मुंबई (Mumbai): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून (NMIA) अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर साकारणारा महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी 'एज्युसिटी' (Educity) प्रकल्प आता पायाभूत सुविधांच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.
या प्रकल्पापर्यंत पोहोचण्यासाठी पोहोच रस्ते बांधकामासाठी सिडकोने नुकतीच ११६.५३ कोटी रुपयांचे टेंडर जाहीर केले आहे. सिडकोद्वारे सुमारे २५० एकर क्षेत्रावर विकसित होणारा हा प्रकल्प देशाला जागतिक शैक्षणिक केंद्र बनवण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या ५ किलोमीटरवर, पनवेलजवळील पुष्पक नगरमध्ये हा प्रकल्प नियोजित आहे. यामुळे प्रकल्पाला जागतिक स्तरावरील उत्तम कनेक्टिव्हिटी मिळेल. प्रकल्पासाठी सिडकोने सुमारे २५० एकर क्षेत्र राखीव ठेवले आहे. आतापर्यंत प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीपैकी ८५ टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे, ज्यामुळे प्रत्यक्ष कामाला गती देणे शक्य झाले आहे.
'एज्युसिटी'ला एक सर्वसमावेशक आणि जागतिक दर्जाचे कॅम्पस म्हणून विकसित करण्यासाठी सिडकोने मोठी आर्थिक तरतूद केली आहे. परिसरातील लहान टेकड्यांमधील दगड काढून जमिनीचे सपाटीकरण करणे हे सिडकोसमोरील प्राथमिक आणि महत्त्वाचे आव्हान आहे.
एज्युसिटी प्रकल्प, त्यामधील सपाटीकरण आणि इतर तयारीच्या कामांसाठी सिडकोने ८९० कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजित केले आहे. प्रकल्पापर्यंत पोहोचण्यासाठी पोहोच रस्ते बांधणीच्या कामासाठी सिडकोने नुकतेच ११६.५३ कोटी रुपयांचे टेंडर ठाकले आहे.
हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक '४ ब' (NH 4B) म्हणजेच पनवेल-उरण-जेएनपीटी महामार्गालगतच्या कुंडेवहाळ गावाजवळून थेट एज्युसिटी प्रकल्पापर्यंत पोहोचेल. हा मार्ग सुमारे १.१ किलोमीटर लांबीचा असून त्याची रुंदी ४५ ते ३० मीटर दरम्यान असेल, ज्यामुळे वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल.
या प्रकल्पात शिक्षण देण्यासाठी आवश्यक असलेल्या आंतरराष्ट्रीय निकषांचे पालन केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा निकष पाळत प्रत्येक विद्यार्थ्याला ३० चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिली जाईल. या निकषाप्रमाणे, प्रत्येक विद्यापीठाला सुमारे १० हेक्टर जागा देण्याचे नियोजित आहे. एकूण १० विद्यापीठांपैकी पहिल्या पाच विद्यापीठांना जागेचे वाटप करण्याची योजना आहे.
प्रकल्प पूरक कनेक्टिव्हिटी आणि भविष्यवेध एज्युसिटीचा विकास हा नवी मुंबईच्या एकूण मोठ्या पायाभूत विकासाचा एक भाग आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ असल्याने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, प्राध्यापक आणि तज्ज्ञांसाठी ये-जा करणे अत्यंत सोयीचे होईल. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे दक्षिण मुंबईतून नवी मुंबईत जलद कनेक्टिव्हिटी मिळाल्याने मुंबई आणि नवी मुंबईतील शैक्षणिक व औद्योगिक केंद्रांशी सहज संपर्क साधता येईल.
सिडको एज्युसिटीसोबतच या भागात मेडिसिटी आणि इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क सारखे पूरक प्रकल्प विकसित करत आहे, जे शैक्षणिक संकुलाला संशोधन, आरोग्य आणि रोजगार संधींच्या दृष्टीने एक परिपूर्ण परिसंस्था तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
'एज्युसिटी' प्रकल्प हा राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने देशाला जागतिक शैक्षणिक नकाशावर आणण्यासाठीची एक मजबूत पायाभूत रचना आहे. यामुळे परदेशातील तुलनेत २५ ते ३० टक्के कमी खर्चात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण भारतीय विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.