Eknath Shinde bullet Train
Eknath Shinde bullet Train Tendernama
टेंडर न्यूज

शिंदेंनी आदेश दिले अन् मोदींच्या बुलेट ट्रेनचे 'हे' काम फत्ते

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई-अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad) हायस्पीड बुलेट ट्रेनसाठी आवश्यक भूसंपादन, मोबदला, जमीन हस्तांतरण या बाबी ठाणे व पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यक ठाणे जिल्ह्यातील २२ हेक्टर ४८ आर जमिनीचे १०० टक्के भूसंपादन नुकतेच पूर्ण करण्यात आले. जमिनीचा ताबा देखील नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला दिला. त्यासाठी मौजे आगासन, म्हातार्डी, बेतवडे, डावले, पडले, शिळ व देसाई आदी ठिकाणचे अतिक्रमण पाडून बुलेट ट्रेनचा मार्ग सुकर करण्यात आला.

बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्राेजेक्ट आहे. राज्यातील सत्तांतरानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना वेग दिला आहे. ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा खुला ताबा नॅशनल हायस्पीड रेल कॉपोर्रेशनला ३० सप्टेंबरपर्यंत देण्याचे आदेश जारी झाले होते. त्याची गांभीर्याने दखल घेत अतिक्रमण, निवासी घरे, गाळे जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. यामध्ये १२ बांधकामे ही चार सर्वे नंबरमधून तोडली. बुलेट ट्रेनकरिता लागणाऱ्या जमिनीचा ताबा संबंधित अधिकाऱ्यांना नुकताच दिला.

या रेल्वे प्रकल्पासाठी जमिनीच्या भोगवटादारांकडून जमिनी घेऊन त्या बुलेट ट्रेन प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्यासाठी प्रकल्पाच्या समिती प्रमुखांसह नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, ठाणे समिती उपप्रमुख, तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी आदी यंत्रणा या गावांमध्ये तैनात करून जागा मोकळी केल्याचे शिंदे यांनी सांगितले. या रेल्वे प्रकल्पासाठी लागणाऱ्या भूखंडावर वसलेल्या रहिवाशांकडून प्रशासनाला कडाडून विरोध झाला. मात्र, पोलीस बळाचा वापर करून यावर मात केली.

मुंबई ते अहमदाबाद अशी 508.17 कि.मी. लांबीचा हाय स्पीड रेल्वे प्रकल्प (बुलेट ट्रेन) असून यासाठी एक लाख 8 हजार कोटी खर्च येणार आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात मिळून एकूण 12 स्थानके असून महाराष्ट्रात त्यातील 4 स्थानके आहेत. मुंबईतील 1 स्थानक वगळून उर्वरित तीनही स्थानके उन्नत प्रकारातील आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्पाला मुंबईतील वांद्रे - कुर्ला संकुलातून सुरुवात होणार असून ठाणे - शिळफाटादरम्यान २१ किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. या मार्गासाठी नुकतीच टेंडर प्रक्रिया सुद्धा सुरु झाली आहे.