Western Freeway
Western Freeway Tendernama
टेंडर न्यूज

MMRDA : पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी MMRDA चे मोठे पाऊल; टी जंक्शनजवळ...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात 'एमएमआरडीए'ने पश्चिम द्रुतगती महामार्गावरील टर्मिनल जंक्शनजवळ स्टील गर्डर्सचे लाँचिंग यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. सुमारे ७४ मीटर चे एकूण आठ स्टील आणि पीएससी गर्डर्स स्पॅनची उभारणी करण्यात आली आहे. हे गर्डर्स जमिनीवरून कोणताही आधार न घेता उभारण्यात आले आहेत.

एमएमआरडीएने हे जड स्टील गर्डर्स लाँच करण्यासाठी इनव्हर्टेड टी व्यवस्थेचा वापर करून नवीन डिझाईन आणि तंत्र वापरले आहे. डिझाईन नुसार उड्डाणपुलाची रचना कमी लांबी आणि कमीत कमी उंचीसह केली गेल्याने खर्चात लक्षणीय घट झाली आहे.

एमएमआरडीएने हाती घेतलेल्या या प्रकल्पातील उड्डाणपुलाची लांबी ६१५ मीटर असून, तो ८ मीटर रुंद असणार आहे. त्यामुळे, काम पूर्ण झाल्यावर हा नवीन उड्डाणपूल प्रवाशांना विमानतळावर आणि तेथून विहित ठिकाणी प्रवास करताना मोठा दिलासा देणार आहे.

फ्लायओव्हरचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे टर्मिनल १ जंक्शनवरील पीक-अवर मध्ये सुमारे १०,००० पेक्षा जास्त गाड्या असल्याचे आढळून आले आहे, ज्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो असतो. पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करणे हा फ्लायओव्हरचा एक महत्त्वाचा फायदा आहे. त्यामुळे आंतरराष्‍ट्रीय विमानतळ टर्मिनल २ ते वांद्रे पर्यंतच्या वाहतुकीत सुधारणा होणार आहे.

'एमएमआरडीए'चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, 'उड्डाणपुलामुळे वाहतुकीवर सकारात्मक परिणाम होणार आहे. विशेषत: हा उड्डाणपूल देशांतर्गत उड्डाणांच्या प्रवाशांना, तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यांचा विमानतळावर ये-जा करताना मोठा ताण कमी होणार आहे. या नवीन उड्डाणपुलामुळे गर्दीच्या वेळेत विमानतळाच्या दिशेने जाण्याची प्रवाशांची चिंता दूर येईल.'