Eknath Shinde Tendernama
टेंडर न्यूज

Eknath Shinde : कामात हयगय करणारे अधिकारी, कंत्राटदारांवर कठोर कारवाई

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांचा वेग वाढवा, तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी कामे मॉन्सूनआधी पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले.

एमएसआरडीसीच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या राज्यातील विविध विकास प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला. ही सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. बैठकीस एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि अधिकारी उपस्थित होते. मुंबई-नाशिक महामार्गाचा आढावा घेऊन महामार्गावरील रखडलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. मान्सूनपूर्वी ज्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण होणार नाही त्याचे डांबरीकरण करून रस्ता वाहतूक करण्यास योग्य बनवावा, या मार्गावरील 31 किलोमीटरचे काँक्रीटीकरण होणे अद्यापही बाकी आहे, तसेच पिंपळास चारोटी, रेल्वे ओव्हर ब्रिज येथील काम रखडले आहे या कामांना तत्काळ गती द्यावी, कंत्राटदार ही कामे वेळेत पूर्ण करण्यास हयगय करत असल्यास त्यालाही नोटीस पाठवून ताकीद द्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. रेल्वे पुलाच्या कामासाठी गर्डर आल्यानंतर तत्काळ रेल्वेकडून मेगाब्लॉक मागून घ्यावा आणि हे काम येत्या महिन्याभरात पूर्ण करावे. या महामार्गावरील कशेळी येथील खाडीवरील पुलाचे काम ऑक्टोबरपर्यंत तर कळवा येथील खाडी पुलाचे काम जून महिन्याअखेर पूर्ण होणार आहे. येत्या पावसाळ्यात ठाणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हायला हवी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची मिसिंग लिंक डिसेंबर अखेर होणार पूर्ण-

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकच्या कामातील सर्वात अवघड असलेले व्हर्टिकल ब्रिजचे काम सध्या सुरू आहे. हे काम अत्यंत अवघड असल्याने ते नियोजनबद्धरित्या पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले. तसेच हे काम येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर तो प्रवाशांसाठी खुला होईल. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता हा महामार्ग सहा ऐवजी दहा मार्गिकांचा करण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीच्या विचाराधीन असून फिरायला जाणाऱ्या  लोकांना दिलासा देण्यासाठी हे काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे रिंगरोडच्या कामात बाधित होणाऱ्या 10 हजार  झाडांचे पुनर्रोपण करणार-

पुणे रिंगरोडचे कामही सुरू झाले असून, यात एकूण १२ पेकेजेस आहेत. यातील  नऊ पेकेजेसची कामे सुरू झाली आहेत. या रिंग रोडच्या कामात बाधित होणाऱ्या दहा हजार झाडांचे पुनर्रोपण होणार आहे. यातील चार हजार झाडांचे पुनर्रोपण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.

नवीन एक्सेस कंट्रोल रस्त्यामुळे कोकणचा कायापालट-

कोकणात सुरू असलेल्या रेवस रेड्डी सागरी महामार्गावर नऊ ठिकाणी खाडीवर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. यात रेवस-कारंजा, रेवदंडा, आगरदांडा, केळशी, काळबादेवी, दाभोळ, जयगड अशा खाडीपुलांचा समावेश आहे. यातील काही पुलांची कामे प्रगतीपथावर असून या कामांची गती वाढवावी असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच कोकणात प्रस्तावित असलेल्या कोकण द्रुतगती एक्सेस कंट्रोल महामार्गाच्या कामाला गती देण्यात यावी, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. या महामार्गामुळे मुंबई आणि सिंधुदुर्ग हे अधिक जवळ येतील तसेच कोकणात जलद पोहोचणे शक्य होईल.

कोकणातील निवारा केंद्राच्या कामांचा वेग वाढवावा-

कोकणात वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवेळी नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यांची सोय व्हावी. यासाठी एमएसआरडीसीच्या वतीने ८६ निवारा केंद्रे उभारण्यात येणार होती. यातील ३७ निवारा केंद्राचे काम प्रगतीपथावर असून या कामांना वेग देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. तसेच शक्यतो शाळांच्या जवळ ही निवारा केंद्र उभारावीत जेणेकरून पावसाळ्यानंतर शाळांना त्यांचे उपक्रम राबवण्यासाठीही निवारा केंद्रे वापरता येतील असे त्यांनी सांगितले.

नवीन महाबळेश्वरच्या कामाला गती द्यावी-

महाबळेश्वरच्या पायथ्याला नवीन महाबळेश्वर विकसित करण्याचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले असून तिथे सुरू असलेल्या कामांचा आज आढावा घेतला. यात आधी २३५ तर आता २९४ गावे नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहेत. याठिकाणी तापोळा येथील उत्तेश्वराच्या मंदिराचे काम, उत्तेश्वर रोप वेचे काम याचीही प्रगती जाणून घेतली. तसेच या कामांची गती वाढवण्यास त्यांनी सांगितले. एमएसआरडीसीला शासनाने अनेक प्रकल्प शासनाने दिले असून ते दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे, तसेच सिडको, एमएमआरडीएप्रमाणे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सहभागी व्हावे असे त्यांनी सांगितले. एमएसआरडीसीची कामे ज्याठिकाणी सुरू आहेत तिथे राडारोडा दूर करून बेरिकेड्स बसवावेत. पुलाखाली उत्तम झाडे लावून सुशोभीकरण करावे. तसेच पावसाळ्यापूर्वी करायच्या कामांना प्राधान्य देऊन ती सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले.