Best
Best Tendernama
टेंडर न्यूज

Mumbai : 'बेस्ट'चा दणका: अखेर 700 वातानुकूलित डबलडेकर ई-बसेसच्या मार्गातील अडथळा दूर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : बस पुरवठ्यासठ्यास टाळाटाळ करणाऱ्या 'कोसिस ई-मोबिलिटी प्रा. लि.' कंपनीला 'बेस्ट' प्रशासनाने काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिल्यानंतर आता कंपनीने 700 डबलडेकर बस पुरवठा करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बसेसच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.

'बेस्ट'च्या ताफ्यात असलेल्या डबलडेकर बस गाड्यांची वयोमर्यादा संपुष्टात आल्याने प्रशासनाने नव्या 900 बसेस भाडेतत्त्वावर निर्णय घेतला आहे. यासाठी राबवण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत बसेस 'स्विच मोबिलिटी ऑटोमोटीव्ह' आणि कॉसिस कंपनीने प्रतिसाद दिला. 900 इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बसेसपैकी 200 बसेस 'स्विच मोबॅलिटी ऑटोमोटीव्ह'ने पुरवण्याची तयारी दर्शवली. तर 700 इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बसेसचा पुरवठा करण्याची तयारी 'कोसिस ई-मोबिलिटी प्रा. लि.' कंपनीने दर्शवली. मात्र दरम्यानच्या काळात दोन्ही कंपन्यांकडून बसेसचा पुरवठा करण्यात उशीर झाला. तांत्रिक कारण पुढे करत 700 बसचा पुरवठा करणाऱ्या 'कोसिस ई-मोबिलिटी प्रा. लि.' कंपनीने नकार दिला होता. त्यामुळे 700 वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बसेसच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता 'बेस्ट' प्रशासनाने कारवाईचा इशारा दिल्यानंतर कंपनीने बस पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. या बस लवकर पुरवल्या जातील असे कंपनीने 'बेस्ट' प्रशासनाला कळवले आहे.

बसची ऑपरेशनल क्षमता 180 कि.मी. इतकी आहे. 45 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये या बस 100 कि.मी.पर्यंत धावू शकतात, तर संपूर्ण चार्जसाठी 80 मिनिटे लागतात. या बसची बॉडी अॅल्यूमिनियमपासून बनवलेली आहे. या एका बसची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे. यातून 90 प्रवाशी प्रवास करू शकतात. या वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बसेस मुंबईकरांच्या पसंतीस उतरल्या आहेत. मुंबईत लोकल आणि बेस्ट या मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जातात. वेगवान लोकलला सर्वाधिक पसंती दिली जात असली तरी बेस्टमधूनही हजारो लोक दररोज प्रवास करत असतात. बेस्टच्या ताफ्यात पूर्वीपेक्षा आधुनिक अशा डबलडेकर दाखल झाल्यामुळे बेस्टची शान वाढली आहे. सर्वांत स्वस्त प्रवास म्हणून बेस्ट बसना पसंती दिली जात असून पहिल्या पाच किलोमीटरचा गारेगार प्रवास फक्त सहा रुपयांत करता येतो. त्यामुळे मुंबईकर आणि पर्यटक या बसेसला भरभरून प्रतिसाद देत आहेत.