JICA, Eknath Shinde
JICA, Eknath Shinde Tendernama
टेंडर न्यूज

CM: महाराष्ट्रातील मोठ्या प्रकल्पांना 'या' जपानी कंपनीचा बुस्टरडोस

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई तसेच महाराष्ट्रामध्ये (Mumbai, Maharashtra) आगामी काळात अनेक मोठे विकास प्रकल्प सुरू होत आहेत. जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी – 'जायका' (JICA) यांनी यासाठी अर्थसहाय करावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. 'वर्षा' येथे आज सकाळी जायकाचे प्रेसिडेंट डॉ. तनाका अखिको, चीफ रिप्रेझेंटेटिव्ह साईतो मित्सुनोरी आणि शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध विकास प्रकल्पांबाबत चर्चा केली व राज्य शासनाला 'जायका'चे सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.

विशेषत: मुंबईतील भूमिगत मेट्रो, मुंबई-गोवा महामार्ग, तसेच विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडोर या व इतरही काही मोठ्या प्रकल्पांसाठी जायकाने अर्थसहाय्य करण्यावर चर्चा झाली. अशा मोठ्या प्रकल्पांना अर्थसहाय्याबाबत जायका आणि राज्य शासन यात समन्वय असावा यासाठी एक समन्वय अधिकारी शासन नियुक्त करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितले.

प्रारंभी या शिष्टमंडळाचे स्वागत करून मुख्यमंत्री म्हणाले की, जायकाच्या मदतीने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात मोठमोठे विकास प्रकल्प मार्गी लागले असून मध्यंतरी दाव्होस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेतही महाराष्ट्राने १ लाख ३७ हजार कोटींची भरीव गुंतवणूक आणल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

जायकाच्या शिष्टमंडळात ताकूया ओत्सूका, मसनोरी सकामोटो, अनुराग सिन्हा आदींचा समावेश होता. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन, मंत्रालयातील वॉर रूमचे महासंचालक राधेशाम मोपलवार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजकुमार देवरा आदी यावेळी उपस्थित होते.