Nashik
Nashik Tendernama
टेंडर न्यूज

Naredra Modi : मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक धावणार बुलेट ट्रेन

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे (Mumbai Ahmedabad Bullet Train Project) काम युद्धपातळीवर सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) नुकतीच बुलेट ट्रेनच्या आणखी नव्या मार्गांची घोषणा केली आहे. (Mumbai Nashik Nagpur Bullet Train News)

यात मुंबई-नाशिक-नागपूर आणि मुंबई-हैदराबाद या मार्गांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात मुंबई-अहमदाबाद मार्गासह एकूण १० मार्गांवर बुलेट ट्रेन्स धावतील, या घोषणेचा समावेश आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाचे बांधकाम नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावेल असा रेल्वेचा प्रयत्न आहे. मात्र त्यापूर्वीच बुलेट ट्रेनसंदर्भातील इतर मार्गांच्या चाचपणीचे काम सुरू झालेले असेल. यापैकी एक मार्ग हा मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक असा असून, यासंदर्भातील चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

नवी दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादबरोबरच देशातील इतर सहा मार्गांवरही बुलेट ट्रेन सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. या सहा मार्गांवर बुलेट ट्रेन सुरू केल्यास त्याचा व्यवहारिक ताळमेळ कसा बसू शकतो यासंदर्भातील अहवाल तयार करण्यात आले आहेत. सहा मार्गांपैकी 2 मार्गांच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे म्हणजेच डीपीआरचे काम लोकसभा निवडणुकीनंतर सुरु होणार आहे.

ज्या मार्गांवरील बुलेट ट्रेनसंदर्भातील चाचपणी सुरू आहे त्यात मुंबईतून जाणारे एकूण 2 मार्ग आहेत. या मार्गांच्या बांधणीसंदर्भातील अहवालही तयार करण्यात आला आहे. ज्या मार्गांवर बुलेट ट्रेन सुरू करण्याचा विचार असून अहवाल तयार करण्यात आले आहेत. त्यात दिल्ली-अमृतसर, हावरा-वाराणसी-पाटणा, दिल्ली-आग्रा-लखनऊ-वाराणसी, दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद, मुंबई-नाशिक-नागपूर, मुंबई-हैदराबाद या मार्गांचा समावेश आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पानंतर हावरा-वाराणसी आणि दिल्ली-अमृतसर मार्गावरील बुलेट ट्रेनसंदर्भातील काम सुरू होईल. लोकसभा निवडणुकीनंतर डीपीआर तयार करण्यास सुरुवात केली जाणार आहे. डीपीआरचे काम सहा ते आठ महिन्यांमध्ये पूर्ण केले जाईल.

भारतातील पहिला बुलेट ट्रेन मार्ग हा 508 किलोमीटर लांबीचा असणार आहे. या मार्गामध्ये पहिल्यांदाच समुद्राखालील बोगद्यांमधून बुलेट ट्रेन कॉरिडोअर तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे वेगाने काम सुरू आहे. सुरत आणि बालिमोरादरम्यान या मार्गावरील चाचण्या 2026 मध्ये सुरू होतील. महाराष्ट्र, दादरा-नगर-हवेली आणि गुजरातमधील भूसंपादनाची कामे पूर्ण झाली असून आता बांधकाम वेगाने सुरू आहे.