BMC
BMC Tendernama
टेंडर न्यूज

बीएमसीच्या 'त्या' 3500 कोटींच्या प्रकल्पात लोकायुक्तांची एन्ट्री

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : प्रकल्पग्रस्तांसाठी मुंबईत भांडुप, मुलूंड, परळी, चांदिवलीत सुमारे 14 हजार घरे बांधली जाणार असून, या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबई महापालिकेतील (BMC) विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. लोकायुक्तांनी आता या प्रकल्पाचा अहवाल मागितला आहे. या प्रकल्पात बिल्डरांचा फायदा होईल, असे महापालिकेचे वर्तन असल्याची तक्रार काँग्रेसचे रवी राजा (Ravi Raja) यांनी केली होती. आता महापालिका आयुक्त आणि राज्याच्या नगरविकास विभागाने प्राथमिक चौकशी अहवाल तातडीने सादर करावा, अशा सूचना लोकायुक्तांनी दिल्या आहेत.

मुंबई महापालिकेच्यावतीने विविध ठिकाणच्या प्रकल्पग्रस्त बाधितांसाठी भांडुप, मुलुंड, वरळी, चांदिवलीत सुमारे 14 हजार घरे बांधली जाणार आहेत. या प्रकल्पाचा बांधकाम खर्च सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये आहे. बांधकामाच्या बदल्यात बिल्डरांना टीडीआर, प्रीमियम व क्रेडिट नोटपोटी तब्बल नऊ हजार कोटी रुपयांचा फायदा महापालिकेतर्फे करून दिला जाणार असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षवेते रवी राजा यांनी केला आहे. यासंबंधी त्यांनी राज्याच्या लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. मात्र महापालिकेने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

रवी राजा यांच्या तक्रारीची लोकायुक्तांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. लोकायुक्तांनी या प्रकरणी महापालिका आयुक्त व नगरविकास विभागाच्या मुख्य सचिवांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तक्रारीत दाखल करण्यात आलेल्या आरोपांच्या समर्थनार्थ रवी राजा यांनी कागदपत्रेही लोकायुक्तांना पाठवण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी गैरव्यवहार, विकासकास फायदा व महापालिकेस नुकसान होण्यास जबाबदार अधिकाऱ्यांची नावे व पदनाम आदींची माहिती रवी राजा यांनीही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवावी, तसेच आधीच्या पत्रव्यवहारांच्या प्रतीही पाठवाव्यात असे सांगण्यात आले आहे.