नाशिक (Nashik) : भारतीय वायू दल आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून गंगापूर धरण परिसरात २२ व २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या कालावधीत होणाऱ्या एरोबॅटिक शोमध्ये सूर्यकिरण लढाऊ विमाने तिरंगा साकारणार आहेत.
या शोची जय्यत तयारी पूर्णत्वास आली असून नाशिक येथे होणा-या सूर्यकिरण एरोबॅटिक शोमुळे नाशिकच्या डिफेन्स कॉरिडॉरचे राष्ट्रीयस्तरावर ब्रँडिंग होण्यास मदत होणार आहे. तसेच नाशिक हे संरक्षण व हवाई उद्योगासाठी एक महत्वाचे केंद्र म्हणून अधोरेखित होणार आहे, असा विश्वास नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला आहे.
संरक्षण मंत्रालयाने देशात तीन संरक्षण कॉरिडॉर उभारण्याचे जाहीर केले असून त्यातील एक कॉरिडॉर नाशिक येथे होणार असल्याची माहिती नुकतीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील एरोबॅटिक शोमुळे नाशिकचे हवाई क्षेत्रातील उद्योगाची नव्याने ओळख निर्माण होण्सास मदत होणार आहे.
जागतिकस्तरावर नावाजलेला हा शो प्रथमच नाशिक येथे होत असून नाशिकला डिफेन्स कॉरिडॉर म्हणून विकसित करण्यास या शोची मदत व्हावी हा देखील यामागील उद्देश आहे. या शोच्या निमित्ताने संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांना नाशिकमध्ये गुंतवणुकीस आकर्षित करण्याचाही उद्देश आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, भारतीय वायू दलाचे स्क्वॉड्रन लिडर गौरव पटेल, संदीप दयाळ, फ्लाईट लेफ्ट. कवल संधू, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, संरक्षण दलाच्या सदर्न कमांडचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण आदींनी सूर्यकिरण शो बाबत माहिती दिली.
सूर्यकिरण टीम १९९६ मध्ये स्थापन झाली आहे. या टीमने देश-विदेशात झालेल्या ७५० पेक्षा एरोबॅटिक शोमध्ये सहभाग नोंदविला आहे. आशिया खंडातील ही सर्वोत्तम टीम मानली जाते. या टीममध्ये लढाऊ वैमानिक, अभियंता, कुशल तंत्रज्ञ यांच्यासह दीडशे जणांचा समावेश आहे. सूर्यकिरण शोच्या प्रात्यक्षिकांसाठी हॉक एमके १३२ या स्वदेशी प्रशिक्षणार्थी विमानांचा वापर केला जाणार आहे. या विमानांचा २०१५ मध्ये समावेश करण्यात आला आहे.
ही विमाने वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखवीत असताना त्यातून केशरी, पांढरा आणि हिरवा रंग म्हणजे तिरंगा रंग सोडला जातो. त्यासाठी या विमानात केलेल्या तांत्रिक सुधारणाही नाशिक येथेच करण्यात आल्या आहेत. सूर्यकिरण विमाने प्रात्यक्षिक सादर करताना त्यांच्यात किमान पाच मीटर अंतर राहील. ते गंगापूर धरणावर वेगवेगळी प्रात्यक्षिक सादर करतील. त्यासाठी सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली आहे.
‘सदैव सर्वोत्तम’ हे सूर्यकिरण टीमचे बोधवाक्य आहे. त्यानुसार २२ व २३ जानेवारी २०२६ रोजी गंगापूर धरण परिसरात सर्वोत्तम एरोबॅटिक शोचे प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. हो शो बघण्यासाठी नागरिकांना बैठक व्यवस्था करण्यात आली असून गंगापूर धरण परिसरात वाहनतळाचीही सुविधा उभारण्यात आली आहे.
या एरोबॅटिक शोसाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आतापर्यंत १७ हजारपेक्षा अधिक नागरिकांनी या शोसाठी तिकीट बुकिंग केले आहे. या शोमुळे २२ व २३ जानेवारी या दोन दिवस आनंदवल्ली ते गंगापूर धरण या परिसरातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.