Devendra Fadnavis Tendernama
टेंडर न्यूज

CM Devendra Fadnavis यांनी नाशिक जिल्ह्याला काय दिली गुड न्यूज?

दिंडोरी - अक्राळे एमआयडीसीत आणखी 750 कोटींची गुंतवणूक; राज्य सरकारसोबत करार

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): दिंडोरी तालुक्यातील अक्राळे औद्योगिक वसाहतीमध्ये एसीई गॅसेस टेक्नॉलॉजीज इंडिया प्रा. लि. या कंपनीने ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आठ कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले असून यात नाशिक जिल्ह्यातील गुंतवणुकीच्या एका सामंजस्य कराराचा समावेश आहे. राज्य सरकारने केलेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकूण ४४ हजार ७१० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात सुमारे ७ हजार रोजगारनिर्मिती होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दिंडोरी तालुक्यातील तळेगाव-अक्राळे एमआयडीसीमध्ये मागील काही वर्षांमध्ये मोठ्या कंपन्यांची गुंतवणूक आली आहे. रिलायन्स लाईफ सायन्सेसने येथे ४२०० कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. याशिवाय इंडियन ऑईल या कंपनीनेही क्रायोजेनिक टॅंक उत्पादनासाठी ५०० कोटींची गुंतवणूक करण्याच घोषणा केली असून तो प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. एसीई गॅसेस टेक्नॉलॉजीज इंडिया प्रा. लि. या कंपनीने यापूर्वी नाशिकमध्ये ७५० कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती.

याशिवाय या औद्योगिक वसाहतीमध्ये मुख्यतः फार्मा, फूड प्रोसेसिंग आणि सुक्ष्म व लघु उद्योग आकर्षित होत आहेत. या औद्योगिक वसाहतीमध्ये पहिली प्लग-अँड-प्ले सुविधा १० एकर क्षेत्रात सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे आणखी कंपन्या येण्याची शक्यता आहे.

आता महाराष्ट्र सरकारबरोबर झालेल्या सामंजस्य करारानुसार 'एसीई गॅसेस टेक्नॉलॉजीज इंडिया प्रा. लि. ही कंपनी ७५० कोटी रुपयांचा प्रकल्प अक्राळे औद्योगिक वसाहतीमध्ये उभारणार असून येथे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि औद्योगिक वायू उत्पादन केंद्र उभारले जाणार आहे. या प्रकल्पातून दररोज सुमारे ३०० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि इतर औद्योगिक गॅसेसचे उत्पादन करण्याची क्षमता उभारली जाणार आहेत.

प्रकल्पाची उभारणी दोन टप्प्यांत केली जाणार असून पहिल्या टप्प्यात सुमारे ५०० कोटी, तर दुसऱ्या टप्प्यात २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. एसीई गॅसेस टेक्नॉलॉजीज इंडिया प्रा. लि. ही कंपनी जुलै २०२४ मध्ये स्थापन झाली असून तिची नोंदणी आंध्रप्रदेशमध्ये आहे. औद्योगिक व वैद्यकीय गॅस निर्मिती हा कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आठ कंपन्यांसोबत सामंजस्य करार केल्याव्यतिरिक्त टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी नागपूर, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित प्रकल्प उभारण्याचा विचार करीत आहे. या उपक्रमांमुळे उच्च कौशल्याधारित रोजगारांच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.