Devendra Fadnavis Tendernama
टेंडर न्यूज

Devendra Fadnavis : शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा महामार्ग नागपूरपासून सिंधुदुर्गपर्यंत १२ जिल्ह्यांमधून जाणार असून, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शक्तीपीठांना जोडणारा आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासालाही चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, जसे समृद्धी महामार्गामुळे १२ जिल्ह्यांचे जीवनमान बदलले, त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्गामुळेही मोठे परिवर्तन घडेल. या महामार्गामुळे राज्यातील विविध भागांत सुलभ आणि वेगवान वाहतूक व्यवस्था निर्माण होईल, ज्यामुळे व्यापार आणि उद्योगांना गती मिळेल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी स्वतःहून या महामार्गासाठी जागा देण्याची तयारी दाखवली आहे. कोल्हापूरच्या एअरपोर्टवर एक हजार शेतकऱ्यांचे निवेदन प्राप्त झाले, ज्यात महामार्गाचे समर्थन करण्यात आले आहे.

"शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी चर्चा करू, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू. पण हा महामार्ग महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो होणारच," असे त्यांनी ठामपणे सांगितले. ज्या भागांकडे आजवर दुर्लक्ष झाले, त्या भागांचा विकास करण्यासाठी दिल्ली-मुंबई ग्रीनफिल्ड महामार्ग हे योग्य माध्यम आहे."अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे प्रसिद्ध उद्गार आहेत – अमेरिका श्रीमंत आहे कारण तेथे चांगले रस्ते आहेत. आपण महाराष्ट्राचाही विकास याच पद्धतीने साधणार आहोत," असे त्यांनी नमूद केले. या महामार्गामुळे शक्तीपीठ आणि औद्योगिक केंद्रे जोडली जातील. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील उद्योगांना चालना मिळेल. राज्यातील वाहतुकीचा वेग आणि सुविधा सुधारतील. पुरवठा साखळी मजबूत होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. शेतकऱ्यांना अधिक चांगल्या रीतीने बाजारपेठेपर्यंत पोहोचता येईल. "हा केवळ रस्ता नसून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.