dada bhuse
dada bhuse Tendernama
टेंडर न्यूज

शिंदे गटाच्या दादा भुसेंनी फिरविला शब्द; ४६१ पैकी १० गावांनाच...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या संमतीने जिल्हा नियोजन समितीच्या ४२ कोटींच्या निधीतून जनसुविधा कामांचे नियोजन करण्यात आले आहे. या निधीतून स्मशानभूमी बांधकाम करणे, स्मशानभूमी शेड बांधणे या ३४ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यात पूर्वी स्मशानभूमी नसलेल्या केवळ दहा गावांमध्ये नवीन स्मशानभूमी मंजूर करण्यात आल्या आहेत. यामुळे नाशिक जिल्ह्यातील स्मशानभूमी नसलेल्या गावांची संख्या या वर्षात केवळ दहाने कमी होणार असून उर्वरित ४५१ गावांमधील नागरिकांना त्यांच्या कुटुंबातील मृतांना उघड्यावरच अग्निडाग द्यावा लागणार आहे.

जिल्ह्यातील १९०० गावांपैकी ४६१ गावांमध्ये स्मशानभूमी नाही. परिणामी पावसाळ्यात अंत्यविधी करण्यासाठी मृताच्या नातेवाईकांची कुचंबणा होत असते. यामुळे स्मशानभूमी नसलेल्या गावांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विशेष निधी देऊन नागरिकांची गैरसोय थांबवण्याची मागणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे ऑक्टोबरमधील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली होती. यावर पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेला सूचना देत स्मशानभूमी नसलेल्या गावांसाठी स्मशानभूमी बांधण्याचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवले होते. त्या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ४६१ गावांमध्ये स्मशानाभूमी बांधकाम करण्यासाठी ४६ कोटी रुपयांच्या निधीची गरज असल्याचा प्रस्ताव दिला होता. त्यातच मधल्या काळात सुरगाणा तालुक्यातील गुजरात लगतच्या गावांमधील काही नागरिकांना विकासापासून वंचित राहिल्याचे कारण सांगत गुजरातमध्ये जाण्याची मागणी केली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पालकमंत्री भुसे यांनी सुरगाणा तालुक्यातील प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन दिले होते. विशेष म्हणजे जिल्ह्यातील स्मशाानभूमी नसलेल्या ४६१ गावांमधील १२२ गावे एकट्या सुरगाणा तालुक्यातील आहेत. या सुरगाणा तालुक्यात स्मशानभूमी बाधकामाच्या केवळ दोन कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहेत. उर्वरित कामांमध्ये अस्त्वित्वात असलेल्या स्मशानभूमीच्या अनुषंगिक कामांचा समावेश आहे.

पालकमंत्र्यांनी ४२ कोटींच्या जनसुविधेच्या कामांमधून जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमधील ४२८ कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या असून या कामांमध्ये स्मशानभूमी शेड बांधणे, स्मशानभूमी बांधणे, स्मशानभूमी, अनुषंगिक कामे, स्मशानभूमीवर पेव्हरब्लॉक टाकणे, संरक्षक भींत बांधणे, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता तयार करणे, ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम, कब्रस्तान संरक्षक भिंत आदी कामे मंजर केली आहेत. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील ४२८ कामांपैकी पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक ६५ कामे मंजूर करण्यात आली आहेत.

नवीन स्मशानभूमी मंजूर कामे
तालुका    कामे
नाशिक १
इगतपुरी ३
सुरगाणा २
सिन्नर २
येवला १
त्र्यंबक १