BMC
BMC Tendernama
टेंडर न्यूज

मुंबईची 'तुंबई' होण्यापासून रोखण्यासाठी BMCचा मास्टरप्लॅन; 2 हजार कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : समुद्रातील पाणी मिठी नदीद्वारे पुन्हा शहरात येऊ नये, यासाठी मुंबई महानगरपालिका २८ ठिकाणी फ्लडगेट्स (पूररोधक दरवाजे) बांधणार आहे. येत्या आठवड्याभरात फ्लडगेट्ससाठी महापालिकेकडून दोन हजार कोटींचे टेंडर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

२६ जुलै, २००५च्या पावसात मुंबई पाण्याखाली गेली होती. त्यावेळी १८ किलोमीटर लांब असलेल्या मिठी नदीला पूर आल्यानंतर मुंबईतील अनेक भागांत पाणी तुंबले. त्यानंतर महापालिकेने मिठी नदीचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला. मिठी नदीतील सांडपाणी, रसायनमिश्रीत पाणी रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजनाही केल्या जात आहेत. विहार तलावापासून माहीम खाडीपर्यंत नदी विस्तारली असून, ही नदी अंधेरी, वांद्रे, कुर्ला परिसरातून जाते. हे फ्लडगेट्स माहीम खाडीपासून सुरू होणाऱ्या भरती-ओहोटीच्या क्षेत्रासह अन्य भागात बसविण्याचे नियोजन आहे.

या परिसरात फ्लडगेट्स उभारल्याने भरतीच्या वेळेस हे दरवाजे बंद केल्यास नदीतील पर्जन्य जलवाहिन्यांतून पाणी रोखण्यास मदत होईल. ओहोटीच्या वेळेस हे दरवाजे उघडून पर्जन्य जलवाहिन्यांमधील पाणी नदीत जाण्यास मदत होईल. पाणी ओव्हरफ्लो होऊन रेल्वे रुळांवर जाणार नाही. वाहतूक सुरळीत राहील. मिठी नदीच्या एकूण प्रवाहमार्गाच्या परिसरात झोपड्या असून, या ठिकाणाहून जलप्रवाह, सांडपाणी मिठी नदीत येते. त्याचबरोबर, मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकसह विविध प्रकारचा कचरा मिठी नदीत टाकला जातो. परिणामी, अनेक भागांत मिठी नदी अक्षरशः तुंबते आणि विविध भागांत कचरा अडकून मुसळधार पावसात मिठीला पूर येतो. मुंबईतील सांडपाणी मिठी नदीत सोडले गेल्यामुळे मिठी नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून मिठी नदीवर बसविण्यात येणारे फ्लडगेट्स याचा प्रतिबंध करण्यात मदत करतील.