पुणे (Pune Heavy Vehicle No Entry Time): बांधकाम क्षेत्राशी संबंधित अवजड वाहनांसाठी असणारे निर्बंध पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने फक्त दोन शनिवार व दोन रविवारसाठी काही प्रमाणात शिथिल केले आहेत. हा बदल प्रायोगिक स्तरावर आहे. त्यानुसार बांधकाम क्षेत्रातील जड वाहनांना ठराविक वेळेत शहरात प्रवेश करता येणार आहे.
मोठ्या प्रकल्पांच्या कामांवर परिणाम
शहरात होणारी वाहतूक कोंडी व अपघातांच्या कारणांमुळे पुणे पोलिसांकडून जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यात कोणताही बदल झालेला नाही. मात्र, शहरात मेट्रो, उड्डाणपूल आदी शासकीय प्रकल्प तसेच बांधकाम प्रकल्पांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला. त्यामुळे प्रायोगिक स्तरावर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. चार दिवसांचा अनुभव लक्षात घेऊन, पुढील धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
जड वाहनांना सरसकट बंदी नाही
शहरातील मध्यवर्ती ठिकाणासह काही रस्ते रेड झोनमध्ये येत असल्याने त्यावर जड वाहनांना सरसकट बंदी नसेल. त्यांना सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत त्यांना वाहतूक करता येणार नाही.
रेड झोनमध्ये नगर रस्त्यावरील काही रस्ते, जुना मुंबई पुणे महामार्गावरील पाटील इस्टेटच्या पुढे अभियांत्रिकी महाविद्यालय, गणेशखिंड रस्त्यावरील ब्रेमेन चौकाच्यापुढे विद्यापीठ चौकाकडे, ब्रेमेन चौकातून पुढे औंध परिहार चौकाकडे, औंध वाकड रस्त्यावरून महादजी शिंदे पुलाच्यापुढे, बाणेर रस्त्यावर राधा चौकाच्यापुढे बाणेर ते विद्यापीठ चौकापर्यंत, पाषाण सूस रस्ता, पौड रस्ता, कर्वे रस्ता/डीपी रस्ता, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रोड), सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, कोंढवा आदी रस्त्यांचा समावेश आहे.
काय आहे बदल
शनिवारी - १९ आणि २६ जुलै - सायंकाळी ४ ते रात्री १० ही वेळ वगळून उर्वरित वेळेत बांधकाम क्षेत्राशी संबंधित जड वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी असेल
रविवारी - २० आणि २७ जुलै - बांधकाम क्षेत्राशी संबंधित जड वाहनांना वाहतुकीसाठी पूर्ण वेळ परवानगी
(हा बदल प्रायोगिक स्तरावर दोन शनिवार आणि रविवारसाठीच आहे.)