Atul Save
Atul Save Tendernama
टेंडर न्यूज

मंत्री अतुल सावे अन् 'ज्ञानदीप'चे अर्थपूर्ण साटेलोटे पुन्हा उघड!

मारुती कंदले

मुंबई (Mumbai) : मंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्याकडील इतर मागासवर्ग (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग विभाग (OBC, VJ-NT) आणि काही विशिष्ट खासगी शिकवणी संस्थांमधील अर्थपूर्ण साटेलोटे पुन्हा एकदा उजेडात आले आहे. विभागाअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (MAHAJYOTI) एका निवड चाचणीमध्ये पुण्यातील 'ज्ञानदीप' या खासगी शिकवणीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न जसेच्या तसे समाविष्ट करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

यापूर्वी याच संस्थेवर टेंडर शिवाय तब्बल तिप्पट शुल्क वाढीची मेहेरनजर सावेंच्या खात्याने दाखवली होती. महाराष्ट्रात अनेक नामांकित कोचिंग क्लासेस असताना ओबीसी व्हीजेएनटी विभागाने पुण्यातील 'ज्ञानदीप' अकादमीवर केलेली विशेष मेहेरबानी आजही चर्चेचा विषय आहे. विशेष म्हणजे, सावेंचे खासगी सचिव प्रशांत खेडकर यांची 'ज्ञानदीप'चे महेश शिंदे यांच्याशी अत्यंत जवळीक आहे. खेडकर यांची दोन पुस्तके सुद्धा 'ज्ञानदीप'ने प्रकाशित केली आहेत.

नागपूरस्थित 'महाज्योती' अर्थात महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेद्वारे MPSC, UPSC, JEE आणि NEET आदी परीक्षांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठीची निवड चाचणी ३० जुलै रोजी घेण्यात आली होती. राज्यभरातील एक हजार जागांसाठी सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. एकूण १०० प्रश्न आणि २०० गुणांसाठीची ही परीक्षा होती. त्यातील बहुतेक प्रश्न पुण्यातील 'ज्ञानदीप' या खासगी प्रशिक्षण वर्गाच्या 'टेस्ट सिरीज'मधील असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

आव्हाडांची सडकून टीका

यावरून माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. राज्य सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कसे खेळत आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे रविवारी (ता. 30 जुलै) झालेली 'महाज्योती'ची परीक्षा, अशी टीका त्यांनी केली आहे.

आव्हाड म्हणाले की, ही परीक्षा 2 सत्रात झाली. दोन्ही सत्रात ज्या प्रश्नपत्रिका वाटण्यात आल्या त्या पूर्णच्या पूर्ण एका खाजगी क्लासच्या प्रश्न पत्रिकेच्या कॉप्या होत्या. सर्वच्या सर्व प्रश्न जे खाजगी क्लासच्या प्रश्नपत्रिकेत होते, तेच प्रश्न 'महाज्योती'च्या प्रश्नपत्रिकेत जसेच्या तसे उतरवले गेले आहेत. ही अत्यंत गंभीर आणि हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणारी बाब आहे, अशी भीती आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

आव्हाडांचे आरोप...

याबाबत आव्हाड यांनी राज्य सरकारला खडसून जाब विचारला आहे. आव्हाड म्हणतात की,
1. महाज्योती संस्थेवर राज्य सरकार जो खर्च करत आहे, तो नेमका कशासाठी करत आहे? जर एखाद्या खाजगी क्लासच्या प्रश्नपत्रिकाच जर इथले अधिकारी "सेट" करणार असतील तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय?
2. या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी जिवाचे रान केले होते. यासाठी अनेक गरीब विद्यार्थी खिशात पैसे नसताना चारशे पाचशे किमी परीक्षा देण्यासाठी आले होते, त्यांचे जे नुकसान यातून झाले आहे, वरून जो मनस्ताप झाला आहे ते लक्षात घेऊन हे सरकार संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का?
3. 'महाज्योती'चे भ्रष्ट अधिकारी, परीक्षा घेणारी भ्रष्ट कंपनी आणि पेपर "सेट" करणाऱ्या दोषी अधिकारी लोकांवर हे सरकार कारवाई करणार का?
4. मागे झालेल्या 'महाज्योती'च्या परीक्षा आणि त्यातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि खाजगी क्लास यांचे काही साटेलोटे आहे का? असे असेल तर प्रामाणिकपणे कष्ट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय?
5. "ज्ञानदीप" नावाचा हा खाजगी क्लास आहे. या खाजगी क्लासवाल्यांचे आणि सरकारी अधिकाऱ्यांचे काही "आर्थिक हितसंबंध" आहेत का?
6. हे सरकार किती दिवस असे ओबीसी विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणार आहे?

असे खडे सवाल आव्हाड यांनी उपस्थित केले आहेत.

