मुंबई (Mumbai): पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवेचे काम आता अंतिम टप्पा आले असून, हा द्रुतगती मार्ग मार्च २०२६ मध्ये सुरू करण्याचे उद्धिष्ट आहे.
जिल्ह्यातील टप्पा क्रमांक ११ मधील गंजाड-तलासरी (२६ कि.मी.) भागाचे काम आर.के.सी. इन्फ्राबिट, गंजाड-मासवण (२६ कि.मी.) भागाचे काम मोंटो कार्लो, तर तिसऱ्या भागाचे काम जीआर इन्फ्रा या कंपन्यांना देण्यात आले आहे.
सध्या गंजाड येथील नाशिक-डहाणू राज्य मार्गावरील महत्त्वाच्या इंटरचेंजचे काम वेगाने सुरू आहे. या इंटरचेंजमुळे डहाणू, बोर्डी, उंबरगाव, वानगाव, चिंचणी, वाढवन तसेच चारोटीमार्गे जव्हार, वाडा, विक्रमगड, ठाणे, नाशिक या भागांतील वाहनांना सुलभ दळणवळण मिळणार आहे. एकूण ३७९ किलोमीटर लांबीचा व आठ पदरी असणारा हा एक्सप्रेसवे वसई, पालघर, डहाणू व तलासरी तालुक्यातील ५१ गावांमधून जाणार आहे.
या मार्गावर वाहनांना १२० किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करण्याची परवानगी असेल. जिल्ह्यात चढ-उतारासाठी पालघर तालुक्यात मासवण आणि डहाणू-नाशिक मार्गावरील गंजाड येथे इंटरचेंज उभारले जात आहेत. मात्र मासवण इंटरचेंज तारापूर औद्योगिक वसाहतीला फारसा सोयीचा नसल्याने बोईसरच्या नागझरी येथे अतिरिक्त इंटरचेंजची मागणीही होत आहे.
मुंबई-वडोदरा हा मार्ग महाराष्ट्र, गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश दादरा-नगर हवेलीला जोडला जाणार असून, सध्याचा ५५० कि.मी. प्रवास १०-१२ तासांचा आहे. एक्सप्रेसवे सुरू झाल्यानंतर हे अंतर ३७९ कि.मी.वर येऊन प्रवासात ३.५ ते ५ तासांची बचत होईल. या मार्गावर ३४ टोल प्लाझा (त्यापैकी २ मुख्य), २४ फ्लायओव्हर आणि १४७६ वाहन अंडरपास असतील.
सध्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांमुळे व अपूर्ण कामांमुळे दररोज पाच ते आठ तासांची वाहनकोंडी होत असून, चालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला व्हावा, अशी मागणी होत आहे.