मुंबई (Mumbai): मुंबईतील काळबादेवी येथे असलेली 120 वर्षांहून अधिक जुनी असलेली स्वदेशी मार्केट इमारत धोकादायक स्थितीत असून त्याच्या पुनर्विकासाला काही व्यापारी विरोध करत आहेत. हा विरोध मोडून काढण्यासाठी स्वदेशी मार्केटमधल्या पुर्नविकासाच्या बाजूने असलेल्या व्यापारी आणि रहिवाशांनी नुकतेच आंदोलन केले. निवडक व्यापाऱ्यांच्या हट्टापायी शेकडो नागरिकांच्या जीवाशी खेळू नका, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या इमारतीच्या पुनर्विकासाच्या टेंडरसाठी ओबेरॉय, यूनिक शांती, आशापुरा, शेल्टन, वर्धमान, भांडारी हे बिल्डर इच्छूक आहेत.
याठिकाणी ५०० हून अधिक भाडेकरू व्यापारी आणि काही रहिवासी आहेत. यात अनेक गुजराती आणि काही मराठी रहिवासी आहेत. म्हाडा व बीएमसी दोघांनीही इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले असून धोकादायक भाग पाडण्यास सुरुवातही केली आहे. परंतु १२ व्यापाऱ्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांच्याही जीवाचा धोका पत्करत पुर्नविकासाच्या विरोधात जाऊन बीएमसीच्या नोटीसवर स्थगिती आणली.
इमारत धोकादायक असूनही तिथे अजूनही व्यापार सुरू आहे. या विरोधात शुक्रवारी स्वदेशी मार्केटमधल्या पुर्नविकासाच्या बाजूने असलेल्या व्यापारी आणि रहिवाश्यांनी आंदोलन केले. हे आंदोलन पुनर्विकास प्रक्रियेस चालना देण्यासाठी असून प्रशासन, विरोधक दुकानदार आणि व्यवस्थापन यांच्यात संवादातून तोडगा निघण्याची अपेक्षा इथल्या दुकानदारांनी व्यक्त केली.
गेली ४८ वर्षे मुकेश मोरे स्वदेशी मार्केटच्या इमारतीत वास्तव करत आहेत. इमारत धोकादायक असल्यामुळे बीएमसीने इमारतीचा पाचवा मजला तोडला असून तरीही काही व्यापाऱ्यांना फक्त व्यापाराची चिंता असल्याने ते पुर्नविकासाला विरोध करत असल्याचं ते सांगतात. लोकांच्या जीवाशी खेळू नका अशी विनंती ते करतात.
रुपम भाटीया हे स्वदेशी मार्केटमधले छोटे व्यापारी आहेत. म्हाडाने रहिवाश्यांची घरे तोडली तेव्हा एकही व्यापारी बघायला आला नाही असे ते सांगतात. काही भाग अर्धवट तोडल्यानंतरही पुर्नविकासाला विरोध करण्याचे काय कारण आहे? काही निवडक व्यापाऱ्यांच्या हट्टापायी अनेकांच्या जीवाशी खेळ करू नका असे ते सांगतात. ग्राहक आणि रहिवाशांचा जीव धोक्यात न घालण्यासाठी मराठी रहिवासी आणि गुजराती व्यापारी एकत्र आले आहेत.
ठळक मुद्दे...
1960: इमारत कमजोर झाल्यावर शेअर विकून दुरुस्ती खर्च उभारण्यात आला.
2012: स्वदेशी मार्केटचा ब्रिज कोसळला.
2016: दुरुस्ती ऐवजी पुनर्विकासाची मागणी; मात्र व्यवस्थापनाचा दुरुस्तीकडे कल.
2023: फेब्रुवारी: बीएमसीकडून C2 नोटीस
जुलै: C1 श्रेणीतील धोकादायक इमारत जाहीर
ऑगस्ट: पीएमसी निवडीसाठी टेंडर प्रक्रिया सुरू; पलाश पीएमसी नियुक्त
सप्टेंबर: बिल्डर टेंडर; ६ बिल्डर्सनी सहभाग घेतला – ओबेरॉय, यूनिक शांती, आशापुरा, शेल्टन, वर्धमान, भांडारी
सध्या १२ दुकानदार व्यवस्थापनाच्या विरोधात आहेत. त्यांचा व्यवसाय चालू असल्याने ते पुनर्विकासाला विरोध करत आहेत. त्यांनी एनसीएलटीत याचिका दाखल करून C1 वर्गातील इमारतीच्या पुनर्विकासावर स्थगिती आणली आहे.