मुंबई (Mumbai) : पुणे (Pune), पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील वाहतूककोंडी (Traffic Problem) सोडविण्यासाठी प्रस्तावित तब्बल ४२,७११ कोटी रुपये खर्चाच्या रिंग रोडच्या (Pune Ring Road) नऊ पॅकेजच्या कामांसाठी पाच ठेकेदार (Contractor) कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.
याअंतर्गत नवयुग कंपनीला तीन आणि पीएनसी कंपनीला एक अशा चार पॅकेजसाठी वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. तसेच मेघा कंपनीला तीन पॅकेजेस, जीआर आणि रोडवेज या कंपन्यांना प्रत्येकी एक अशा पाच पॅकेजसाठी ‘वर्क ऑर्डर’ देण्याची प्रक्रिया राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे.
मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL), नवयुग इंजिनियरिंग कंपनी लिमिटेड (NECL), जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स (GRIL), पीएनसी (PNC) इन्फ्राटेक आणि रोडवे सोल्यूशन्स इंडिया इन्फ्रा (RSIIL) या कंपन्या टेंडरमध्ये पात्र ठरल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) पुणे व पिंपरीची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंग रोड हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. सुमारे १६९ किलोमीटर लांबीचा आणि ११० मीटर रुंदीचा हा रिंग रोड आहे.
विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४२ हजार ७११ कोटी रुपयांच्या सुधारित प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. आचारसंहितेपूर्वी रिंग रोडसाठीचे भूसंपादन ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले. रिंग रोडच्या कामासाठी पाच कंपन्या आणि नऊ पॅकेजेस आहेत.
ही सर्व पॅकेजेस एकाच वेळी सुरू करावीत, यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा आणि कंत्राटदारांचा आग्रह आहे. खडकवासला, सिंहगड, मुळशी, उर्से, चाकण, हिंजवडी, सोरतापवाडी या भागातून कामाचे टप्पे सुरू होतील, असे सांगितले जाते.
पुणे रिंग रोडच्या पूर्व भागात ऊर्से ते सोलू ते सोरतापवाडी (पुणे-सोलापूर रस्ता) या रस्त्याच्या १९,९३२ कोटी ९८ लाख रुपये इतक्या किंमतीच्या कामांना, तसेच पुणे रिंग रोड पश्चिम भागात ऊर्से ते वरवे (बु.) सातारा रोडसाठी २२,७७८ कोटी ५ लाख इतक्या किंमतीच्या कामांना सुधारित मान्यता देण्यात आली आहे.
दोन टप्प्यात रिंगरोडचे काम करण्यात येणार आहे. रस्त्याच्या कामासाठी तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकापेक्षा चाळीस ते पंचेचाळीस टक्के जादा दराने टेंडर आल्याचे उघडकीस आले होते. त्रयस्थ संस्थेमार्फत टेंडरची छाननी करून घेतल्यानंतर आणि पात्र कंपन्यांशी तडजोड करून वीस ते पंचवीस टक्के जादा दराने काम देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
विशेष म्हणजे रिंग रोडचे काम मिळालेल्या यापैकी एका कन्स्ट्रक्शन कंपनीला पुण्यातील खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान होऊ घातलेल्या खडकवासला भुयारी कालव्याचे १६०० कोटी रुपयांचे काम निवडणुकीपूर्वीच देण्यात आले आहे.