MMRDA
MMRDA Tendernama
टेंडर न्यूज

MMRDA ठाणे-बोरिवली भूमिगत मार्गासाठी 2 टेंडर; 11 हजार कोटींचे...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) बहुप्रतीक्षित ११.८ किमी लांबीच्या ठाणे-बोरिवली भूमिगत मार्गाच्या बांधकामासाठी दोन टेंडर (Tender) प्रसिद्ध केली आहेत. ११.८ किमीच्या या भूमिगत मार्गात १०.२५ किमी लांबीचे दोन बोगदे बांधण्यात येणार आहेत, त्यासाठी दोन टेंडर मागविण्यात आली आहेत.

या महत्त्वाच्या प्रकल्पावर सुमारे ११,२३५ कोटींचा खर्च होणार आहे. टेंडर प्रकिया पूर्ण करून पुढील ५ वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे ठाणे-बोरिवली प्रवासातील दीड ते दोन तासांचा वेळ अवघ्या २० मिनिटांवर येणार आहे.

सुरुवातीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ठाणे-बोरिवली भूमिगत मार्ग हाती घेतला होता. पण पाच वर्षात हा प्रकल्प एमएसआरडीसीला मार्गी लावता न आल्याने २०२१ मध्ये राज्य सरकारने हा प्रकल्प एमएमआरडीएकडे हस्तांतरित केला. सध्या ठाणे येथून बोरिवलीला जाण्यासाठी सव्वा ते दीड तास लागतो. वर्दळीच्या वेळी या प्रवासासाठी दोन तास लागतात. या पार्श्वभूमीवर प्रवासी-वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

हा प्रकल्प एमएमआरडीएकडे आल्यानंतर कामास सुरवात होणे अपेक्षित होते. मात्र हा मार्ग जंगलातून जात असल्याने पर्यावरण, वन्यजीवांना धोका पोहोचू शकतो ही बाब लक्षात घेऊन सरकारने प्रकल्पाविषयी पुन्हा अभ्यास करण्याचे निर्देश एमएमआरडीएला दिले होते. अभ्यासाअंती तयार करण्यात आलेल्या सुधारित आराखड्याला मंजुरी देण्याच्या प्रक्रियेत वेळ गेल्याने प्रकल्पाचे काम रेंगाळले. पण आता मात्र एमएमआरडीएने या प्रकल्पाच्या बांधकामासाठी टेंडर जारी केले आहे.

एमएमआरडीएच्या टेंडरनुसार ११.८ किमीचा हा भूमिगत मार्ग आणि यातील १०.२५ किमी लांबीचे दोन बोगदे अशा कामांसाठी दोन टेंडर मागविण्यात आली आहेत. हे दोन्ही बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहेत. यात येण्यासाठी तीन-जाण्यासाठी तीन अशा सहा मार्गिका असणार आहेत. टेंडर प्रकिया येत्या तीन-चार महिन्यांत पूर्ण करून पावसाळ्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. या प्रकल्पाचे काम सुरू होऊन पूर्ण होण्यास पाच वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.