्याला भिकारी केले असल्याची जळजळीत टीका रोहित पवार यांनी केली.

ॲम्ब्युलन्स सेवेचे टेंडर मोठ्या प्रमाणात फुगवण्यात आले. एका स्पॅनिश कंपनीला पुढे करून पिंपरी चिंचवडमधील अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीच्या सुमित कंपनीला हे टेंडर देण्यात आले. या कंपनीला ॲम्ब्युलन्स सेवा पुरविण्याचा कुठलाही अनुभव नसतानाही त्यांना हे टेंडर देण्यात आले. स्पर्धेत असेल्या बीव्हीजी कंपनीलाही या टेंडरमध्ये सहभागी करण्यात आले. वस्तुत: बीव्हीजी कंपनीबाबत अनेक तक्रारी असून, अनेक राज्यांमध्ये या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करण्यात आले आहे. मात्र असे असतानाही एक स्पॅनिश कंपनी, सुमित आणि बीव्हीजीला मिळून या टेंडरचे वाटप करण्यात आले असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.

सावंत यांना आपण खुले आव्हान देत असून, त्यांनी पाच दिवसांत आपली बाजू मांडावी. आपण कुठेही त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहोत, असे पवार म्हणाले.

'टेंडरनामा'ने केला होता ॲम्ब्युलन्स महाघोटाळ्याचा भांडाफोड

राज्याच्या आरोग्य विभागाने सरकारी ॲम्ब्युलन्स सेवेचे टेंडर (Dail 108 Ambulance Tender) काढताना नियमांना धाब्यावर बसवून तीन - साडेतीन हजार कोटींचे टेंडर फुगवून दहा हजार कोटींचे केल्याच्या धक्कादायक प्रकाराचा भांडाफोड 'टेंडरनामा'ने सर्व प्रथम केला होता.

ॲम्ब्युलन्स घोटाळ्याचे वृत्त 'टेंडरनामा'ने प्रसिद्ध केल्यानंतर खडबडून जाग आलेल्या आरोग्य विभागाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. 'टेंडरनामा'च्या या वृत्ताची राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड चर्चा झाली होती. आज रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांनंतर पुन्हा एकदा हे प्रकरण तापणार असल्याचे दिसते आहे.