Bullet Train Tendernama
टेंडर न्यूज

Bullet Train : बुलेट ट्रेनसाठी ट्रॅक निर्मिती युद्धपातळीवर; सुरतमध्ये 'तो' सर्वात मोठा कारखाना सुरू

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ट्रॅकनिर्मितीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या ट्रॅकसाठी स्लॅबनिर्मितीचा कारखाना सुरतच्या किम गावात सुरू करण्यात आला आहे. आधुनिक शिंकानसेन तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च क्षमतेच्या बॅलास्टलेस ट्रॅक (खडीरहित रूळ) स्लॅबची निर्मिती या कारखान्यात करण्यात येणार आहे. नुकतीच या कारखान्याची पाहणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी केली.

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या गुजरात भागातील आणि दादरा-नगर हवेली भागातील ३५२ किलोमीटरपैकी २३७ किलोमीटर रुळांसाठी सुरतमधील कारखान्यातून काँक्रीट ट्रॅक स्लॅब तयार करण्यात येणार आहेत. हा देशातील सर्वांत मोठा ट्रॅक स्लॅबनिर्मिती कारखाना आहे. १९ एकर क्षेत्रफळावरील या कारखान्याची उत्पादन क्षमता १२० ट्रॅक स्लॅब प्रतिदिन इतकी आहे. हा कारखाना बुलेट ट्रेन प्रकल्पस्थळापासून जवळ असल्याने वाहतूक आणि पुरवठा वेळेत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. रेल्वे रुळांच्या स्थिरतेसाठी काँक्रीट ट्रॅक स्लॅब महत्त्वाची भूमिका बजावतात. हे पूर्वनिर्मित काँक्रीट ट्रॅक स्लॅब साधारणपणे २२०० मि.मी. रुंद, ४९०० मि.मी. लांब आणि १९० मि.मी. जाड आहेत. प्रत्येक स्लॅबचे वजन अंदाजे ३.९ टन इतके आहे. या कारखान्याची उत्पादन क्षमता ९६००० जे-स्लॅब तयार करण्याची आहे. हे स्लॅब सिमेंट ॲस्फाल्ट मॉर्टरपासून म्हणजेच सिमेंट, डांबर वाळू, पाणी आणि इतर रासायनिक पदार्थांपासून बनवलेल्या मिश्रणापासून तयार करतात. हाय-स्पीड रेल्वे ट्रॅक सिस्टीमचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.

जपानमध्ये अवलंबलेल्या पद्धतींवर आधारित ट्रॅकच्या कामासाठी सर्व अभियंत्यांनी जपानी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण आणि प्रमाणीकरण अभ्यासक्रम पूर्ण केले आहे. तसेच भविष्यात महाराष्ट्रातील भागासाठीही ट्रॅक स्लॅब कारखाना उभारण्यात येणार असून, त्याचे टेंडर पुढच्या वर्षी फेब्रुवारीत काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

बुलेट ट्रेन प्रकल्पात ट्रॅक स्लॅबवर रूळ बसविण्यात येत असून त्यासाठी स्लीपरची आवश्यकता नसते. यासाठी आधुनिक जपानी तंत्रज्ञानावर आधारित कारखाना तयार करण्यात आला आहे. ट्रॅक स्लॅब निर्मितीच्या कामासाठी अभियंत्यांना विशिष्ट प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचा फायदा भविष्यातील विविध प्रकल्पांसाठीही होणार आहे.
- अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री