यासंदर्भात स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे महेश घरबुडे म्हणाले की, 'महाज्योती'च्या परीक्षेत विविध क्लासेसच्या पेपर मधील प्रश्न जशाच्या तसे येत असतील तर हे गंभीर आहे. असे झाले तर विशिष्ट मुलांनाच स्पर्धा परीक्षेच्या तयारीला संधी मिळेल. इतरांवर अन्याय होईल. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांवर अन्याय होता कामा नये.

तर महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी यासंबंधी चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. महाज्योतीच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तक्रारींची दखल घेऊन तत्काळ चौकशी अहवाल सादर करावा, असा आदेश खवले यांनी दिला आहे.

दरम्यान, यापूर्वी 'महाज्योती' संस्थेद्वारे ओबीसी व्हीजेएनटी विभागाने एमपीएससीच्या ऑफलाईन प्रशिक्षणासाठी पुण्यातील 'ज्ञानदीप' या संस्थेला प्रस्तावित केलेली सुमारे तिप्पट शुल्क वाढ वादात सापडली होती. २०२१-२२ मधील टेंडरचा आधार घेत गेल्या वर्षात या टेंडरला पुढील २ वर्षे मुदतवाढ देण्याची पळवाट मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयाने शोधली. मात्र, करारनाम्यातच वर्षाला ६ टक्के दरवाढ मंजूर असताना प्रस्तावित केलेली तब्बल तिप्पट शुल्क वाढ वादात अडकली. या निर्णयावरून मंत्री कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीकास्त्र सुद्धा झाले होते.

तिप्पट शुल्कवाढीचे प्रकरण नेमके काय आहे?
'महाज्योती'ने एमपीएससीच्या ऑफलाईन प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांसमोर 'ज्ञानदीप' या एकमेव प्रशिक्षण संस्थेचा पर्याय दिला. परीक्षेसाठी २७ वैकल्पिक विषय आहेत. त्यामुळे किमान तीन प्रशिक्षण संस्थांचा पर्याय द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. एकाच संस्थेत दीड हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना गुणवत्तेबाबत तडजोड होते, शिवाय वैकल्पिक विषयांसाठी अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळत नाही, आदी शंका विद्यार्थ्यांमध्ये होत्या.

राज्यसेवा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी प्रति विद्यार्थी ४६ हजार रुपयांप्रमाणे एका वर्षाचे टेंडर फ्रेम केले होते. या दरानुसार दीड हजार विद्यार्थ्यांसाठी सुमारे ७ कोटी खर्च केले जाणार होते. मात्र एमपीएससीने आपले अभ्यासक्रम यूपीएससी मुख्य परीक्षेच्या धर्तीवर बदलले. त्यामुळे 'ज्ञानदीप'ने विद्यार्थ्यांचे शुल्क वाढविण्याची मागणी 'महाज्योती'कडे केली. यासंदर्भात मंत्रालयातून संस्थेला दरवाढीची मागणी करण्यासाठी अर्ज करा अशा सूचना देण्यात आली होती. वस्तुतः करारनाम्यानुसार संस्थेला वर्षाला फक्त ६ टक्के दरवाढ देण्याची तरतूद आहे. तरी सुद्धा 'ज्ञानदीप'ने ४६ हजारांवरुन तब्बल १ लाख २६ हजार रुपये दरवाढीची मागणी केली होती. ही वाढ सुमारे तिप्पट इतकी आहे.

म्हणजेच, सर्वकाही ठरवून सुरू होते. त्यानुसार मंत्री कार्यालय स्तरावरून 'ज्ञानदीप'साठी प्रति विद्यार्थी प्रशिक्षण शुल्क ४६ हजारांवरून १ लाख २६ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यापोटी दीड हजार विद्यार्थ्यांसाठी सुमारे १५ ते १८ कोटी खर्च केले जाणार होते. म्हणजे, मूळ ७ कोटीच्या टेंडरमध्ये तब्बल १० कोटींची वाढ प्रस्तावित केली होती. यापैकी तब्बल सुमारे ८ कोटींचा मोठा वाटा तळे राखणाऱ्यांपर्यंत पोहोचवला जाणार होता, अशी जोरदार चर्चा होती.

राज्यातील इतर नामांकित प्रशिक्षण संस्थांचे राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचे प्रशिक्षण शुल्क सुमारे ४५ ते ७५ हजारांपर्यंत आहे.

या कामात मंत्री अतुल सावे यांचे खासगी सचिव प्रशांत खेडकर यांनी 'ज्ञानदीप'वर विशेष मेहेरबानी केल्याची जोरदार चर्चा आहे. खेडकर यांची 'ज्ञानदीप'चे महेश शिंदे अत्यंत यांच्याशी जवळीक आहे. खेडकर यांची दोन पुस्तके सुद्धा 'ज्ञानदीप'ने प्रकाशित केली आहेत. या शुल्कवाढीवरून सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर 'महाज्योती'ने 'ज्ञानदीप'चे प्रशिक्षण शुल्क काही प्रमाणात कमी केले आहेत.