मुंबई (Mumbai) : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादीत करत पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री बनलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यंदाच्या दावोस (world economic forum davos 2025) दौऱ्यातून महाराष्ट्राच्या वाट्याला किती गुंतवणूक आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या 20 ते 24 जानेवारी या काळात दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये फडणवीस सहभागी होणार आहेत.
दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी 19 तारखेला पहाटे ते मुंबईतून रवाना होणार आहेत. सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणारा आणि आकांक्षांनी परिपूर्ण महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणण्याच्या हेतूने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे.
यापूर्वी फडणवीस हे त्यांच्या पहिल्या कार्यकाळात 3 वेळा दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी झाले होते. औद्योगिक विकासात पाचव्या क्रमांकावरुन महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला होता. राज्यात त्या काळात मॅग्नेटिक महाराष्ट्राचे दोन वेळा आयोजन झाले.
आताही या दौर्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरगच्च कार्यक्रम दावोस दौर्यात राहणार आहेत. अनेक जागतिक नेत्यांच्याही ते भेटी घेणार आहेत. या दौर्यात उद्योगमंत्री उदय सामंत, तसेच एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको अधिकार्यांचे शिष्टमंडळ त्यांच्यासोबत असेल.
डेटा सेंटर्स, ऑटोमोबाईल्स, सेमिकंडक्टर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात मोठ्या संख्येने सामंजस्य करार या दौर्यात होणार आहेत.
महाराष्ट्राच्या 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक राज्यात आणण्याचा प्रयत्न या दौर्यातून होईल. अर्थात प्रामुख्याने यातून रोजगारनिर्मितीचेही उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे.
महाराष्ट्राने विविध प्रकारची धोरणे अलिकडेच जाहीर केली आहेत, त्याबाबत सुद्धा ते विविध व्यावसायिक बैठकांमध्ये अवगत करतील आणि त्यातून महाराष्ट्राच्या एकूणच सर्वांगिण विकासाला चालना देतील.
राज्यात गुंतवणूक आणताना किंवा पायाभूत सुविधांचा विकास करताना आम्ही सातत्याने चौफेर विकास कसा होईल आणि प्रादेशिक समतोल कसा राखला जाईल, यावर भर दिला. या दावोस दौर्यात सुद्धा महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात आणि सर्व विभागात गुंतवणूक कशी येईल, यादृष्टीने आमचे प्रयत्न असतील, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.