bullet train
bullet train tendernama
टेंडर न्यूज

Bullet Train : डोळे दिपवणारे ते 'मल्टिमॉडल ट्रान्सपोर्ट हब' आहे कुठे?; रेल्वेमंत्र्यांनी ट्विट करत...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या महत्त्वकांक्षी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या साबरमती येथे उभारण्यात आलेल्या मल्टिमॉडल ट्रान्सपोर्ट हबचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच हा व्हिडिओ शेअर केला आहे. डोळे दिपवून टाकणारा हा व्हिडिओ सर्वांच्या कुतुहलाचा विषय बनला आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. अत्याधुनिक सुविधांसह सज्ज होत असलेली ही बुलेट ट्रेन अहमदाबाद-मुंबई अशी धावणार आहे. ही रेल्वे प्रकल्प जपान सरकारच्या तांत्रिक आणि आर्थिक सहाय्याने उभा रहात आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १,०८,००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पानंतर मुंबई आणि अहमदाबाद ही दोन मोठी शहरं २.०७ तासांच्या अंतराने जोडली जातील. या बुलेट ट्रेनचा वेग ताशी ३५० किलोमीटर असणार आहे. बुलेट ट्रेनच्या ५०८ किलोमीटरच्या मार्गामध्ये समुद्राखालील मार्ग आणि बोगद्यांचाही समावेश आहे.

राज्यातही बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. मुंबईतील बीकेसीसह समुद्राखालील ७ किमी लांबीच्या बोगद्यासह २१ किमी लांबीच्या बोगद्याचे कामदेखील सुरू करण्यात येणार आहे. मुंबईतील बीकेसी ते ठाणेदरम्यान 21 किलोमीटरचा भूमिगत मार्ग बांधला जाणार आहे. हा मार्ग समुद्राच्या खालून तयार केला जाणार आहे. 7 किलोमीटरचा मार्ग हा 'अंडर सी टनल'चा म्हणजेच समुद्राखालून जाणाऱ्या बोगद्याचा असेल. २०१७ मध्ये नरेंद्र मोदी आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत बुलेट ट्रेन प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आलेला होता. या प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर दिल्ली-वाराणसी, दिल्ली-अहमदाबाद, मुंबई-नागपूर, मुंबई-हैदराबाद, चेन्नई-म्हैसूर, दिल्ली-अमृतसर हे प्रकल्प हाती घेण्याचं सरकारचं धोरण आहे.