मुंबई (Mumbai) : 'ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो'च्या कामाला केंद्र व राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. १२ हजार २०० कोटींचा हा रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्प २९ कि.मी. लांबीचा आहे. २६ किलोमीटर जमिनीवरून तर ३ किलोमीटर भूमिगत ही मेट्रो धावणार आहे. २०२९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ठाणेकरांची वाहतूककोंडीतून सुटका व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रोच्या कामाची मुहूर्तमेढ रोवली. मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के हे केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी नुकतीच मेट्रो प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत खासदार नरेश म्हस्के यांनी बैठक घेतली. बैठकीत २०२९ पर्यंत 'ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो' प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्पाचे प्रकल्प संचालक राजीव त्यागी, मुख्य प्रकल्प अधिकारी सुनिलकुमार गर्ग, व्यवस्थापक प्रविण पापोळकर यांच्या समवेत कामाच्या प्रगतीबाबत आढावा बैठक घेतली व प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. विविध सूचनाही करण्यात येऊन काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो'ची स्थानके अत्याधुनिक आणि आयॉनिक करण्याचे नियोजन असून त्यासाठी काही सल्लागारांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच उर्वरित सल्लागारांची नेमणूक करण्यासाठी लवकरच टेंडर काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. १२ हजार २०० कोटींची मंजुरी असलेल्या हा अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्प २९ कि.मी. लांबीचा आहे. २६ कि.मी. जमिनीवरून तर तीन कि.मी. जमिनीखालून (भूमिगत) ही रेल्वे धावणार आहे. याच्या मार्गिका अंतिम करण्यात आल्या आहेत. २२ स्थानके उन्नत तर दोन स्थानके भूमिगत असणार आहेत. भूमिगत असलेली स्थानके ही जुने ठाणे रेल्वेस्थानक आणि नवीन ठाणे रेल्वेस्थानक यांना जोडणारी असणार आहे. भूमिगत रेल्वे प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये काही गैरसमज निर्माण झाले होते. भूमिगत रेल्वेमुळे कोणत्याही इमारती अथवा बांधकामांस बाधा किंवा अडचण निर्माण होणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यातील रायलादेवी ते बाळकूम नाका या २० किलोमीटर लांबीच्या कामासाठी १,४०० रुपये कोटी रुपयांचे टेंडर मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. 'ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो' प्रकल्पात वागळे इस्टेट, रोड नं. २२, लोकमान्यनगर, पोखरण रोड नं. १, पोखरण रोड नं. २, ग्लॅडी अल्वारिस रोड, हिरानंदानी मिडोज, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, बाळकुम, राबोडी, ठाणा कॉलेज रोड, ठाणे स्टेशन या परिसरातून ही अंतर्गत मेट्रो धावणार आहे. सीआरझेडच्या अडचणीमुळे बाळकुम नाका ते रायलादेवी मार्गाचे टेंडर तीन महिन्यांनी निघणार आहे. वडवली, कावेसर येथे 'ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो' प्रकल्पाच्या डेपोचे सर्वेक्षण सुरू आहे.